(आज २८ सप्टेंबर, शहीद भगतसिंग यांची जयंती. या निमित्ताने सुपरिचित मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रूपेश पाटकर यांनी २०१३ च्या मार्चमध्ये गुरुदेवांच्या पुण्यतिथीनिमित्त लिहीलेला लेख खास गांवकारीच्या डिजीटल वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत)
भारतीय परंपरेमध्ये गुरूस्मरणाला खूप महत्त्व आहे. इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे २८ सप्टेंबर हा माझ्या गुरूदेवांचा जन्मदिन तर २३ मार्च हा त्यांच्या महानिर्वाणाचा दिवस. त्यांनी या दिवशी हसत मुखाने इहलोकीचा त्याग केला. भारतीय परंपरेत गुरूंच्या स्मरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे दोन्ही दिवस त्यांचे स्मरण करण्याचे दिवस. का करायचे गुरूंचे स्मरण? ते प्रसन्न होऊन मनोकामना पूर्ण करतील म्हणून करायचे? की कृतज्ञतेने त्यांचे उपकार मानायचे म्हणून करायचे? की त्यांच्या आत्म्याला शांती लाभो यासाठी त्यांचे श्राद्ध म्हणून करायचे? गुरूंचे स्मरण यापेक्षा खूप वेगळ्या कारणासाठी करायचे असते. गुरूंनी आपल्याला जीवनाकडे बघायची वेगळी दृष्टी दिलेली असते. त्यांनी स्वतःच्या जीवनात या जीवनदृष्टीचा उपयोग करून मार्गक्रमण केलेले असते. त्यांचे स्मरण करून आपल्या मनात ही जीवनदृष्टी दृढ करायची असते. गुरूंनी त्यांच्या जीवनात कशी साधना केली, हे आठवून त्यांचे अनुकरण करायचे असते.
जीवनामध्ये गुरूंच्याकडून अनुग्रह घेतला, साधना सुरू केली आणि आपण सहज जीवनमुक्त झालो, असे होत नाही. जीवनात अनेक प्रलोभने असतात, ध्येयच्युत करणारे मोह असतात, अडचणी असतात, विवंचना असतात. साधनेच्या मार्गावरील या अडचणी मनाला चंचल बनवतात. या चंचल मनाला पुन्हा पुन्हा मार्गावर आणण्यासाठी आदर्शांचे स्मरण करणे गरजेचे असते. मनाकडून अभ्यास करवून घ्यावा लागतो. अध्यात्मिक वाटचालीत शाॅर्टकट नसतो. तिथे नवसाची लालूच उपयोगी पडत नाही. तिथे फेवरेटीज्म नसतो.
मी अध्यात्मिक वाटचाल असा शब्द वापरलाय खरा, पण अनेकजण त्याचा गूढवादी अर्थ, जादूई अर्थ गृहीत धरतात. पण मला अपेक्षित असलेला अर्थ वेगळा आहे. मला जी काही अध्यात्माची व्याख्या माझ्या अध्यात्मिक गुरूंकडून समजली, त्यानुसार सर्वव्यापित्वाची जाणीव म्हणजे जीवनमुक्ती. आणि ती साध्य करण्याची वाटचाल म्हणजे आध्यात्मिक साधना!
गुरू तुम्हाला शोधावा लागत नाही, योग्य वेळी तो तुम्हाला स्वतःहून येऊन भेटतो. पण ती योग्य वेळ म्हणजे काही ठराविक मुहूर्त किंवा जादूई घटना असे मानण्याचे कारण नाही. उलट तुमचा मानसिक विकास होत असताना आतापर्यंत तुमच्या अवतीभवती असलेलाच गुरू तुम्हाला अनुग्रह देतो.
माझ्या गुरूदेवांना मी लहानपणापासून ओळखत होतो. त्यांच्याविषयी मी वाचलेदेखील होते. पण त्यांचा अनुग्रह मात्र मला वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी झाला. आणि तोदेखील ग्रंथ साक्षात्काराच्या रूपाने! या साक्षात्कारानंतर मी हादरून गेलो, अस्वस्थ झालो. माझ्या सर्व पूर्वकल्पनांना, गृहितकांना, विचारांना माझ्या गुरूदेवांनी मुळापासून हादरविले.
