सनबर्न सारखा इव्हेंट हा खरे तर एका मनोरंजन क्षेत्रातील कंपनीच्या धंद्याचा विषय. त्याला परवानगी देताना प्रशासकीय यंत्रणेने त्याचे साधकबाधक परीणाम आणि परवानगीचे योग्य निकष विचारात घेऊन द्यावी किंवा नाकारावी. पण एखादा आरोग्य, शिक्षणासारखा सामाजिक महत्त्वाचा विषय असल्यासारखे लोकप्रतिनिधी याच्या बाजूने उभे राहीले. निव्वळ मनोरंजनाच्या असलेल्या एका इव्हेंटच्या समर्थनार्थ ज्या प्रकारे शक्तिप्रदर्शन झाले, तो सर्वच प्रकार धक्कादायक होता.
या छोटेखानी लेखातून व्यक्त होणारे माझे हे मत या वा त्या बाजूचा म्हणून विचारात घेऊ नये. तर गोव्यातील कुमारवयीन मुलांच्यात भावनिक आरोग्यासाठी वावरलेला आणि आजच्या तरुणांविषयी व त्यांच्या भविष्याविषयी आस्था असलेला एक मनोविकारतज्ज्ञ म्हणून माझ्या मांडणीकडे पहावे. मी जरी असे म्हटले तरी मला याचा अंदाज आहे की माझ्या या मांडणीतून ज्यांच्या धंद्यावर टीका होईल ते मला शिव्या देतील. तरीही मला वाटणारी भीती मी व्यक्त करणे माझे कर्तव्य आहे.
मला वाटते भारताच्या इतिहासातील सर्वात वाईट अशा सांस्कृतिक ऱ्हासाच्या कालखंडात आपण राहत आहोत. आमचा प्रवास ‘हिरकणीपासून सूचना सेठपर्यंत’ झाला आहे. एका बाजूला सुखसाधनांची रेलचेल आणि दुसर्या बाजूला नैतिक मूल्यांचा तितक्याच वेगाने होणारा र्हास असा हा कालखंड आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीच्या फक्त तात्कालिक फायद्याचा विचार करुन चालणार नाही, असे मला वाटते. सनबर्नसारखा ईडीएम किंवा आजकालच्या कोणत्याही चंगळी इव्हेंटकडे आज रोजीरोटी मिळवून देणारे साधन म्हणून केवळ आपल्याला पहाता येणार नाही. सनबर्न हा संगीत उत्सव असला तरी तो भावगीते किंवा भक्तीगीतांचा कार्यक्रम नव्हे. हे मनाला शांतता देणारे संगीत असणार नसून श्रोत्यांत उन्माद निर्माण होईल असे संगीत असेल हे वेगळे सांगायला नको. चंगळी पर्यटनाच्या श्रृंखलेची एक कडी म्हणून याकडे पाहिले पाहिजे. या एकंदरीत पर्यटनाचा आमच्या सांस्कृतिक जीवनावर काय परीणाम झाला हे पाहिले पाहीजे. असे कार्यक्रम कोणती मुल्ये त्यात सहभागी झालेल्या लोकांत आणि एकंदरीत समाजात पेरतात याचा गांभिर्याने विचार करायला हवा. निव्वळ चंगळी उन्माद आणणारे कार्यक्रम समाजात प्रेम, जिव्हाळा, करुणा, आदर, आत्मसन्मान, विवेक निर्माण करतात की माझ्या मजेपलिकडे मला इतरांचे काही पडलेले नाही, हे मुल्य पेरतात? निव्वळ विकास, रोजगार, साधनसुविधांची, मनोरंजनाच्या साधनांची रेलचेल माणसांना सुखी करते का? या मुलभूत प्रश्नाला हात घातल्याशिवाय यावर स्पष्ट विचार सुचणार नाही.
लक्षात घ्या, अनेकांना असे वाटू शकते की यातून स्थानिकांना रोजगार आणि जे कोणी कस्टमर येतील त्यांच्यावर दुष्परिणाम होतील. पण व्यवहारात असे होत नाही. दारु पिणारा बाहेरचा माणूस दारूच्या अंमलाखाली काहीही संबंध नसलेल्या पादचाऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडू शकतो. तुमच्या बिल्डिंगमधील एखाद्या फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय सुरू झाला तर तुमच्या घरातील महिलांना एखाद्या दिवशी किंमत विचारली जाऊ शकते. त्यामुळे बघ्याची भूमिका घेऊन हा झंझावात आपल्या घरात घुसणार नाही अशा भ्रमात राहणे धोक्याचे ठरेल.
तीन वर्षांपूर्वी मी म्हापशाच्या आझिलो हाॅस्पिटलमध्ये काम करत असताना किनारी भागाच्या शाळांतील आठवी नववीतील मुले ड्रग्जचे सेवन करत असलेली मला आढळली होती. दहावीतील एक स्थानिक मुलगी (स्थलांतरित मजुराची नव्हे) स्मोकींगचे व्यसन सोडायचे आहे, यासाठी भेटली होती. हे कशाचे फळ आहे? अर्थातच चंगळवादी पर्यटनाचे. पण हे आता फक्त समुद्र किनार्यांवरच मर्यादित राहिलेले नाही, ते आतल्या भागातही पसरायला लागले आहे.
