
आयुष्यात एकदा तरी वारी करावी, “माऊली माऊली” चा गजर करीत, कपाळावर वारकरी टिळा लावत, पायी चालत विठोबाच्या चरणी पोहोचण्याचा अनोखा आध्यात्मिक अनुभव घ्यावा! मी स्वतःला नशिबवान समजतो कारण गेल्या वर्षी मला प्रथमच आषाढी एकादशीला पायी वारी करण्याचे भाग्य लाभले. टाळ-मृदंगाच्या विठ्ठलनामाच्या गजरात एक-एक पाऊल पंढरपूरच्या दिशेने टाकणाऱ्या वारकऱ्यांच्या भक्तिभावाची अनुभूती मी प्रथमच घेतली.
पंढरपूर वारी (दिंडी), ज्याला आषाढी एकादशी वारी असेही म्हणतात, हा महाराष्ट्रातील पंढरपूरमध्ये साजरा होणारा वार्षिक महान उत्सव आहे. पंढरपूर ही महाराष्ट्राची धार्मिक राजधानी मानली जाते. हा उत्सव भगवान विष्णूचा अवतार असलेल्या विठोबाला समर्पित आहे. दरवर्षी मराठी महिन्यात आषाढी एकादशीला तो साजरा केला जातो. अनेक भक्त मोठ्या गटांमध्ये एकत्र येतात आणि पंढरपूरच्या दिशेने पायी यात्रा करतात. या प्रक्रियेला वारी म्हणतात आणि जे वारी करतात त्यांना वारकरी म्हणतात. या वारीला दिंडी असेही म्हटले जाते. वारकऱ्यांचा समूह म्हणजेच दिंडी. या दिंडीमध्ये विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती, तसेच संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालखीत संतांच्या पादुका वाहून नेल्या जातात.
वारकरी संप्रदाय व विठोबाचे नाते हे अनोखे आहे. ही परंपरा महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून टिकून आहे, आणि आता गोव्यातही ती जोमाने फुलत आहे. गोव्यातूनही हजारो वारकरी पंढरपूरच्या दिशेने वारी करताना दिसतात. त्यांच्या ओढीपैकी एक म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंडळ, दक्षिण गोवा यांनी आयोजित केलेली तिसरी पायी वारी. सोमवार, १ जुलै २०२४ रोजी विठ्ठल मंदिर तारीर काणकोण येथून वारीची सुरुवात झाली आणि बाळ्ळी शांतादुर्गा बाळ्ळीकरीण देवस्थानच्या सभागृहात पहिला मुक्काम संपन्न झाला.
माझा प्रवास २ जुलै रोजी श्री सोमनाथ देवस्थान, अडणे येथून सुरू झाला. पांढऱ्या शुभ्र कुर्त्यात, मंडळाने दिलेला ८८ क्रमांकाचा लाल बोटवा, त्यात जेवणासाठी ताट-पेला, रेनकोट, हरीपाठाचे पुस्तक, डोक्यावर पांढरी टोपी, गळ्यात वारकरी ओळखपत्र, आणि खांद्यावर वारीची गुंडी घेऊन मी निघालो. संजय वेळीप यांनी वारकऱ्यांसाठी ठेवलेल्या नाश्त्याचा आस्वाद घेऊन, माझे पहिले वारीचे पाऊल पंढरपूरच्या दिशेने पडले.
वारीचा प्रवास सुरू…
“विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल!” या गजरात अडणे-आंबावली मार्गे जाताना असंख्य विठ्ठलभक्तांकडून विठ्ठलमूर्तीची ओवाळणी स्वीकारत आम्ही केपे पेट्रोल पंपाजवळ पोहोचलो. तेथे केपे येथील दुर्गादेवी मंडळाने स्वागत केले. त्यानंतर थेट संत ज्ञानेश्वर माऊली मठ, केपे मंदिरात पोहोचलो.