त्यांनी मला ‘सोहं’चीच दीक्षा दिली, पण त्यांनी सांगितलेला ‘सः’चा अर्थ मात्र मला ठाऊक असलेल्या अर्थाच्या विरूद्ध होता. ते ‘सः’ला ‘चिन्मय’ न मानता ‘जड’ मानत होते. हेच माझ्या तोपर्यंतच्या विचारांना छेद देणारे होते.
परंतु हे शिकवणाऱ्या माझ्या गुरूंची अवस्था मात्र ‘स्थितप्रज्ञ’ होती. भगवद्गीतेतील दुसर्या अध्यायात जी स्थितप्रज्ञाची लक्षणे वर्णन केली आहेत,
नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे।
नसे तृष्णा भय क्रोध तो स्थितप्रज्ञ संयमी।।
त्याप्रमाणे होती.
माझ्या गुरूदेवांचे त्यांच्या तेविसाव्या वर्षीच महानिर्वाण झाले. त्यांचा मृत्यू त्यांना कित्येक दिवस आधी ठाऊक झाला होता. पण त्यांच्या मनाची स्थिती ‘निर्वाती ठेविला दीप तेवतो एकसारखा’ अशी होती. मृत्यू समोर दिसत असताना अजिबात विचलित न होता ते आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते.
त्यांना त्यांचा मृत्यू चुकवता आला असता, परंतु त्यांनी तो चुकवला नाही. त्यांचा कोवळ्या वयातील मृत्यू टळावा म्हणून त्यांचे वडील याचना करू लागले तर त्यांनी ते स्पष्टपणे नाकारले.
मृत्यूच्या दिवशी तर ते शांतपणे वाचन करत होते. ते दृश्य म्हणजे श्रीकृष्णाने गीतेत म्हटल्याप्रमाणे पुढील श्लोकाची मूर्त प्रचिती होती,
‘करावे मिळवावेसे नसे काही जरी मज।
तिन्ही लोकी तरी पार्था कर्मी मी वागतो चि की।।
माझे गुरूदेव तरूण होते. जेमतेम तेवीस वर्षांचे आयुष्य जगले, पण ते जन्मतःच जीवनमुक्त होते असे मात्र मी म्हणणार नाही. त्यांचा जन्म समृद्ध कुटूंबात झाला. त्याग, बलिदानाची परंपरा असलेले त्यांचे कुटूंब होते. असे सांगतात की त्यांचा जन्म झाला तेव्हा त्याकाळच्या राजवटीने त्यांच्या काकांना व वडिलांना तुरुंगात डांबले होते. कशासाठी? तर त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता म्हणून.
माझ्या गुरूदेवांना मनोनिग्रह करण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागले नसल्याचे दिसते. समृद्ध घर, रूबाबदार व्यक्तिमत्त्व लाभलेल्या आणि ऐन यौवनात असलेल्या वयात प्रेयसी, पैसाअडका, धंदा-व्यवसाय यांची स्वप्ने त्यांनी पाहीलीच नाहीत. उलट ध्येयप्राप्तीसाठी त्यांनी घरदार सोडले, आणि तेदेखील अगदी सहज. घर सोडल्यानंतर सोन्याचा चमचा तोंडात धरून जन्मलेल्या माझ्या गुरूदेवांचे आयुष्य प्रचंड खडतर बनले, पण त्यांच्या आज उपलब्ध असलेल्या साहित्यात त्याची वेदना, खेद किंवा खंत कुठेच डोकावत नाही.
