‘पोसके’ झाले मालक

भाजपात आयात केलेल्या पोसक्यांनी पक्षाला आपल्या नादाला लावले हेच खरे. भाजपने काँग्रेसला कमकुवत केले की काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपमध्ये घुसखोरी करून भाजपलाच कमकुवत केले, याचे उत्तर आता जनताच देऊ शकेल.

सध्याची नोकर भरतीसाठी पैसे उकळण्याची एकामागोमाग एक प्रकरणे पाहता सरकारातीलच म्हणजे भाजपातीलच अंतर्गत राजकारणाने डोके वर काढल्याचा सुगावा लागतो. भाजपने सत्तेसाठी पोसके घेतलेले नेते आता पक्षाचे मालक बनले आहेत. या पोसक्यांनी मुळ संघटनेलाच आपल्या दाव्याला बांधली आहे आणि सत्तेचा उपयोग संपत्तीसाठी कसा केला जातो, याचे संस्कार भाजप संघटनेवर केले. या संस्काराचा भाग म्हणूनच गेली १२ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपचे अनेक नेते, पदाधिकारी आता सत्तेचा यथेच्छ उपयोग करण्यात दंग झाले असून सरकारी नोकरभरती ही देखील पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यासाठी एक उत्पन्नाचे कसे साधन बनू शकते, या परिपाकच या घटनांतून दिसून येतो. विशेष म्हणजे आत्तापर्यंत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार १८ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चार प्रमुख महिला ह्यात गुंतल्याचे दिसून येते परंतु या चारही महिलांचा प्रमुख सुत्रधार कोण, ही गोष्ट काही अजूनही तपासात उघड झालेली नाही. या महिला नेमक्या कुणाच्या बळावर हा धंदा करत होत्या किंवा कुणाला हाताशी धरून या नोकऱ्या विकत घेत होत्या, हे शोधणे गरजेचे आहे. केवळ सरकारी नोकरीच्या नावाने लोकांना ठगवण्याचाच त्यांचा धंदा होता,असे अजिबात म्हणता येणार नाही. पोलिसांनी या प्रकरणांचा तपास सुरू केला खरा परंतु आत्ताची खात्रीलायक माहिती मिळते त्यानुसार पोलिसांना आता हे प्रकरण बरेच जड बनू लागले आहे. या प्रकरणातील संशयीतांकडून जी काही माहिती उघड होते आहे ती पोलिसांना आणि सरकारलाही सार्वजनिक करणे कठिण बनू लागले आहे आणि त्यामुळे ही माहिती उघड होऊ नये आणि संशयीतांनीही ती उघड करू नये,अशी रणनिती आखली जात आहे. या संशयीतांनी पोलिस तपासात काही महत्वाची नावे घेतल्याचीही चर्चा सुरू आहे. ही नावे केवळ पोलिसांनाच माहित आहेत. ही नावे बाहेर न येण्यासासाठी पोलिसांवर जो दबाव टाकला जात आहे तो भयानक असल्याचीही खबर आता पसरली आहे. भाजपचे सरचिटणीस एड.नरेंद्र सावईकर यांनी या प्रकरणी भाजपचे कार्यकर्ते सहभागी नाहीत,असा जो दावा केला आहे तो दावा म्हणजे आपल्या अशिलाची बाजू मांडताना एखाद्या वकिलाने केलेल्या युक्तीवाद असाच म्हणावा लागेल. आपला अशिल दोषी असूनही त्याला निर्दोष ठरविण्याची जबाबदारी वकिलांची असते. एड. सावईकर हे वकिलीच्या आवेशातच हे बोलत आहेत,असे वाटते पण ते पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि गेली १२ वर्षे सत्तेवर असलेल्या पक्षाचे एक नेते आहेत, हे विसरत आहेत. प्रिती यादव ही एकटी सोडता उर्वरीत तिन्ही महिलांचा थेट संबंध सत्ताधाऱ्यांशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता ही गोष्ट खरी की हे सत्य जनतेच्या दरबारात नव्हे तर कायद्याच्या दरबारात होणे गरजेचे आहे. भाजपात आयात केलेल्या पोसक्यांनी पक्षाला आपल्या नादाला लावले हेच खरे. भाजपने काँग्रेसला कमकुवत केले की काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपमध्ये घुसखोरी करून भाजपलाच कमकुवत केले, याचे उत्तर आता जनताच देऊ शकेल.

  • Related Posts

    ऑर्डर.. ऑर्डर…

    केवळ भावना किंवा आपल्याला काय वाटते याला अर्थ नाही तर ते सिद्ध करण्याची किंवा त्याबाबतचे पुरावे हाती असण्याची गरज आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सनबर्न महोत्सवाला सशर्त मान्यता दिली…

    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    हायकोर्टाने शर्ती आणि अटींची बंधने जी सरकार आणि आयोजकांना घातली आहेत त्यांचे खरोखरच पालन होते काय हे न्यायदेवता आता डोळ्यांवरील पट्टी हटविल्यामुळे पाहु शकेल, एवढीच काय ती अपेक्षा सर्वसामान्य नागरिक…

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    You Missed

    21/12/2024 e-paper

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 21, 2024
    • 7 views
    21/12/2024 e-paper

    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 21, 2024
    • 8 views
    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    ऑर्डर.. ऑर्डर…

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 21, 2024
    • 7 views
    ऑर्डर.. ऑर्डर…

    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 20, 2024
    • 3 views
    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    20/12/2024 e-paper

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 20, 2024
    • 4 views
    20/12/2024 e-paper

    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 20, 2024
    • 7 views
    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?
    error: Content is protected !!