
आपल्या सगळ्या बेकायदा, भ्रष्टाचार आणि लुटमारीच्या कारभाराचे लाभार्थी तयार झाले आहेत, आणि हे लाभार्थी पक्षाचे कार्यकर्ते बनून उघडपणे या सरकारचे आणि प्रशासनाचे समर्थन करत आहेत.
आज गोवा क्रांतीदिन. १८ जून १९४६ रोजी डॉ. राम मनोहर लोहीया यांनी मडगावात गोवा मुक्तीच्या क्रांतीची ठिणगी पेटवली. डॉ. जुलीयांव मिनेझिस यांच्या घरी विश्रांतीसाठी आलेल्या लोहीयांना गोव्याची परिस्थिती उमजल्यावर ते लगेच रस्त्यावर उतरले आणि त्यांनी गोवा मुक्तीची चेतना जागृत केली. या क्रांतीचे लोण हळूहळू पसरले आणि तब्बल १५ वर्षांनंतर गोव्याला अखेर मुक्ती मिळाली. हा १५ वर्षांचा काळ बराच काही सांगून जातो. गोंयकारांना पेटून उठायला वेळ लागतो, पण तो हळूहळू सावकाश पेटतो. आज गोवा विविध प्रश्नांमुळे धगधगत आहे. ज्या ७३ हुतात्म्यांनी गोव्यासाठी आपले बलिदान दिले आणि हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी छळ, हालअपेष्टा सहन केल्या, त्यांच्या योगदानातून आपल्याला मुक्ती मिळाली. परंतु हीच ती मुक्ती आहे का, ज्यासाठी ते लढले होते? आज आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच आपल्या राज्याचे शासन चालवतात, पण हेच लोक आज आपल्या राज्याचे शत्रू बनू लागले आहेत. मग परदेशी राजवटीविरोधात लढण्याचा जो जोश आपल्या पूर्वजांनी दाखवला, तोच जोश आम्ही स्वकीयांविरुद्ध दाखवू शकतो का? ज्येष्ठ पत्रकार संदेश प्रभूदेसाई यांनी एका परिसंवादात म्हटल्याप्रमाणे गोव्यात दर १५ ते २० वर्षांत एखादी मोठी चळवळ किंवा क्रांती झालेली आहे. गोवा मुक्तीनंतर जनमत कौल, कोकणी भाषेचे आंदोलन, विद्यार्थी आंदोलन, प्रादेशिक आराखडा आंदोलन आदींचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. आजच्या घडीला तो टप्पा पुन्हा आला आहे. आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात पुन्हा एक नवी चळवळ किंवा क्रांती उभी राहील, असे संकेत मिळत आहेत. आज विकासाच्या नावाने आपले जीवन सुसह्य होण्याऐवजी असहाय्य होत आहे. विकासाची व्याख्या आपले लोकप्रतिनिधीच ठरवतात आणि तो विकास लोकांवर लादला जात आहे. लोकांना विश्वासात न घेताच विकास थोपवला जात आहे. विशेष म्हणजे ह्याच विकासाच्या नावाने जनतेच्या पैशांची उधळपट्टी करून आपले खिसे भरण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. गोवा मुक्तीपूर्वी तत्कालीन सालाझारने काही गोंयकारांना आपल्या कवेत घेतले होते. हे गोंयकार पोर्तुगीज राजवटीचे उघड समर्थन करत होते. ही पोर्तुगीजधार्जिणी जात अजूनही गोव्यात आहे. आजच्या घडीला विद्यमान राजकीय व्यवस्थेने हेच धोरण पुढे सुरू ठेवले आहे. आपल्या सगळ्या बेकायदा, भ्रष्टाचार आणि लुटमारीच्या कारभाराचे लाभार्थी तयार झाले आहेत आणि हे लाभार्थी पक्षाचे कार्यकर्ते बनून उघडपणे या सरकारचे आणि प्रशासनाचे समर्थन करत आहेत. आपला गोवा खूप छोटा आहे. या छोट्या राज्यावर अनन्वित अतिक्रमण होत राहिले, आणि स्थलांतरितांचे लोंढे या भूमीवर स्थायिक होत राहिले, तर मग इथला मूळ गोंयकार बाहेर फेकला जाणे स्वाभाविक आहे. सक्षमच या भूमीवर टिकून राहील, असा निसर्ग नियम आहे. इतर राज्यांच्या तुलनेत आपण खूप मागे आहोत, त्यामुळे या स्थलांतरितांना तोंड देण्याचे किंवा त्यांच्याशी स्पर्धा करण्याचे बळ आपल्यात नाही, हे आपण मान्य करायलाच हवे. आपली गत कस्पटासमान होईल. अशा परिस्थितीत ही गंभीर आणि धोकादायक परिस्थिती टाळण्यासाठी आपल्या सुरक्षेसाठी आपल्याला ही क्रांती घडवून आणावी लागेल. परंतु त्यासाठी विलंब करून चालणार नाही.