मग कशी साधली असेल त्यांनी ही शांतीची स्थिती? मला वाटते की सतत दुसर्यांचा, सतत रंजल्यागांजल्यांचा विचार केल्यामुळे त्यांच्या मनातून व्यक्तिगत दुःख कायमचे नाहीसे झाले असावे. त्यांना मी आणि माझे राहीलेच नाही. रामकृष्ण परमहंस म्हणतात, ‘मी व माझे यांचे भले व्हावे यासाठी प्रयत्न करणे ही ‘माया’ आणि ज्यांचा आपल्याशी संबंध नाही अशांच्या भल्यासाठी प्रयत्न करणे ही ‘दया’. माया माणसाला बंधनात अडकवते तर दया माणसाला मुक्तीपथावर नेते!’ संत तुकाराम देखील म्हणतात, ‘जे का रंजले गांजले। त्यासि म्हणे जो आपुले। तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।’
अजूनपर्यंत मी तुम्हाला माझ्या गुरूदेवांचे नाव सांगितले नाही. मी तुम्हाला त्यांचे नाव सांगितले तर मी त्यांना माझे अध्यात्मिक गुरू म्हटले यावर विश्वास बसणार नाही. कारण ते अध्यात्मिक गुरू म्हणून प्रसिद्ध नव्हतेच मुळी. तुम्हीही त्यांना ओळखता, पण एक क्रांतिकारक म्हणून. सेंट्रल असेंब्लीत बाँब फेकणारे आणि साॅन्डर्सचा वध करणारे म्हणून. तुम्ही त्यांचाकडून देशभक्तीची प्रेरणा घेत असाल. त्यांच्या शौर्याच्या रोमहर्षक कथा वाचून तुमचे रक्त सळसळले असेल. पण मी त्यांना गुरू म्हणून स्विकारले, ते त्यांच्या जीवनातील रोमहर्षक प्रसंगांमुळे नव्हे. मी त्यांचा जो गुरू म्हणून स्विकार केला तो त्यांच्या साहित्याच्या वाचनाने. यालाच मी ‘ग्रंथसाक्षात्कार’ म्हणतो. त्यांच्या लेखांनी मला माझी जूनी गृहीतके तपासायला भाग पाडले. त्यांनी नवसाला पावणाऱा, स्तुतीने खुश होणारा, कठोर न्याय करणारा, मंत्रांनी कामाला लावता येणारा देव नाकारला. जर तुमच्या पुजापाठांनी आणि मंत्रोच्चारांनी देव तुमच्या मनोकामना पूर्ण करत असेल तर तो सर्वशक्तिमान कसा असेल?
देवाची ही संकल्पना कमकुवत मनाचा काल्पनिक आधार आहे असे ते लिहीतात. आणि हे त्यांनी केव्हा लिहीले? ते तुरुंगात असताना, त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा जाहीर झाली असताना. थोडा विचार करा, आम्हा सामान्य माणसांना देव सर्वात तीव्रपणे केव्हा आठवतो? जेव्हा आम्ही संकटात असतो तेव्हा. आणि भगतसिंग देव केव्हा नाकारत आहेत? जेव्हा त्यांचा मृत्यू निश्चित झालाय, मृत्यूची तारीख ठरली आहे तेव्हा. त्यांना अशावेळेस तीव्रपणे देवाचा धावा करावासा वाटणे स्वाभाविक झाले असते. पण ते तो करत नाहीत. उलट दयेचा अर्ज करू पहाणार्या आपल्या वडीलांना ते खडे बोल सुनावतात.
भगतसिंगांचे असे मृत्यूला सामोरे जाणे प्रत्यक्ष रणभूमीवर आवेशात उडी घेण्यासारखे नाही. हे जपानी पायलटांसारखे हाराकीरी करणे नाही. हा ‘स्थिरबुद्धी’ने घेतलेला निर्णय आहे. याचा विचार करता, त्यांच्या उन्नत मानसापुढे मान झुकवल्याशिवाय मला पर्याय नव्हता. त्यांच्या निबंधात त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यांची उत्तरे माझ्या मनाला देता आली नाहीत. काहीतरी थातूरमातूर उत्तरे देऊन मी त्यांचे मुद्दे कदाचित निकाली काढूही शकलो असतो. पण त्यांच्या ‘स्थितप्रज्ञ’ व्यक्तीमत्वामुळे मला तसे करण्याचे धाडस झाले नाही. “जर परमेश्वर आनंदस्वरूप आहे, तर तो जगात दुःख निर्माणच का करतो? तो परमपिता आपल्या मुलांना संकटापासून वाचवत का नाही? पापी लोकांना पाप करण्यापासून थांबवत का नाही? त्याची ती लीला आहे म्हणून मला सांगू नका. कारण मग आपल्या मुलांना दुःखात लोटून लीला करणाऱ्या तुमच्या देवात आणि रोमला आग लावून फिडेल वाजवत बसणाऱ्या सम्राट नीरोत काय फरक राहील? तुमचा परमेश्वर परीक्षा घेतो म्हणाल तर दीडदोन वर्षाचे काहीही कळत नसलेले मूल उपासमारीने मरते तेव्हा तो त्याची कोणती परीक्षा घेत असतो? ज्याची परीक्षा घेतली जातेय, त्याला कळायला तर हवे ना.” भगतसिंगांच्या या प्रश्नांची उत्तरे मी देऊ शकलो नाही.
