परमेश्वराची कृपा…?

“ देवाचा मार्ग हा चित्तशुद्धीचा मार्ग आहे. भोळसटपणे लौकिक जगातील योगायोगाच्या गोष्टींना त्याची कृपा मानणे ही आत्मवंचना आहे, अधर्म आहे!”

आचार्य विनोबा भावेंच्या एका मित्राने संन्यास घेतला होता. काही काळानंतर योगायोगाने त्याची विनोबांशी भेट झाली. विनोबांनीदेखील ब्रह्मजिज्ञासेसाठी घर सोडले होते. एकमेकांच्या घर सोडल्यानंतरच्या वाटचालीबाबत चर्चा सुरू झाली. मित्र म्हणाला, “घर सोडल्यापासून आजवर देवाने माझे रक्षण केले. काहीही कमी पडू दिले नाही. परमकृपाळू आहे तो!”
विनोबांनी त्याला देवाच्या कृपेचे उदाहरण विचारले.
मित्र अनुभव सांगू लागला, “मी घर सोडून निघालो त्यादिवशी जवळ काहीही खाण्याची वस्तू नव्हती. बराच काळ चालून मी थकलो होतो. भूक लागली होती. पण खायला कसे मिळणार? कसे होणार याची थोडी चिंता तर होतीच. पण देवाने अकल्पित मदत केली. मी ज्या रस्त्याने चाललो होतो, त्याच वाटेने माझ्या पुढे एक बैलगाडी चालली होती. बैलगाडीत भुईमुगाच्या शेंगांची पोती होती. त्यातील एका पोत्याला भोक पडले होते. रस्त्याच्या उतारामुळे गाडीला धक्का बसला की त्या भोकातून शेंगा रस्त्यावर पडत होत्या. जणू ईश्वरानेच माझ्या भूकेसाठी ही योजना केली होती. परमकृपाळू आहे तो!”
या आठवणीने गहिवरलेल्या मित्राने आकाशाकडे पाहिले.
मित्राची ही आठवण ऐकून विनोबांनी मित्राला प्रश्न केला, “देवाने तुझ्यावर कृपा केली की तुला कुबुद्धी दिली? त्या शेतकऱ्याचे नुकसान होत असताना तू त्याला हाक मारून सांगायला हवे होतेस की, ‘दादा, तुझ्या पोत्यातून शेंगा सांडत आहेत.’ पण तसे सांगण्याची बुद्धी तुला कशी काय नाही झाली?”
तो मित्र भांबावला. विनोबा असा प्रश्न करतील, अशी त्याला अपेक्षाच नव्हती. कारण आतापर्यंत त्याने हा किस्सा अनेकांना ऐकवला होता, आणि सर्वांनीच त्याच्या म्हणण्याला मान डोलावली होती.
विनोबा पुढे म्हणाले, “त्या शेतकऱ्याला जागृत करणे हा तुझा त्या क्षणीचा धर्म होता. मग त्या शेतकऱ्याने तुझी सद्भावना लक्षात घेऊन कदाचित तुला काही खायला दिले असते. कदाचित काहीच दिले नसते. तुला वाटले की तुझ्यावर देवाने कृपा केली. पण त्या शेतकऱ्याला विचारले असते तर तो काय म्हणाला असता? देव एकाला सुखी करण्यासाठी दुसऱ्याला दुखी करत असेल का? तू जो विचार करतोस तो मला जडवादी वाटतो—लौकिक गोष्टींसाठी सद्बुद्धीला बळी देणारा विचार वाटतो. देवाचा मार्ग हा चित्तशुद्धीचा मार्ग आहे. भोळसटपणे लौकिक जगातील योगायोगाच्या गोष्टींना त्याची कृपा मानणे ही आत्मवंचना आहे, अधर्म आहे!”

संकलन : डॉ. रुपेश पाटकर

  • Related Posts

    श्वेत सावंत याच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन

    सावर्डेतील युवकाची कर्करोगाशी झुंज गांवकारी, दि. ३० (प्रतिनिधी) सावर्डे येथील श्वेत सावंत यांच्यावर दोनापावला येथील मणिपाल इस्पितळात कर्करोगावरील उपचार सुरू आहेत. या उपचाराचा खर्च मोठा होणार असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी मदतीसाठी…

    ते पण अवतार होते!

    मला आठवते, मी त्यावेळी पहिलीत होतो. आम्हाला ख्रिसमसची सुट्टी होती. सुट्टी असल्यामुळे शेजारच्या प्रविणसोबत खेळण्यासाठी दिवसभर त्याच्याच घरी होतो. संध्याकाळी बाबा शेतातून आले. ते संध्याकाळी माझ्याकडून प्रार्थना म्हणून घेत आणि…

    You Missed

    तुयेत एम्सचा विचार व्हावा

    • By Gaonkaari
    • फेब्रुवारी 6, 2026
    • 11 views
    तुयेत एम्सचा विचार व्हावा

    टीसीपीच्या कलम ३९ (ए) चे वस्त्रहरण

    • By Gaonkaari
    • फेब्रुवारी 6, 2026
    • 6 views
    टीसीपीच्या कलम ३९ (ए) चे वस्त्रहरण

    06/02/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • फेब्रुवारी 6, 2026
    • 16 views
    06/02/2026 e-paper

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    • By Gaonkaari
    • फेब्रुवारी 5, 2026
    • 27 views
    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    • By Gaonkaari
    • फेब्रुवारी 5, 2026
    • 19 views
    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    05/02/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • फेब्रुवारी 5, 2026
    • 19 views
    05/02/2026 e-paper