विरोधकांनो, व्हा तयार…

गोव्यात बोकाळलेला भ्रष्टाचार आणि जनतेला गृहीत धरण्याची मानसिकता बदलून लोकांच्या इच्छेनुसार सरकार चालले तरी ते या चळवळीचे यश मानावे लागेल.

राज्यात एकीकडे जनउठावाची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन १२ जानेवारीपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन अल्पकाळाचे असले तरी जनतेच्या असंतोषाला वाट मोकळी करून देण्याची जबाबदारी विरोधकांवर असेल. गोव्यासारख्या ४० सदस्यांच्या विधानसभेत फक्त ७ आमदार असूनही विरोधक सत्ताधाऱ्यांवर भारी ठरू शकतात. मात्र विरोधकांचा हेतू शुद्ध असणे आवश्यक आहे. सत्ताधाऱ्यांशी साटेलोटे किंवा अंतर्गत हातमिळवणी करून ठरावीक नेत्यांनाच लक्ष्य केले जाते आणि इतरांना मोकळे सोडले जाते, अशी लोकांची समजूत आहे. ही समजूत विरोधकांना आपल्या कृतीतून फोल ठरवावी लागणार आहे.
आगामी विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी आमदारांची बैठक आज विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या दालनात झाली. अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनिती आखण्यात आली. आता ही रणनिती प्रत्यक्षात सभागृहात किती यशस्वी ठरते हे पाहावे लागेल. या अधिवेशनाच्या तोंडावर जनचळवळीचा उठाव होणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे ठरले आहे. निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी गोंयकारांना दिलेल्या हाकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनचळवळीची सभा आज संपन्न होणार असून त्यात जनतेचा हुकुमनामा जारी केला जाणार आहे.
वास्तविक फेर्दिन रिबेलो हे गोवा, दमण आणि दीव विधानसभेचे सदस्य राहिले आहेत. कुंकळ्ळीतून ते जनता पार्टीच्या उमेदवारीवर निवडून आले होते. तत्कालीन काँग्रेस नेत्या व पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हुकूमशाही राजवटीविरोधात देशभरात ‘संपूर्ण क्रांती’च्या नावाने भव्य जनचळवळ झाली. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली ही क्रांती देशभर पसरली. अखेर इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली. त्यानंतर सर्व विरोधक एकत्र आले आणि जनता पार्टीची स्थापना झाली. या पक्षाने देशात पहिल्यांदाच राजकीय बदल घडवून आणत काँग्रेसचे सरकार उलथवून टाकले. इंदिरा गांधी यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.
१९७७ साली गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनता पार्टीने सर्व ३० जागा लढवल्या आणि २३ टक्के मते मिळवत ३ ठिकाणी आमदार निवडून आणले. विशेष म्हणजे देशात काँग्रेसचा पराभव झाला असताना गोव्यात काँग्रेसने विधानसभेत प्रवेश करत १० जागा जिंकल्या. शशिकला काकोडकर यांचे सरकार पाडून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यानंतर १९८० साली गोव्यात पहिल्यांदाच काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आणि प्रादेशिक पक्षाकडून राज्याची धुरा राष्ट्रीय पक्षाच्या हाती गेली.
“अजिब है ये गोवा के लोग” असे नेहरू म्हणाले होते. हे शब्द गोव्यातील पहिल्या निवडणुकीनंतरच्या निकालांवर होते. इंदिरा गांधी यांनीही गोव्याचा हा अजिबपणा अनुभवला. देशात काँग्रेसची पडझड सुरू असताना गोव्यात काँग्रेसला यश मिळत होते. तरीही ‘संपूर्ण क्रांती’च्या आंदोलनाने देशाला वेगळी दिशा दिली आणि अनेक नवे युवा नेते राजकारणात आले. जनता पार्टीचा हा फॉर्म्युला अल्पकाळाचा ठरला आणि काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली. मात्र या आंदोलनाने जनतेला लोकशाहीतील आपल्या ताकदीची जाणीव करून दिली, हे महत्त्वाचे आहे.
फेर्दिन रिबेलो यांनी दिलेल्या हाकेनंतर जी लोकचळवळ उभी राहणार आहे ती गोव्याच्या नासाडीला रोखण्यात जरी यशस्वी ठरली तरी ती मोठी प्राप्ती ठरेल. गोव्यात बोकाळलेला भ्रष्टाचार आणि जनतेला गृहीत धरण्याची मानसिकता बदलून लोकांच्या इच्छेनुसार सरकार चालले तरी ते या चळवळीचे यश मानावे लागेल.

  • Related Posts

    मिराबागवासीयांचा नवा विक्रम, पण

    मात्र आंदोलन मागे घेण्याच्या महत्त्वाच्या विषयावर मतदारसंघाचे प्रतिनिधीच गैरहजर असतील तर पक्षात गोंधळ असल्याचे दिसते. हा गोंधळ दूर होऊन मिराबागवासीयांचे शंकानिरसन व्हावे आणि हा विषय यशस्वीरित्या सुटावा, हीच अपेक्षा आहे.…

    या मातीशी प्रतारणा नको!

    श्रेष्ठींची मर्जी राखण्यासाठी गोव्याचे भवितव्य धोक्यात घालण्याची ही कृती म्हणजे या मातीशी प्रतारणाच ठरणार आहे. नगर नियोजन खात्याकडून सध्या कलम ३९(ए) अंतर्गत झोन बदलाचे शस्त्र वापरून सरसकट जमिनींचे रूपांतरण करण्याचा…

    You Missed

    जांबावली श्री दामोदर संस्थानात कुशावती आरतीला भाविकांची भव्य उपस्थिती

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 14 views
    जांबावली श्री दामोदर संस्थानात कुशावती आरतीला भाविकांची भव्य उपस्थिती

    26/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 20 views
    26/03/2026 e-paper

    मिराबागवासीयांचा नवा विक्रम, पण

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 21 views
    मिराबागवासीयांचा नवा विक्रम, पण

    नव्या कॅसिनोमुळे मांडवीला धोका

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 25 views
    नव्या कॅसिनोमुळे मांडवीला धोका

    दिगंबर कामत यांचा श्रद्धा व परंपरेवर आघात – प्रभव नायक

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 24 views
    दिगंबर कामत यांचा श्रद्धा व परंपरेवर आघात – प्रभव नायक

    GCZMA Inspection Flags Data Gaps, Raises Environmental Concerns Over New Deltin Vessel in Mandovi

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 17 views
    GCZMA Inspection Flags Data Gaps, Raises Environmental Concerns Over New Deltin Vessel in Mandovi