काही महिन्यांपूर्वी ड्रग्जच्या संदर्भात एक आकडेवारी प्रसिद्ध झाली होती. त्यात स्थानिक तरुणांच्यात ड्रग्ज सेवनाचे आणि ड्रग्ज तस्करीत सहभागी असल्याचे प्रमाण भौमितिक श्रेणीने वाढत असल्याचे स्पष्ट झाले होते. हे लक्षात घ्यायला हवे की पर्यटन संस्कृती म्हणजे तीर्थयात्रेची संस्कृती नव्हे. त्यामुळे तेथील इव्हेंटसाठी येणारी माणसे सात्विक जेवण जेवायला येणार नाहीत. ती चंगळ करायलाच येणार. त्या चंगळीमध्ये दारु, सिगारेट हे तर गृहीतच असते. पण या काॅमन वाटणार्या गोष्टी मुळात ‘गेट वे’ ड्रग्ज आहेत. कोणाही ड्रग्ज ॲडीक्टची सुरवात ही हेराॅईन, एलएसडी, ग्रास वगैरेने होत नाही. पहिल्यांदा बिअर, वाईननेच सुरवात होते. त्यामुळे या ‘गेट वे’ ड्रग्जची प्रतिष्ठा आणि सेवन आपण समाजातून कमी करु शकलो तरच ड्रग्जचे सेवन करण्याचे प्रमाण कमी होणार हे साहजिक आहे.
अनेकजण एक युक्तिवाद करतात की कोणतीही गोष्ट मर्यादित स्वरूपात सेवन करणे हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. अशी मंडळी मग मर्यादेत दारु पिणाऱ्या लोकांची उदाहरणे देतात. पण हा युक्तिवाद शास्त्रीय नाही. या लोकांना हे माहीत नसते की २०% लोकांना मद्यपाशाचा (वा इतर ड्रग्जच्या पाशाचा) आजार असतो. तुमच्या रक्तात जर व्यसनी होण्याच्या आजाराचा दोष असेल तर इतर बाबतीत तुम्ही कितीही संयमी असला तरी दारु किंवा जो काही व्यसनाचा पदार्थ तुम्ही घ्याल, त्याची तल्लफ तुमचा सर्व शहाणपणा गुंडाळून ठेवायला लावते. रक्त ओकत असलेली (म्हणजे ज्यांच्यात २५% मृत्यूची शक्यता आहे) माणसेदेखील दारूचा हट्ट सोडत नाहीत, एवढा घट्ट या आजाराचा कालांतराने विळखा पडतो. दारु, सिगारेट, ड्रग्जची व्यसने हे आजार आहेत. हे आजार हा अक्षरशः विळखा असतो. आज मितीला अशी कोणतीही चाचणी नाही, जी हे सांगू शकेल की तुम्ही व्यसनाच्या पदार्थाची चव घेतली तर तुम्ही त्याचे ॲडीक्ट व्हाल की नाही. त्यामुळे या आजारापासून वाचण्याचा प्रभावी उपाय म्हणजे पहिली चव न घेणे. ३१ डिसेंबर, शिमगा, गटारी आणि अलिकडे नरकासुर हे असे उत्सव आहेत, ज्यात तरुण पहिल्यांदा दारुसारख्या व्यसनाची चव घेतात.
भारतात ड्रग्जवर कायद्याने बंदी आहे, त्यामुळे कोणीही आपल्या इव्हेंटमध्ये ड्रग्ज मिळतील हे औपचारिकपणे नाकारणार हे साहजिक आहे. पोलिस आणि सर्व यंत्रणा ड्रग्जवर आपले कडक लक्ष आहे असा दावा करणारच. पण खरे सत्य तुम्हाला हाॅस्पिटलच्या रेकॉर्डमध्ये दिसेल. ड्रग्ज ट्रीटमेंट सेंटरचे अस्तित्व हा प्रश्न आपल्या भागात मोठ्या प्रमाणात पसरल्याचे स्पष्टच दाखवतो.
वेश्याव्यवसायाची जाहिरात कोणी औपचारिकपणे करणार नाही, पण पर्यटनस्थळी तो मोठ्या प्रमाणात चालतो हे सर्वांनाच माहीत असलेले सत्य आहे. चंगळवादी इव्हेंट हे या गोष्टीसाठी गिर्हाईके आणि देहविक्रयात अडकवल्या गेलेल्या महिला यांची गाठ घालून द्यायला उपयुक्त ठरतात, हे साहजिक आहे.
सनबर्न सारखे इव्हेंट हे केवळ रसिकांसाठी असलेले पाश्चात्य संगीताचे कार्यक्रमच असतील असे मान्य केले तरी ते ड्रग्ज, देहविक्रय आणि तदअनुषंगाने गुन्हेगारीसाठीची परिस्थिती निर्माण करतात. ते इव्हेंट आता समुद्र किनाऱ्यापुरते मर्यादित न रहाता आत पसरु लागले आहेत. हे धोका वाढत चाललाय याचे लक्षण आहे.
प्रश्न म्हातारी मेल्याचा नाही, आम्ही काळाला सोकावू देतोय.
– डॉ. रूपेश पाटकर
लेखक मनोविकारतज्ज्ञ आहेत