मंगळवारी, २ जुलै रोजी सकाळी मडगावच्या हरी मंदिरात सुरू झालेली पायी वारी रावणफोंड, पारोडा मार्गे केपे येथे संत ज्ञानेश्वर मठात पोहोचली. तेथे हरीपाठ आणि आरत्या झाल्या. दुपारच्या जेवणानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. वरिष्ठ वारकरी मारुती मेस्त्री यांच्या निवासस्थानी पोहोचलो. याच वारीतून गेल्यावर्षी विदेशापर्यंत लोकप्रियता मिळवलेल्या श्वान वारकऱ्याने आपल्या दुसऱ्या वारीची सुरुवात केली.
तिथून कुडचर्डे बाजार मार्गे सावर्डे धडे येथे सिद्धारूड देवस्थान पर्यंत पोहोचलो आणि रात्रीचा विसावा घेतला. हरीपाठ आणि आरती झाल्यावर मंडळाने दंड, विणा, तुळस आणि कळस घेण्यासाठी कुपनांच्या माध्यमातून क्रमांक काढले. त्यात माझा ८८ क्रमांक पहिल्याच फेरीत निघाला, त्यामुळे मला दंड मिळाला! सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या. पहाटे ५ वाजता उठण्याचे आदेश देण्यात आले. देवस्थानाच्या वतीने जेवणाची, स्नानासाठी आणि विश्रांतीसाठी उत्तम व्यवस्था केली होती.
सकाळी लवकर उठून आम्ही तयारी केली. अरुण नाईक उर्फ मामा माऊलींनी कपाळावर टिळा लावला. सर्व माऊलींना “राम कृष्ण हरी” म्हणून चरणस्पर्श केल्यानंतर मला लाल कपडे परिधान करून गळ्यात दंड घालण्यात आला. अशोक माऊलींनी पांढरे कपडे घातले आणि त्यांच्या गळ्यात विणा घालण्यात आली. तुळस आणि कळस महिला माऊली घेतात, त्यानुसार त्यांच्या डोक्यावर तुळस व कळस देण्यात आले. दंड, विणा, तुळस आणि कळस घेतल्यानंतर कोणाचेही चरण स्पर्श करायचे नसतात. दंड घेणारा वारकरी “दंडाधिकारी” असतो, आणि त्याच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही, अशी माहिती वरिष्ठ वारकऱ्यांनी दिली.
पहिल्या दिवशीचा प्रवास
ठीक ६:०० वाजता आमचा प्रवास सुरू झाला. करमणे येथे गुरुदास मामलेकर यांच्या घरी नाश्ता करण्यासाठी थांबलो. त्यांनी आमच्या पायावर पाणी टाकून पाय धुवून दिले, गंध-फुले लावून आरती ओवाळली आणि सन्मानाने घरात प्रवेश दिला. तेथून पुढे सातेरी मंदिर, शिगाव येथे दुपारचे जेवण झाले. दररोज रात्री आणि दुपारी जेवण करण्यापूर्वी दंड, विणा, तुळस आणि कळस घेण्यासाठी क्रमांक काढण्याची प्रथा होती. दुपारी ३:०० वाजता पुढील प्रवास सुरू झाला. मनिषा लंबोर यांच्या निवासस्थानी चहा घेतला आणि संध्याकाळी ६:०० वाजता मोले पंचायत सभागृहात मुक्कामासाठी पोहोचलो.
धबधब्याचा आनंद आणि वाढदिवसाचा आगळा अनुभव
चौथ्या दिवशी पहाटे ५:०० वाजता प्रचंड पावसाच्या धारा सोसत, धबधब्याच्या पाण्याचा आनंद घेत दूधसागर मंदिराजवळ नाश्ता केला. दुपारी रवी पटेल यांच्या स्वस्तिक रेस्टॉरंट, अनमोड घाटावर जेवण करून थेट विठ्ठल मंदिर, अनमोड येथे मुक्कामासाठी पोहोचलो. याच ठिकाणी माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण घडला. मी १३० विठ्ठल माऊलींसोबत पहिल्यांदाच वाढदिवस आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे भाग्य मिळवले!
