रोहीतचा बंगला बने न्यारा !

शत्रूला पराभूत करता येत नसेल, तर त्याला मित्र बनवा, ही रणनीती भाजपच्या राजकीय यशाचे गमक ठरली आहे. त्यामुळे कुणाला काहीही वाटले तरी त्याचा फरक भाजपला पडत नाही.

ताळगावातील सर्वे क्रमांक १८६/३ या शेतजमिनीत सुरू असलेले बांधकाम हे आपल्या घराचेच असल्याचे धडधडीत स्पष्टीकरण पणजी महानगरपालिकेचे महापौर रोहीत मोन्सेरात यांनी दिले. शेजारील शेतात कंत्राटदाराने टाकलेले बांधकाम साहित्य लवकरच साफ केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. मुळात आपल्या घराबाबत काहीच विषय नसताना काहीजण विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
ताळगावातील शेतात सुरू असलेल्या या वादग्रस्त बांधकामाबाबत एका पत्रकाराने प्रश्न उपस्थित केला आणि अखेर अधिकृत स्पष्टीकरण मिळाले. रोहीत मोन्सेरात हे राज्याचे महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात आणि ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे सुपुत्र आहेत. ही जमीन रोहीत मोन्सेरात यांच्या नावे असली तरी ती ताळगाव कोमुनिदादची मूळ मालमत्ता आहे.
शेतजमिनीशी संबंधित कृषी कुळ कायद्यानुसार विकत घेतलेली जमीन दुसऱ्याला विकता किंवा कराराने देता येत नाही, त्यामुळे कायद्यानुसार रोहीत मोन्सेरात या जमिनीचे कायदेशीर मालक कसे झाले, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. तसेच, नगर नियोजन विभागाकडून घर बांधण्यासाठी शेतजमिनीचे ‘सेटलमेंट’ करून परवानगी घेतली आहे का आणि महसूल विभागाने त्यासंबंधीची सनद दिली आहे का, यावरही सरकारने स्पष्टीकरण द्यायला हवे.
ताळगावची ही जमीन भातशेतीसाठी राखीव असून कृषी धोरण आणि शेतीसंरक्षण कायद्यात तशी तरतूद आहे. मात्र, रोहीत मोन्सेरात यांना या प्रकरणी विशेष सवलत देण्यात आली आहे का, हे सरकारने स्पष्ट करणे आवश्यक आहे.
या प्रकरणावर एकही विरोधक आवाज उठवत नाही. आपचे फ्रान्सिस कुएलो, सेसिल रॉड्रीगिस वगळता पणजी किंवा ताळगावच्या नागरिकांनी सरकारला जाब विचारला नाही, ही बाब विचार करण्यासारखी आहे. ताळगांव कोमुनिदादचे काही गांवकार याविरोधात प्रशासकीय आणि न्यायालयीन लढा लढत आहेत परंतु त्यांना राजकीय व्यवस्था साथ न देता त्यांचीच सतावणूक करत असल्याचेही पाहणीत आले आहे. मोन्सेरात कुटुंबाच्या राजकीय प्रभावामुळे भाजपने त्यांच्यापुढे शरणागती पत्करली आहे का, हा प्रश्नही उपस्थित होतो. गांधी कुटुंबाच्या घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजपला मोन्सेरात यांची घराणेशाही काहीच वाटत नाही का?
शत्रूला पराभूत करता येत नसेल, तर त्याला मित्र बनवा, ही रणनीती भाजपच्या राजकीय यशाचे गमक ठरली आहे. त्यामुळे कुणाला काहीही वाटले तरी त्याचा फरक भाजपला पडत नाही. राजकारणात मते कशी मिळवायची आणि निकालानंतर बहुमत कसे मिळवायचा याचा फॉर्म्यूलाच भाजपला गवसल्यामुळे जनतेच्या कुठल्याच विषयाकडे गांभिर्याने पाहण्याची गरज नाही, असेच अप्रत्यक्ष धोरण भाजपने स्वीकारलेले आहे हे मात्र नक्की.

  • Related Posts

    गोव्यासमोरील मूक आपत्ती

    प्रत्येक मृत्यूमागे उद्ध्वस्त झालेले एक कुटुंब, अनाथ झालेली मुले आणि आर्थिक संकटात सापडलेले पालक किंवा जोडीदार आहेत. गोव्यातील वाढते रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणारे मृत्यू हे आता केवळ वाहतूक नियमांचे…

    पर्यावरण संरक्षण की धूळफेक ?

    अन्यथा पर्यावरण संरक्षणाच्या घोषणा आणि विकासाच्या मंजुऱ्या यांतील विरोधाभास हा जनतेच्या दृष्टीने ‘धोरण’ नसून ‘धूळफेक’ म्हणूनच पाहिला जाईल. गोव्यात विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष नवा नाही. मात्र अलीकडच्या काळात एक…

    You Missed

    Vijai Sardesai Demands Transparency Over Proposed Privatization of Campal Sports Complex

    Vijai Sardesai Demands Transparency Over Proposed Privatization of Campal Sports Complex

    GPCC Blames BJP Government for Deteriorating Law and Order After Anand Patil’s Death

    GPCC Blames BJP Government for Deteriorating Law and Order After Anand Patil’s Death

    CM Pramod Sawant Highlights PM Modi’s Message on Self-Reliance and Nation Building After Mann Ki Baat

    CM Pramod Sawant Highlights PM Modi’s Message on Self-Reliance and Nation Building After Mann Ki Baat

    वटपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्यव्यापी वटवृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

    वटपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्यव्यापी वटवृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

    Transport Department Responds to Long-Pending Demands of Goa Private Bus Operators

    Transport Department Responds to Long-Pending Demands of Goa Private Bus Operators

    Youth Congress Holds Mashal March Demanding Action Over NEET Paper Leak

    Youth Congress Holds Mashal March Demanding Action Over NEET Paper Leak