शिरगांवच्या दुर्घटनेने गोवा हादरला

चेंगराचेंगरीत ६ ठार, ७४ जणांना इस्पितळात दाखल, २२ जणांवर उपचार तर ५ गंभीर

गांवकारी, दि .३ (प्रतिनिधी)

शिरगांवच्या श्री देवी लईराईच्या प्रसिद्ध जत्रोत्सवाला आज पहाटे चेंगराचेंगरीचे गालबोट लागले. धोंड आणि भक्तगणात झालेल्या चेंगराचेंगरीत ६ जणांना मरण आले तर ५ गंभीर जखमींवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. राज्यात ठिकठिकाणी २२ जणांवर उपचार सुरू आहेत. या घटनेची न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत.
शिरगांवच्या दुर्घटनेची माहिती सकाळपर्यंत सर्वंत्र पसरल्यानंतर संपूर्ण गोवा हादरला. राज्यातील सर्वांत मोठा जत्रोत्सव आणि लाखो भाविकांची गर्दी उसळणाऱ्या या उत्सवाला या घटनेचे गालबोट लागल्याने सर्वंत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आज दुपारी ३.३० ते पहाटे ५ वाजेपर्यंत कौल प्रसाद होणार आहे. या काळात कडेकोड पोलिस बंदोबस्त तथा सुरक्षेचे उपाय योजण्यात आले आहेत. भक्तगणांनी देवस्थान समितीला सहकार्य करण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष दीनानाथ गांवकर यांनी केले. सर्वांनी संयम, शिस्त पाळल्यास सर्वांना योग्य दर्शन आणि कौल प्रसादाचा लाभ मिळेल,असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी रद्द केले कार्यक्रम
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या दुर्दैवी घटनेनंतर पुढील ३ दिवस सगळे सरकारी कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश जारी केले. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना तसेच जखमींना सर्वं ती मदत आणि सहकार्य केले जाईल,अशी हमी त्यांनी दिली. या दुर्घटनेची सखोल चौकशी केली जाईल तसेच सुरक्षेत हयगय झाल्याचे सिद्ध झाल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हापसा जिल्हा इस्पितळ, डिचोली इस्पितळ आदींना भेट देऊन मृत्यांचे कुटुंबिय तथा जखमींची चौकशी केली. शिरगांवातील घटनास्थळी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावाही त्यांनी घेतला.
आरोग्यमंत्र्यांचा विशेष पुढाकार
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी शिरगांवातील घटनेची माहिती मिळताच तात्काळ आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचे आदेश दिले. गंभीर जखमींना गोमेकॉत दाखल केल्यानंतर त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यासह इतर जखमींनाही योग्य उपचार मिळण्याची व्यवस्था केली. सर्व डॉक्टरांनाही उपचारांसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले. म्हापसा जिल्हा इस्पितळ, डिचोली आरोग्य केंद्र तथा अन्यत्र जिथे जिथे जखमींना दाखल केले तिथे उपचाराची व्यवस्था किंवा तात्काळ रूग्णांना पुढील उपचारासाठी हलविण्याची व्यवस्था करण्यात आली.
६ ठार, २२ गंभीर जखमी
आरोग्य खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत ६ भाविकांना मरण आले आहे. मृतांमध्ये सुर्या मयेकर(साखळी), आदित्य कवठणकर(१७), तनुजा कवठणकर(५२, आवचीतवाडा- थिवी), यशवंत केरकर(४०, माडेल, थिवी), प्रतिभा कळंगुटकर (कुंभारजुवे) आणि सागर नंदरगे(३०, माठवाडा- पिळगांव) यांचा समावेश आहे. आदित्य, तनुजा कवठणकर आणि यशवंत केरकर हे नात्यातील असल्याने या कुटुंबावर मोठा आघात कोसळला आहे. चेंगराचेंगरीनंतर एकूण ७४ भाविकांना विविध सरकारी इस्पितळांत दाखल करण्यात आले. २२ भाविकांवर उपचार सुरू आहेत. १८ (म्हापसा, आझिलो), ३ (सामाजिक आरोग्य केंद्र, डिचोली), १- साखळी. ४ जणांना म्हापसा आझिलोत तर दोघांना डिचोली आरोग्य केंद्रावर मृतावस्थेत आणण्यात आले होते. गोमेकॉत सध्या ५ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू आहेत आणि त्यांच्या उपचारावर सरकारचे बारीक लक्ष लागून आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

