विश्वजीत राणेंसमोर काँग्रेस शरण?

ज्या तडफेने या टीकेला प्रत्यूत्तर देण्याची अपेक्षा होती, ती तडफच गमावलेल्या काँग्रेस पक्षावर लोकांनी किती विश्वास ठेवावा, हा आता महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्याचे नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची हेटाळणी केली, असभ्य हातवारे करून काँग्रेसची लक्तरे काढली आणि “काँग्रेसने गोव्याचा सत्यानाश केला” असा गंभीर आरोप केला. या आरोपांवर काँग्रेसचे मौन अनेकांना अचंबित करणारे ठरले आहे. काँग्रेसचा कुणीही नेता अथवा कार्यकर्ता राणेंवर तुटून पडलेला दिसला नाही. नाममात्र कुठेतरी वक्तव्य करून राणेंचा निषेध करण्यापलीकडे काँग्रेसची चुप्पी ही गंभीर बाब ठरली आहे. काँग्रेस पक्ष आपला आत्मसन्मानच गमावून बसला आहे की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मग स्वतःचा आत्मसन्मान गमावलेल्या पक्षाकडून जनतेचा आत्मसन्मान राखण्याची अपेक्षा तरी कशी करायची?
वास्तविक, या आरोपानंतर विश्वजीत राणे यांच्यावर पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते तुटून पडायला हवे होते. हे घडले नाही याला दोनच कारणे असू शकतात. एकतर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते विश्वजीत राणे यांना घाबरतात किंवा ते आतून राणे यांच्याशी चांगले संबंध ठेवून राहतात. या दोन्ही गोष्टी काँग्रेससाठी घातक ठरणाऱ्या असून अशा पक्षावर गोंयकारांनी किती विश्वास ठेवावा, याबाबत गंभीर विचार करावा लागणार आहे.
एखाद्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेल्या भाजप नेत्याने ही टीका केली असती तर एकवेळ मान्य केले गेले असते. परंतु ज्या राणे कुटुंबाचा पिंडच काँग्रेस पक्षावर पोसला गेला, त्या कुटुंबातील घटक भाजपात जाऊन काँग्रेसविरोधात इतकी विषारी टीका करतात, याला काय म्हणावे? गोमंतकीय जनतेने या वागणुकीचा निषेध केला आहेच; अनेकांना ही वागणूक अजिबात रुचलेली नाही. भाजपवाल्यांसाठी तर सुंटीवाचून खोकला गेल्यागत या घटनेची मजा वाटणे स्वाभाविक आहे. परंतु ज्या तडफेने या टीकेला प्रत्यूत्तर देण्याची अपेक्षा होती, ती तडफच गमावलेल्या काँग्रेस पक्षावर लोकांनी किती विश्वास ठेवावा, हा आता महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
राजकीय परिवर्तन घडवण्यासाठी लोक आतूर आहेत; परंतु आत्मसन्मानशून्य पक्षाकडे राज्याची धुरा सोपवून त्यांच्याकडून गोव्याबाबत नेमक्या काय अपेक्षा ठेवता येतील, याचाही विचार सामान्य नागरिकांना करावा लागणार आहे.
काँग्रेसने राज्यात सर्वाधिक म्हणजे सुमारे २४ वर्षे सत्ता भोगली. या कार्यकाळात प्रतापसिंग राणे हे सर्वाधिक म्हणजे जवळपास १५ वर्षे मुख्यमंत्री होते. प्रतापसिंग राणे यांनी अजूनही काँग्रेस पक्षाचा त्याग केलेला नाही; ते अजूनही पक्षाचे नेते आहेत. त्यांचे पुत्र जे भाजपात गेले आहेत, ते काँग्रेस पक्षावर अशी टीका करतात म्हणजे अप्रत्यक्षपणे आपल्या वडिलांच्या कार्यकाळावरच अंगुलीनिर्देश करतात, हे तितकेच खरे. तरीही याची जाणीव ज्या प्रखरतेने काँग्रेसने विश्वजीत राणे यांना करून दाखवण्याची गरज होती, त्यात काँग्रेस पक्ष सपशेल नापास ठरला आहे.
विरोधी पक्षनेते म्हणतात, “आपण विधानसभेत त्यांना प्रत्यूत्तर दिले,” तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणतात, “आपण त्यावर भाष्य केले आहे.” केवळ तोंडदेखलेपणाने निषेध करून ही गुर्मी आणि मुजोरीला प्रत्यूत्तर दिले असे म्हणता येणार नाही. काँग्रेसच्या सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर या देखील या विषयावर काहीच बोललेल्या नाहीत. राणे कुटुंबाशी त्यांचे जवळचे संबंध असणे स्वाभाविक आहे आणि त्यामुळे विश्वजीत राणेंवर भाष्य करणे कदाचित त्यांना योग्य वाटले नसावे.
काँग्रेसचे नेते आणि पक्ष जर अशा तऱ्हेने सोयीची भूमिका घेत असतील आणि विरोधकांप्रती सहानुभूती दाखवत असतील, तर निश्चितच लोकांची राजकीय परिवर्तनाची इच्छा ते कितपत पूर्ण करू शकतील, याबाबत संशय घेण्यास बराच वाव आहे. भाजपला पर्याय म्हणून काँग्रेसचा विचार करताना ही गोष्ट निश्चितपणे खटकणारी आहे, हे काँग्रेसने लक्षात ठेवावे.

  • Related Posts

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    पोलिस खाते असे वागू लागले तर ती धोक्याची सूचना आहे. पोलिसांवरचा लोकांचा विश्वास गेला तर प्रत्येकजण न्यायासाठी स्वतःचा मार्ग पत्करू लागेल. प्रत्येकाने स्वतःच न्यायनिवाडा सुरू केला तर राज्यात अराजकता माजण्यास…

    किती म्हणून सहन करणार ?

    आता तरी जागे होण्याची वेळ आली आहे, प्रशासनासाठीही आणि समाजासाठीही. अन्यथा अशा घटना पुन्हा पुन्हा घडत राहतील आणि त्याची किंमत सामान्य जनतेलाच आपल्या आरोग्याने आणि जीवाने मोजावी लागेल. दाबोळी विधानसभा…

    You Missed

    23/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 23, 2026
    • 27 views
    23/03/2026 e-paper

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    • By Gaonkaari
    • मार्च 23, 2026
    • 23 views
    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    कदंब कर्मचाऱ्यांची सरकारकडून परवड

    • By Gaonkaari
    • मार्च 23, 2026
    • 31 views
    कदंब कर्मचाऱ्यांची सरकारकडून परवड

    St Andre MLA Viresh Borkar Moves Breach of Privilege Notice Against Speaker Over Assembly Proceedings

    • By Gaonkaari
    • मार्च 23, 2026
    • 7 views
    St Andre MLA Viresh Borkar Moves Breach of Privilege Notice Against Speaker Over Assembly Proceedings

    21/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 21, 2026
    • 17 views
    21/03/2026 e-paper

    किती म्हणून सहन करणार ?

    • By Gaonkaari
    • मार्च 21, 2026
    • 14 views
    किती म्हणून सहन करणार ?