
युवा काळात नेहरू युवा केंद्रात धडे घेतलेले मुख्यमंत्री, भाजपमध्ये प्रवेश करून हिंदूत्ववादी आणि राष्ट्रवादी विचारसरणीत अधिक आघाडीवर गेले आहेत.
नेता हा धूर्त, धाडसी, दूरदर्शी आणि हुशार असायला हवा. आपल्या यशाचा डंका वाजवतानाच आपले अपयश किंवा कमकुवतपणा समाजासमोर उघड होऊ नये, याची चोख काळजी घेणे हे नेतृत्वाचे महत्त्वाचे गुणधर्म आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गोव्यात भाजपचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदावर राहिलेले नेते ठरले आहेत. त्यांनी आपल्या नेतृत्वगुणांनी स्व. मनोहर पर्रीकर यांच्यासह अनेकांना मागे टाकले आहे. राज्यात २०२२ च्या विधानसभा निवडणूकीत फक्त २० जागा जिंकलेल्या भाजपकडे सध्या ३३ आमदारांचे बहुमत आहे. अपक्ष आणि मगोचा पाठींबा मिळवून, काँग्रेसचे दोन-तृतीयांश आमदार आपल्या गोटात आणून त्यांनी सत्तेवर एकहाती पकड मिळवली आहे. या सर्व आमदारांनी भाजपची विचारसरणी आणि धोरण स्वीकारले आहे, की गोवा भाजप त्यांच्या विचारसरणीला बळी पडला आहे ? हे प्रत्येकाने आपल्या अनुभवावरून ठरवावे.
कुठल्याही व्यासपीठावर ते नेहमी आत्मविश्वासाने आणि स्पष्टपणे आपली मते मांडतात. मग ते सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव असो, किंवा राजभवनवर आयोजित सर्वधर्म धार्मिक गुरू शांतता संमेलन. त्यांची रोखठोक आणि ठाम भूमिका त्यांचे नेतृत्व अधिक प्रभावी बनवते. गेल्याच आठवड्यात, धारगळ येथे ‘डेल्टीन कॅसिनो टाऊनशिप’ प्रकल्पासाठी ३ लाख ओलीत क्षेत्राची जमीन बिगर शेती वापरासाठी मोकळी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. हा सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा कॅसिनो केंद्रीत प्रकल्प धारगळ येथे उभारला जाणार आहे. याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर फोंड्यातील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात मुख्यमंत्री गोव्याला ‘आध्यात्मिक पर्यटन स्थळ’ म्हणून विकसित करण्याची घोषणा करतात, आणि ती सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे प्रकाशित होते. गोव्यात खाणबंदीनंतर राज्याचे अर्थकारण मद्य आणि कॅसिनो उद्योगावर अवलंबून आहे. गावागावातील जनरल स्टोअर्सच्या जागा वाईन शॉपमध्ये रूपांतरित होत आहेत. समुद्री कॅसिनोंसह मोठमोठ्या कॅसिनो हॉटेल्स प्रकल्पांचे निर्माण होते आहे, आणि त्यासाठी नगर नियोजन खाते विशेष सुविधा देत आहे. त्याच वेळी हिंदू राष्ट्र, सनातन राष्ट्र आणि रामराज्य स्थापन करण्याच्या घोषणा मुख्यमंत्री करतात त्याला धाडस म्हणू नये तर आणखी काय. हे असे धाडस सर्वसामान्य व्यक्तीला शक्य नाही. विचारांनी ठाम असलेल्या कोणालाही असे निर्णय घेणे कठीणच. पण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे सहजपणे सिद्ध करून दाखवले आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या संस्कारांचा प्रभाव त्यांच्या निर्णयांवर स्पष्टपणे दिसतो. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांना नेहमीच भाजपातील ख्रिस्ती आमदार आणि मंत्र्यांना सांभाळण्यासाठी कसरत करावी लागली होती. पण डॉ. प्रमोद सावंत हे मात्र निर्धास्त आणि परखड आहेत. त्यांनी पक्ष आणि सरकारातील ख्रिस्ती आमदारांचे राजकीय महत्वच नगण्य करून दाखवत हिंदूत्वावादी विचारांचा पगडा प्रस्थापित करणे शक्य आहे,असे वातावरण तयार केले आहे. पर्रीकरांनी १० वर्षांपर्यंत प्रवेशबंदी घातलेल्या श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालीक यांच्यावरील बंदी त्यांनी उठवली. सनातन संस्थेच्या व्यासपीठावर जाऊन त्यांनी थेट हिंदू राष्ट्र निर्मितीचा घोषवारा करून राजकीय विरोधकांनाच प्रतिआव्हान दिले. युवा काळात नेहरू युवा केंद्रात धडे घेतलेले मुख्यमंत्री, भाजपमध्ये प्रवेश करून हिंदूत्ववादी आणि राष्ट्रवादी विचारसरणीत अधिक आघाडीवर गेले आहेत. त्यांचे धाडस आणि निर्णयशक्ती यामुळे भाजपच्या पारंपरिक नेत्यांनाही मागे टाकले आहे, हेच त्यांच्या भक्कम नेतृत्वाचे द्योतक म्हणता येईल.