पर्यटनाचा खाण उद्योग नको ?

पर्यटनातील गैरप्रकार आणि बेकायदा गोष्टींची कोट्यवधींची उलाढाल होते आणि यात अगदी राज्यकर्त्यांपासून ते नोकरशहा आणि दलालांची एक भली मोठी टोळीच काम करते.

मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळील बोट दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू होण्याची घटना ताजी असतानाच बुधवारी नाताळच्या दिवशी कळंगुटमध्ये जलसफारीसाठी गेलेली बोट उलटुन एका पर्यटकाला आपला जीव गमवावा लागला. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या विविध दुर्घटना, अपघात यांतून आपण काहीतरी बोध घेणे अभिप्रेत आहे. परंतु समाजाची असंवेदनशीलता वाढली आहे. गोव्यासारख्या पर्यटन केंद्रीत राज्याला अशा दुर्घटना परवडणाऱ्या नाहीत. या घटनेतून पर्यटन उद्योगाचा लोकांच्या जीवाशी कसा खेळ सुरू आहे आणि त्याबाबत आपले प्रशासन किती बेफिकीर आहे, याचीच प्रचिती घडली.
कधीकाळी खाण उद्योग हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जात होता. या खाण उद्योगाला भ्रष्टाचार, लालसीपणा, अतिहव्यासाची कीड लागली आणि हा उद्योग लयास गेला. आता तोच कित्ता पर्यटन उद्योगाबाबत सुरू आहे. अमर्याद आणि अनियंत्रित पर्यटन उद्योगावर कुणाचेही लक्ष नाही. पर्यटनातील गैरप्रकार आणि बेकायदा गोष्टींची कोट्यवधींची उलाढाल होते आणि यात अगदी राज्यकर्त्यांपासून ते नोकरशहा आणि दलालांची एक भली मोठी टोळीच काम करते. वरून समुद्रकिनारे, मंदिरे, चर्चेस इत्यादी इत्यादी मुलामा चढवून आपण आपल्या पर्यटनाचे गुणगान गातो खरे परंतु आतून खऱ्या पर्यटनाची ओळख करून घ्यायची झाली तर ते यापेक्षा वेगळीच आहे. पर्यटन खाते, पोलिस तसेच स्थानिक पर्यटन उद्योगातील लोकांना या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे परंतु तिथेच पैशांची उलाढाल होत असल्यामुळे हीच अनेकांसाठी चरण्यासाठीची कुरणे बनली आहेत.
पर्यटन धोरणाच्या गोष्टी आपण गेली अनेक वर्षे एकत आहोत. धोरण ठरविण्याच्या कंत्राटातही गोलमाल इतकी आपली परिस्थिती खालावली आहे. समुद्र आणि किनारे हे आपल्या पर्यटनाचे आकर्षण आहे. जीवरक्षक एजन्सीवर कोट्यवधींचा खर्च होतो खरा परंतु त्यातून अनेकांचे जीव वाचतात आणि अनेकांना रोजगारही प्राप्त झाला आहे ही बरी गोष्ट. जलसफारीचा थरार अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक व्याकुळ झालेले असतात. अशा या जलक्रीडा प्रकारात धोका असतो आणि त्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजनांची काटेकोरपणे कार्यवाही होणे गरजेचे आहे. एका बोटीत किती प्रवाशांना परवानगी असते आणि त्याचे पालन होते की नाही, यावर कुणाचे लक्ष आहे. प्रवाशांना लाईफ जॅकेट किंवा अन्य सुरक्षेबाबत अवगत केले जाते काय. मुंबईतील घटनेत ९० जणांची मर्यादा असलेल्या बोटीत ११० प्रवासी होते. कळंगुटच्या दुर्घटनेतील बोटीत १३ की २५ प्रवासी होते, हा वादाचा विषय ठरला आहे. या सगळ्या गोष्टी नेमके काय दर्शवतात.
इथे प्रत्येक उद्योगाची एक लॉबी तयार झालेली आहे आणि या लॉबीचे काही राजकीय गॉडफादर आहेत. टॅक्सी व्यवसायाप्रमाणेच इतर अनेक उद्योगांवर विशिष्ट गॉडफादराची मर्जी असते आणि हा गॉडफादर या उद्योगाचे सरंक्षण करत असतो. जलसफारी, टॅक्सी आदींत अनेक गोमंतकीय आपला उदरनिर्वाह करतात आणि उद्योग करतात परंतु सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे तिथे त्यांना स्पर्धा सुरू झाल्यामुळे हे उद्योग अस्थिर बनले आहेत. सरकारने उदरनिर्वाहाच्या नावाखाली लोकांमध्ये कोंबड्याची झुंज लावण्याचे धोरण बंद करून प्रत्येक उद्योगाला शिस्त लावली तरच इथे बदल घडेल अन्यथा येरे माझ्या मागल्या…

  • Related Posts

    काँग्रेसचे संघटन सैन्य कुठे ?

    भाजपच्या दबावतंत्राला आणि दादागिरीला तोंड देण्याची धमक असलेले कार्यकर्ते जोपर्यंत काँग्रेसला संघटनेत मिळत नाहीत, तोपर्यंत भाजपला सत्तेवरून खाली खेचणे पक्षाला कठीण बनणार आहे. हे संघटन सैन्य काँग्रेस तयार करू शकेल…

    मन करा रे प्रसन्न

    गोवा मानवाधिकार आयोगाने केलेल्या पाहणीत मानसोपचार इस्पितळात उपचार घेतलेल्या सुमारे १९० रुग्णांना पुनर्वसनाची आवश्यकता आहे, असेही आढळून आले आहे. राज्याच्या आरोग्य क्षेत्राची यशोगाथा मांडत असताना मानसिक आरोग्याकडे दुर्लक्षून चालणार नाही.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मनोरूग्ण इस्पितळाची दैना कधी संपणार ?

    मनोरूग्ण इस्पितळाची दैना कधी संपणार ?

    13/01/2025 e-paper

    13/01/2025 e-paper

    काँग्रेसचे संघटन सैन्य कुठे ?

    काँग्रेसचे संघटन सैन्य कुठे ?

    11/01/2025 e-paper

    11/01/2025 e-paper

    पेडणे- वझरीतील वादग्रस्त भूमापन तात्पूरते स्थगीत

    पेडणे- वझरीतील वादग्रस्त भूमापन तात्पूरते स्थगीत

    मन करा रे प्रसन्न

    मन करा रे प्रसन्न
    error: Content is protected !!