वासंतीचा काटा कुणी काढला?

कारापूर येथील घटनेमुळे एकच खळबळ

गांवकारी, दि. ३ (प्रतिनिधी)

कारापूर येथील आदिवासी अविवाहित महिला वासंती रामा सालेलकर (५५) हिच्या संशयास्पद मृत्यूच्या वार्तेने संपूर्ण परिसरात प्रचंड भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या जमिनीच्या अधिकारासाठी भाटकार आणि बिल्डरांशी अनेक वर्षे झुंज देणाऱ्या या रणरागिणी महिलेच्या मृत्यूमागे घातपात असण्याची शक्यता अधिकतर लोक व्यक्त करत आहेत.
विजेचा धक्का की घातपात?
आपल्या राहत्या घरी विजेचा धक्का बसून तिचा मृत्यू झाला, अशी नोंद करण्यात आली आहे. मात्र भाटकार आणि बिल्डरांच्या भीतीमुळे सरकारी यंत्रणेकडून तिच्या तक्रारींची दखल घेतली जात नव्हती. कुळ कायद्यानुसार तिचे प्रकरण अनेक वर्षे मामलेदार कार्यालयात प्रलंबित असून तिथेही तिला न्याय देण्याबाबत वेळकाढूपणा करण्यात येत होता. सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर व इतरांनी तिचा विषय आदिवासी आयोगाकडे पोहोचवला होता. तिच्यावर सुरू असलेल्या अत्याचाराबाबत आयोगाकडे दाद मागण्यात आली होती, परंतु तिथेही काहीच निष्पन्न झाले नाही.
काय आहे प्रकरण?
कारापूर येथे कथित लोढा कंपनीकडून सुरू असलेल्या भव्य प्रकल्पाच्या शेजारीच वासंती सालेलकर हिचे घर आणि जमीन आहे. सुमारे ५२ हजार चौ. मीटर जमिनीवर तिच्या वडिलांचे नाव कुळ म्हणून नोंद आहे. दूभाषी नामक भाटकारासोबत कुळ कायद्याअंतर्गत तिचा खटला सुरू आहे. हे सुरू असताना राणे रिअल्टर्स प्रा. लि. या कंपनीकडून ही जमीन विकत घेतल्याचा दावा करून तिथे झाडे तोडणे व अन्य कामे सुरू करण्यात आली होती. वासंती सालेलकर हिने ही कामे बंद पाडल्यानंतर तिला सतावण्याचे प्रकार सुरू झाले.
यापूर्वीचे हल्ले परतवून लावले
वासंती सालेलकर हिच्यावर यापूर्वी हल्ले झाले आहेत. तिच्या भावाचा यापूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. तिची बहिण कधीकधी तिच्याकडे राहायला येत असे. एकदा चाकूने, तर एकदा लोखंडी रॉडने तिच्या पायावर मारून तिला जखमी करण्यात आले होते. ती पाणी पीत असलेल्या विहिरीत विष टाकण्याचाही प्रकार घडला होता. तिच्या शौचालयात माती टाकून देण्याचेही प्रकरण घडले होते. या सर्व बाबतीत ती सरकारकडे दाद मागत होती, तरीही तिला कुणीही मदत करण्यास तयार नव्हते. सामाजिक संघटनांच्या मदतीने तिने अनेकांकडे निवेदने सादर केली होती.
शेजाऱ्यांची केवळ सहानुभूती
वासंती सालेलकर हिचे जमीन अधिकाराबाबतचे झगडे भाटकार आणि बिल्डरांशी होते. ती एकटी झुंज देत असताना शेजारी तिला केवळ सहानुभूती दाखवत होते; उघडपणे मदतीला येण्याचे धाडस ते करत नव्हते. वासंती ही पूर्णपणे आपल्या अधिकारांबाबत योग्य होती, असे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र भाटकार आणि बिल्डरांचे सरकारदरबारी संबंध असल्यामुळे ते तिला ही जमीन देणार नाहीत, असा लोकांचा समज झाला होता. यापूर्वी १.५ कोटी रुपयांना हा विषय सामंजस्याने सोडविण्याचा प्रस्ताव तिला आला होता, परंतु तोही तिने धुडकावून लावल्याची माहिती मिळाली आहे.
कुळ–मुंडकारांची सुपारीच दिली आहे का?
गेली अनेक वर्षे कुळ आणि मुंडकारांचे विषय प्रलंबित ठेवूनच त्यांना शिक्षा दिली जात आहे. त्यांना न्याय न देता हे खटले प्रलंबित ठेवणे आणि भाटकार व बिल्डरांना रान मोकळे करून देणे ही सरकारची नीती राहिलेली आहे. सर्व जमिनी कुळ आणि मुंडकारमुक्त करून त्या विक्रीसाठी मोकळ्या करण्याचा घाट सरकारने घातला आहे. मोरजी येथील उमाकांत खोत यांचा मृत्यू आणि आता वासंती सालेलकर हिचा मृत्यू – ही सगळी संशयास्पद प्रकरणे पाहता राज्यातील सर्व कुळ आणि मुंडकारांचा पत्ता कट करण्याची सुपारीच कुणीतरी दिली आहे की काय, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी केला.
सीबीआय किंवा एसआयटीकडे तपास द्यावा
गाकुवेधचे नेते रामकृष्ण जल्मी आणि मयेचे युवा नेते ॲड. अजय प्रभूगांवकर यांनी वासंती सालेलकर हिच्या मृत्यूमागे घातपात असण्याची शक्यता वर्तविली आहे. वासंती हिचा जमिनीबाबतचा लढा आणि तिची पार्श्वभूमी या संशयाला बळकटी देते. सरकारने ताबडतोब एसआयटी स्थापन करावी किंवा हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

  • Related Posts

    कदंब कर्मचाऱ्यांची सरकारकडून परवड

    प्रखर आंदोलनाचा संघटनेचा इशारागांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी) कदंब परिवहन महामंडळाचे खाजगीकरण करण्याचा सरकारचा डाव आहे. दिवसेंदिवस महामंडळ आपली जबाबदारी झटकून कर्मचाऱ्यांना खाजगी कंत्राटदार कंपन्यांच्या दाव्याला बांधत आहे. हा प्रकार अजिबात…

    St Andre MLA Viresh Borkar Moves Breach of Privilege Notice Against Speaker Over Assembly Proceedings

    Panaji, March 21, 2026: St Andre MLA Viresh Borkar has submitted a Notice of Motion for Breach of Privilege under Rule 76 of the Goa Legislative Assembly, raising serious concerns…

    You Missed

    23/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 23, 2026
    • 27 views
    23/03/2026 e-paper

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    • By Gaonkaari
    • मार्च 23, 2026
    • 23 views
    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    कदंब कर्मचाऱ्यांची सरकारकडून परवड

    • By Gaonkaari
    • मार्च 23, 2026
    • 31 views
    कदंब कर्मचाऱ्यांची सरकारकडून परवड

    St Andre MLA Viresh Borkar Moves Breach of Privilege Notice Against Speaker Over Assembly Proceedings

    • By Gaonkaari
    • मार्च 23, 2026
    • 7 views
    St Andre MLA Viresh Borkar Moves Breach of Privilege Notice Against Speaker Over Assembly Proceedings

    21/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 21, 2026
    • 17 views
    21/03/2026 e-paper

    किती म्हणून सहन करणार ?

    • By Gaonkaari
    • मार्च 21, 2026
    • 14 views
    किती म्हणून सहन करणार ?