वेदांताचे विषारी प्रदूषण आमोणावासियांच्या जीवावर
गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील आमोणा आणि सभोवतालच्या परिसरातील गावांमध्ये वेदांता कंपनीच्या पीग आर्यन प्रकल्पामुळे विषारी प्रदूषणाची घुस्मट सुरू आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने सादर केलेल्या पाहणी अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. याबाबत वेळीच उपाययोजना न झाल्यास आमोणासह सभोवतालच्या परिसरातील लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
लोखंडी भुकटीचा मारा
वेदांता कंपनीच्या आमोणा येथील पीग आर्यन प्रकल्पातून लोह व कोळशाची भुकटी संपूर्ण आमोणा गाव तसेच सभोवतालच्या परिसरात पसरली आहे. लोकांच्या घरात, विहिरीत, परसबागेत, शाळा, बाजार अशा सर्व ठिकाणी ही भुकटी स्पष्टपणे आढळून येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील जल व वायू प्रदूषणामुळे लोक त्रस्त आहेत. सरकारकडून लोकांपेक्षा वेदांता कंपनीचेच जास्त लाड केले जात असल्याने आता हे प्रदूषण लोकांच्या जीवावरच उठले आहे. मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याची भीती असल्याने लोक मुकाट्याने ही भुकटी खात व पित आहेत. मात्र लहान मुले व वृद्धांच्या आरोग्याबाबत तक्रारी वाढत असल्याने आमोणा परिसरातील लोकांचा संयम ढळू लागला आहे.
प्रदूषण मंडळाकडून शिक्कामोर्तब
आमोणाचे रहिवासी देवानंद सगूण सिनारी यांनी वेदांताच्या प्रदूषणाबाबतची तक्रार २४ डिसेंबर २०२१ रोजी केली होती. गेली चार वर्षे ही तक्रार प्रदूषण मंडळाकडे प्रलंबित होती. अलीकडे त्यांनी नव्याने स्मृतीपत्र पाठविल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने २० नोव्हेंबर २०२५ रोजी या परिसराची पाहणी केली. धक्कादायक बाब म्हणजे आमोणातील महत्त्वाच्या ठिकाणांसह माशेल व खांडोळा सरकारी महाविद्यालयापर्यंतचा परिसर लोह व कोळशाच्या भुकटीने प्रदूषित झाल्याचे उघड झाले. एकूण १५ ठिकाणांची पाहणी मंडळाने केली असता सर्वत्र विषारी लोह भुकटी आढळली. या पाहणीनंतर मंडळाच्या शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष वेदांता कंपनीच्या पीग आर्यन प्रकल्पातील भट्टीची पाहणी केली असता, या भट्टीतून लोह व कोळशाचे बारीक कण मोठ्या प्रमाणात हवेत तरंगत परिसरात पसरत असल्याचेही आढळले.
वेदांताची दादागिरी
राज्य सरकारची वेदांता कंपनीवर खास मर्जी असल्याने या कंपनीला विचारणारा कुणीच नाही, अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. या प्रदूषणाची संपूर्ण माहिती असूनही कुणालाच काळजी नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण दाखल्यातील अटींचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. वेदांताला कुणीही जाब विचारू शकत नाही आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही करू शकत नाही, अशी विचित्र अवस्था आमोणा व शेजारील गावांमध्ये निर्माण झाली आहे. या भीतीने लोक मुकाट्याने ही विषारी हवा खात-पित स्वतःच्या नशिबाला दोष देत जगत आहेत, असे भयावह चित्र आमोण्यात दिसून येत आहे.