महाराष्ट्र-कर्नाटकातील वारकऱ्यांची सेवा आणि मान-सन्मान वारीच्या पुढील प्रवासात भिमगड अभयारण्य, शिरोली येथे पोहोचलो. येथे हनुमान मंदिरात वारकऱ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये वारकऱ्यांना देवाप्रमाणे सेवा दिली जाते. गोव्यातून प्रवास सुरू करताना ४२१ किलोमीटरचे अंतर पूर्ण करून पंढरपूर पोहोचण्याचा विचार मनात होता. परंतु महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हिरवीगार शेती, तिथले शेतकरी आपल्या बैलजोडीसह शेती करताना वारकऱ्यांच्या चरणाशी नतमस्तक होताना पाहून मन भरून आले! माझ्या मनात कायम राहिलेला हा अनुभव अविस्मरणीय आहे.
वारीचा दिनक्रम वारीमध्ये दररोज सकाळी ६:०० वाजता प्रवास सुरू केला जायचा. प्रत्येक दिवशी ३०-३५ किलोमीटरचे अंतर पार करून रात्री मंदिराच्या परिसरात मुक्काम व्हायचा. मुक्काम स्थळी पोहोचल्यानंतर: १० मिनिटे विठ्ठलनामस्मरण, अध्यक्ष डॉ. गुरुदास नाईक यांच्याकडून १० मिनिटे गोष्टी, हरीपाठ, आरती आणि जेवण, रात्री १२ वाजेपर्यंत आंघोळ, कपडे धुणे आणि विश्रांती, पहाटे ४ वाजता उठणे, आंघोळ करून तयार होणे, ५:००-६:०० वाजेपर्यंत चालायला सुरुवात, ९:०० वाजता नाश्ता, १:०० वाजता जेवण, ५:०० वाजता चहा, रात्रीचे जेवण.
पंढरपूर वारीचा अनोखा अनुभव
गोवा ते पंढरपूर हा पायी प्रवास केवळ शारीरिक नसतो, तर तो मानसिक आणि भावनिक आहे. या प्रवासात अनेक चांगले आणि कठीण अनुभव आले. गोव्यातील अनेक विठ्ठल भक्त वारकऱ्यांना मदत करतात, तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील भागांतूनही विठ्ठल भक्तांकडून मोठ्या प्रमाणात सहाय्य मिळते.
वारीतील प्रत्येक वारकरी विठ्ठल-रखुमाईचे रूप पाहतो आणि “माऊली माऊली” म्हणत एकमेकांना सन्मान देतो. वारीत सहभागी झाल्यावर दैनंदिन जीवनातील सर्व चिंता बाजूला राहतात आणि मनाला शांती व सकारात्मक ऊर्जा मिळते. वारकरीही एकमेकांची काळजी घेतात, “एकमेका साहाय्य करू…” हा अनुभव प्रत्यक्षात येतो. म्हणूनच वारकरी म्हणतात, “वारी आयुष्यात एकदा तरी करायलाच हवी!”
अखंड भक्तीचा प्रवास
या यात्रेतील सर्वात प्रेरणादायक वारकरी म्हणजे बाळकृष्ण लिंगवत माऊली. वय ६१ वर्षे, दोन्ही पायांच्या तळव्यांवर मोठे फोड असूनही ते आमच्यासोबत समर्पित भक्तीभावाने चालत होते. विसाव्याच्या ठिकाणी ते आरती व भजनासाठी पेटी घेऊन सर्वात पुढे बसायचे. यांना पाहून वाटते की ही वारी म्हणजे अखंड भक्ती आणि निष्ठेचा उत्तम नमुना आहे.
वाटेवर चालताना निसर्गाच्या सौंदर्याचा आणि ग्रामीण भागातील शांततेचा अनुभव मिळतो. हा प्रवास इच्छाशक्ती आणि दृढनिश्चयाची परीक्षा असतो, कारण हे संपूर्ण अंतर पायी पार करणे म्हणजे सहनशक्तीची कसोटी! म्हणूनच वारी मानसिक आणि भक्तिभावाने केली जाते, आणि वारकरी मित्र व परिवार सदस्यांसारखे एकमेकांची सेवा करतात.
