किनारे फुल्ल, रस्ते पॅक पार्ट्यांचा झगमगाट
पणजी,दि.२८ (प्रतिनिधी)
सरत्या वर्षांला निरोप आणि नवीन वर्षांच्या स्वागतासाठी गोव्याकडे पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे. किनारी भाग पर्यटकांनी गजबजले आहेत तर राज्यातील महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीतही वाढ झाली आहे. नवीन वर्षाच्या आरंभापर्यंत ही परिस्थिती राहणार असल्याने गोमंतकीयांना काही दिवस घरातच कोंडून राहण्याची वेळ आली आहे.
सनबर्नसाठी दक्षिणेतून उत्तरेकडे वाहतूक
यंदा पहिल्यांदाच सनबर्न महोत्सव उत्तरेत पेडणेतील धारगळ याठिकाणी होणार असल्याने दक्षिणेतून पूर्णपणे वाहतूक उत्तरेच्या दिशेने सरकणार आहे. वाहतुक पोलिसांनी यासंबंधी वाहतुक व्यवस्थापनाची जबाबदारी खांद्यावर घेतली असली तरी हा पहिलाच अनुभव राहणार असल्याने नेमकी काय परिस्थिती उदभवते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. पेडणेत सनबर्न असल्यामुळे शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ते आकर्षण ठरणार असल्याने तिथून मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा ओढा वाढण्याची शक्यता आहे. महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी वाहतुक पोलिसांनी घेतली असून त्या दृष्टीने पोलिसांनी नियोजन केले आहे.
दुखवट्यात सनबर्न कसा?
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याने देशात आणि राज्यातही सात दिवसांचा दुखवटा पाळण्यात येत आहे. राज्यात दुखवटा असताना सनबर्नसारखा महोत्सव आयोजित होणे हे कितपत योग्य,असा सवाल काही विरोधक विचारत आहेत. हा सरकारी कार्यक्रम नाही. यासाठी नियोजन आणि प्रचंड प्रमाणात आर्थिक गुंतवणूक असल्याने तो रद्द करणे शक्य नाही. या विषयावर मतमतांतरे असली तरीही सरकारी दुखवटे हे निव्वळ तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यापूर्ती मर्यादित राहीले आहेत. किमान सरकारने दुखवटे जाहीर करताना तसे स्पष्टीकरण केल्यास किमान ते वादाचे विषय ठरणार नाहीत,अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.