भगतसिंगांच्या मृत्यूची तारीख निश्चित झाली होती. २४ मार्च १९३१ ला त्यांना फाशी दिले जाणार होते. तथापि आदल्या दिवशी संध्याकाळीच त्यांना फाशी देण्याचा हुकूम जेलरला आला. जेलर जेव्हा त्यांना फाशीच्या तक्ताकडे नेण्यासाठी त्यांच्या कोठडीत पोचला तेव्हा त्याला दिसले की भगतसिंग एक पुस्तक वाचत आहेत. ते रशियन क्रांतिकारक लेनीन यांचे ‘शासन संस्था आणि क्रांती’ हे पुस्तक वाचत होते. तुम्ही किंवा मी त्यांच्याजागी असतो तर फाशीच्या आदल्या दिवशी असे एखादे पुस्तक वाचू शकलो असतो काय? ‘स्थितप्रज्ञ’ अवस्था गाठल्याशिवाय हे शक्यच नाही.
आज आम्ही त्यांचा उदोउदो करतो. पण त्यांच्या काळात किती लोकांपर्यंत त्यांचं बलिदान कळलं असेल? किती लोकांनी त्यांचं कौतुक केलं असेल? आणि मृत्यूची किंमत चुकवून कोण माणूस अशी प्रतिष्ठा मिळवण्याचा प्रयत्न करील? त्यामुळे प्रतिष्ठेचं, नावलौकिकाचं प्रलोभन त्यांच्यापुढे नव्हतंच कधी हे साहजिक आहे. उलट ते म्हणतात, “एवढ्या छोट्याशा आयुष्यात इंकिलाब झिंदाबाद ही घोषणा देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवली हीच या जीवनाला खूप मोठी किंमत मिळाली.”
त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून लिहीले, “माझ्या गळ्याभोवती ज्या क्षणी फास आवळला जाईल, त्याचक्षणी मी या कटकटीतून सुटेन, पण तुम्हाला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तुमचा संघर्ष अधिक खडतर असणार आहे!”
ते आणखी एका ठिकाणी लिहीतात, “क्रांति म्हणजे बाँब आणि बंदूकांचा संप्रदाय नव्हे. आम्ही ‘क्रांती’ या शब्दाला पवित्र मानतो. माणसाचे माणसाकडून होणारे शोषण थांबवणे म्हणजे क्रांती!” त्यांच्या या वाक्याने मला आणखी एकदा हादरविले. कारण त्याआधी माझी अशी धारणा होती की क्रांती म्हणजे सशस्र संघर्ष, क्रांती म्हणजे परकीय सत्ताधाऱ्यांना सशस्र उठाव करून घालवून देणे. आपल्या देशावर आपल्याच लोकांचे राज्य असावे यासाठी शस्त्र हाती धरणे. पण भगतसिंग क्रांतीची पार वेगळी व्याख्या सांगत होते. ‘माणसाने माणसाचे चालवलेले शोषण थांबवणे म्हणजे क्रांती!’ ते रोकडा प्रश्न विचारत होते, “लाॅर्ड आयर्नविनच्या जागी तेज बहाद्दुर सप्रू जाऊन बसले म्हणून काय फरक पडणार?” त्यांच्या काळात कदाचित माझ्यासारख्या सामान्य जनतेला त्यांना काय म्हणायचे होते ते लक्षात आले नसेल. पण आज त्यांना काय म्हणायचे होते ते अनुभवाने आपल्या लक्षात येतेय. राज्यकर्त्या माणसांचा रंग, वंश, धर्म बदलून काहीही फरक पडत नाही.
त्यामुळेच ब्रिटिश वंशाच्या साॅन्डर्सवर पिस्तूल चालवणारे भगतसिंग अस्पृश्यतेच्या प्रश्नांवर लिहीतात. अस्पृश्याकडून जाहीरपणे हार घालून घेणारे नेते त्यानंतर स्वतःच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी नेसत्या वस्त्रानिशी स्नान करतात, यातील पाखंड ते मांडतात. आपल्याच देशातील, आपल्याच धर्मातील घटकांना आपलेच लोक सामुहिक गुलामीत ठेवतात हे त्यांच्या क्रांतिकारक नजरेतून सुटत नाही. ते साहित्याच्या प्रश्नावर लिहीतात, भाषेच्या प्रश्नावर लिहीतात. जगातील वेगवेगळ्या तत्त्वज्ञानांचा अभ्यास करून त्यावर लिहीतात. आयर्लंडच्या मुक्तीलढ्यातील आयरीश क्रांतिकारकाच्या आत्मचरित्राचा अनुवाद करतात.