भक्तांकडून मिळणारे अनमोल सहकार्य
वारीत मंडळाच्या वतीने वारकऱ्यांची उत्तम काळजी घेतली. जेवण व राहण्याची व्यवस्था व्यवस्थित होती, नाश्ता आणि जेवण तयार करण्यासाठी वारीसोबत दोन वाहने होती, वाटेवर भक्तगण वारकऱ्यांना फळे, मिठाई, पोहे, चहा आणि पाणी देत असतात, काही डॉक्टर आणि नर्सेस मोफत आरोग्य तपासणी व उपचार देतात, तसेच पायाच्या वेदना दूर करण्यासाठी मालिश करतात, या सेवेसाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही. “भगवान आपल्या भक्तांना कुठल्या रूपात भेटतील, हे कोणालाही माहीत नसते!” म्हणूनच लोक वारकऱ्यांची सेवा करण्यास महान भाग्य मानतात.
श्री क्षेत्र पंढरपूरात पोहोचण्याचा सोहळा
१५ जुलै. हा सप्तरंगांनी नटलेला दिवस उजाडला! आता मात्र पंढरपूरला पोहोचण्याची लालसा अधिक तीव्र झाली. पहाटे ४:०० वाजता उठून तयारी केली, आणि ७:०० वाजता प्रवास सुरू झाला. दुपारी वन विभागात जेवण केल्यानंतर ३:०० वाजता श्री क्षेत्र पंढरपूरात प्रवेश झाला!
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर सजले होते. लाखो भक्त भक्तिगीते गाताना, वाद्ये वाजवताना, गुंडी व बॅनर घेऊन चालताना दिसत होते, वातावरण आनंद आणि श्रद्धेने भारलेले होते, चंद्रभागा नदीच्या तीरावर विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तींचे आगमन झाले, भाविकांची अलोट गर्दीमुळे नदीचा तटही दिसत नव्हता, रिंगण घातले गेले, आरती झाली, आणि मग चंद्रभागा नदीत स्नान करून मंदिराला प्रदक्षिणा घालून वारीची सांगता झाली!
देवदर्शन – भक्तांचा परम आनंद
पंढरपूर मंदिरात विठ्ठल-रखुमाईच्या चरणदर्शनासाठी २०-२२ तास रांगेत उभे राहावे लागते. आषाढी एकादशीच्या दिवशी अधिक प्रतीक्षा करावी लागते. काही भक्त मुखदर्शन घेतात, तर काही मंदिराला प्रदक्षिणा घालून समाधान मानतात. आम्ही मात्र पहाटे ३:०० वाजता उठून आंघोळ करून रांगेत उभे राहिलो आणि १:३० तासांनी विठोबाचे व रूखमाईचे मुखदर्शन घेतले.
आषाढी एकादशी उपवास आणि अभिषेक
आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी, ज्या दिवशी भगवान विष्णू वैकुंठात शेषनागावर झोपी जातात आणि कार्तिकी एकादशीला जागे होतात. यामुळे ही रात्र देवाची रात्र म्हणून ओळखली जाते.
या पवित्र दिवशी मी एकादशीचा उपवास केला. पहाटे ५:०० वाजता चंद्रभागा नदीत स्नान करून अभिषेक घालून घेतला.
परतीचा प्रवास आणि आठवणींचा ठेवा
१८ जुलै पहाटे ६:०० वाजता भक्तिगीत आणि गजराच्या भक्तीमय वातावरणात कदंबा बसने परतीचा प्रवास सुरू झाला. रात्री ८:०० वाजता घरी पोहोचलो, आणि पत्नीने आरती ओवाळून घरात स्वागत केले.
शेवटी… पंढरपूरची वारी म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव! तो केवळ देवदर्शन नव्हे, तर एक आध्यात्मिक साधना आहे, जी मन आणि आत्मा अधिक सखोल करण्यास मदत करते.
मी प्रत्येक भक्ताला ही यात्रा अनुभवण्याची शिफारस करतो. हा प्रवास आयुष्यभर सोबत राहील, आणि मला भक्तिभावाने समृद्ध ठेवेल!
– पाईक विष्णू गांवकर
मोरपिर्ला- केपे