१ हजार पोलिस फौज पण…
शिरगांव जत्रोत्सवाच्या सुरक्षेखातर एक हजारांची पोलिस फौज तैनात करण्यात आल्याची माहिती सरकारने दिली होती. पोलिस महासंचालक अलोक कुमार तथा उत्तर गोवा पोलिस अधिक्षक अक्षत कौशल यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणून तात्काळ जखमींना बाहेर काढण्यात मदत केली. भाविकांची गर्दी इतकी होती की पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली नसली तर आणखी भीषण हानी झाली असती. काही प्रमाणात धोंड आणि मार्गातील भाविकांत ढकलाढकल झाली. ह्या गर्दीत कुणाला तरी शॉक लागला,अशी वार्ता पसरल्याने आणखीनच गोंधळ उडाला आणि त्यातून ही चेंगराचेंगरी झाल्याच्या प्रतिक्रिया काही प्रत्यक्षदर्शीनी दिल्या. सुरक्षेसाठी तैनात केलेल्या पोलिसांना मोबाईल वापरण्यावर निर्बंध आणावेत,अशीही सूचना काहीजणांनी केली आहे. वास्तविक पोलिस तथा सरकारी यंत्रणांनी अपेक्षीत भाविकांच्या संख्येचा अंदाज घेऊन आणखी नियोजनबद्ध सुरक्षा आराखडा तयार करण्याची गरज होती,असेही काही जाणकारांचे मत आहे. यंदाच्या सुरक्षा व्यवस्थेवर दहशतवादी कारवायांच्या धोक्याची पडछाया असल्याचीच अधिक चर्चा होती आणि त्यात गर्दीचे व्यवस्थापन किंवा चेंगराचेंगरी व्यवस्थापनाचा आराखडा दुर्लक्षीत राहील्याचेही काहीजणांचे म्हणणे आहे.
काँग्रेस पक्ष मैदानात
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी या घटनेबद्दल तीव्र दुख व्यक्त केले. त्यांनी जीएमसीत जाऊन जखमींची चौकशी केली. काँग्रेस विधीमंडळाचे सदस्य तथा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी शिरगांव देवस्थान समितीसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आमदारांनी विविध इस्पितळांत जाऊन जखमी तथा मृतांच्या कुटुंबियांना धीर दिला. राज्यातील सर्वंच राजकीय नेते, राजकीय पक्षांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
राष्ट्रपती, पंतप्रधानांचे ट्वीट
या घटनेची दखल राष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक तसेच इतर अनेकांनी ट्वीटव्दारे या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. राज्यातील सर्वंच राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त करून मृतांचे कुटुंबिय तसेच जखमींना सरकारने आधार देण्याची मागणी केली आहे.

न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिरगांवातील दुर्घटनेची न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल तसेच सुरक्षा उपाययोजनांत हलगर्जीपणा झाल्याचे सिद्ध झाल्यास कारवाईचे संकेत दिले आहेत. या प्रकरणी त्यांनी आजच उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले असून त्यात पुढील उत्सवात सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेण्याचे ठरवले आहे.

हे प्रशासनाचे अपयश
शिरगांवची जत्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरी केली जाते हे जगजाहीर आहे. एक लाख पोलिस फौजफाटा सुरक्षेसाठी तैनात करूनही मग ही घटना घडलीच कशी,असा सवाल आमदार विजय सरदेसाई यांनी केला. सरकार फक्त फोटोबाजीत व्यस्त असून प्रत्यक्षात कुठेच प्रशासन दिसत नाही. इतिहासात पहिल्यांदाच सुरक्षेचे कठोर उपाय योजण्यात आल्याचा भास तयार करण्यात आला होता जणू काही यापूर्वी सुरक्षा यंत्रणाच नव्हती आणि त्यात ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना प्रत्येक १ कोटी रूपये देण्याची मागणीही सरदेसाई यांनी केली.

  • Related Posts

    काँग्रेस – गोवा फॉरवर्ड युती अडचणीत

    चर्चा स्थगित ठेवण्याचा गोवा फॉरवर्डचा निर्णय गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी) काँग्रेस-गोवा फॉरवर्ड पक्षाच्या युतीची प्राथमिक चर्चा सुरू होऊन काही दिवसही उलटले नाहीत, तोच गोवा फॉरवर्ड पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीने युतीची…

    ‘गोंय राखण यात्रे’ साठी काँग्रेस सज्ज

    प्रदेश समिती आणि राज्य कार्यकारिणीची संयुक्त बैठक गांवकारी,दि.४ (प्रतिनिधी) विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी घोषित केलेल्या गोंय राखण यात्रेसाठी गोवा प्रदेश काँग्रेस सज्ज बनली आहे. काँग्रेस समिती आणि राज्य कार्यकारिणीच्या…

    You Missed

    05/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 7 views
    05/08/2026 e-paper

    काँग्रेस – गोवा फॉरवर्ड युती अडचणीत

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 16 views
    काँग्रेस – गोवा फॉरवर्ड युती अडचणीत

    नशेवर उभी अर्थव्यवस्था ?

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 27 views
    नशेवर उभी अर्थव्यवस्था ?

    Rent-a-Cab Operators Urge Goa Govt to Reverse 12-Year Permit Renewal Decision

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 18 views
    Rent-a-Cab Operators Urge Goa Govt to Reverse 12-Year Permit Renewal Decision

    AAP Alleges Police Intimidation at Karapur Protest, Demands CM Meet Agitators

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 18 views
    AAP Alleges Police Intimidation at Karapur Protest, Demands CM Meet Agitators

    Chodankar Refuses to Retract Statements on Karapur Project, Says Legal Notices Will Not Silence Public Questions

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 5, 2026
    • 20 views
    Chodankar Refuses to Retract Statements on Karapur Project, Says Legal Notices Will Not Silence Public Questions