‘बहीऱ्यांना ऐकू जाण्यासाठी’ म्हणून त्यांनी सेंट्रल असेंब्लीत बाँब फेकला. त्यांना राज्यकर्त्या बहीर्यांना काय ऐकवायचे होते? सरकार पास करू इच्छित असलेल्या ‘ट्रेड डिस्प्युट बिल’ आणि ‘पब्लिक सेफ्टी बिल’ या बिलांना जनतेचा विरोध आहे, हेच ते सांगत होते. ट्रेड डिस्प्युट बिल कामगारांच्या हक्कांवर गदा आणत होते. कामगारांना वाटेल तसे पिळून घ्यायला भांडवलदारांना खुला परवाना देण्यासाठीच हे बिल होते.
शोषित अन्यायग्रस्त समाज प्रतिक्षिप्त क्रियेसारखा बंड करून उठत असतो. पण त्याच्या बाजूने युद्धात उतरणार्याला मात्र जाणीवपूर्वक उतरावे लागते. गीता म्हणते,
‘गुंतूनि करिती अज्ञ ज्ञात्याने मोकळेपणे।
करावे कर्म तैसे चि इच्छुनि लोकसंग्रह।
भगतसिंग कष्टकरी कामगार शेतकऱ्यांच्या बाजूने धर्म युद्धात उतरले होते.
भगतसिंगांना कामगारांचं, शेतकऱ्यांचं, अस्पृश्यांचं दुःख स्वतःचं वाटत होतं. हीच सर्वव्यापित्वाची अनुभूती होती.
खरं तर वर उल्लेख केल्याप्रमाणे त्यांचं घराणं समृद्ध श्रीमंत होतं. त्यांना कशाचीच ददात नव्हती. पण त्यांनी घर सोडून फकिरी पत्करली. कधी एखाद्या पेपरच्या कचेरीत तर कधी एखाद्या झाडाखाली. कित्येक दिवस तर ते अर्धपोटी राहीले. हे संन्यासी जीवन होते!
असेंब्लीत बाँबस्फोट केल्यानंतर त्यांनी स्वतःला अटक करवून घेतली आणि लगेचच त्यांच्या बहुतेक सहकार्यांनादेखील अटक करण्यात आली. जे पकडले गेले नाहीत असे चंद्रशेखर आझाद अल्फ्रेड पार्कमधील चकमकीत हुतात्मे झाले तर दुसरे एक साथी भगवतीचरण हातात बाँब फुटून शहीद झाले. त्यांची सगळी संघटना संपल्यासारखी झाली. खर तर ही निराशा आणणारी स्थिती होती, पण भगतसिंग निराश नव्हते. त्यांचे म्हणणे होते की जोपर्यंत समाजात शोषण आहे, वर्ग आहेत, तोपर्यंत संघर्ष थांबणार नाहीत. कधीकधी हरायला होईल, सगळे थंडावले असे वाटेल. पण पुन्हा शोषित उसळी मारतील. जगाचा इतिहास हेच तर दाखवत आलाय.
मृत्यूला हा माणूस अक्षरशः हसत सामोरा गेला. थोडंसंच आयुष्य जगला, पण रसरसून जगला. रडगाणी, वैयक्तीक तक्रारी हे त्याच्या मनात औषधापुरतं देखील नव्हतं. गरीब कष्टकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठीच तो इंकिलाब आणत होता. सर्वांचं दुःख आपलं मानल्यामुळे त्याला स्वतःचं दुःख उरलं नाही.
ज्या ज्या वेळी माझं मन निराश होतं, परिस्थितीला शरण जाऊ पहातं, त्या त्या वेळी भगतसिंग माझा आधार बनतात. त्यांची आठवण मला माझ्या प्रत्येक विचलीततेनंतर धर्ममार्गावर यायला प्रवृत्त करते.
……
डॉ. रुपेश पाटकर
युवकांना व्यक्त व्हावंच लागेल
गोव्यात सध्या नोकरीसाठी रोख देण्याच्या प्रकरणांमध्ये बरीच वाढ होत असल्याने तो चिंतेचा विषय ठरला आहे. अनेक बेरोजगार तरूण सरकारी नोकरीच्या आशेने या तथाकथित दलालांच्या जाळ्यात अडकून लाखो रूपयांना गंडवले गेले…