
पेडणे टिकून आहे, तो फक्त स्वाभिमानी वृत्तीमुळे. आणि ती जर गळून गेली, तर पेडणेची खैर नाही, हे समजून घेणं काळाची गरज आहे.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचा पेडणेकरांच्या तिखट व स्वाभिमानी स्वभावावर नेहमी भर असे. तळागाळातील लोकांशी त्यांचा थेट संवाद होता आणि म्हणूनच त्यांनी पेडणेकरांच्या स्वभाववैशिष्ट्यांचा जवळून अभ्यास केला होता. पूर्वी एका बड्या उद्योजक व भाटकाराचा पराभव करून एका सामान्य शेतकऱ्याला निवडून दिल्यानंतर, अलीकडेच पेडणेकरांनी मुख्यमंत्रीपदावरील उमेदवारालाही प्रचंड मताधिक्याने पराभूत केले. हे त्यांच्या स्वतंत्रतेचं आणि लोकांच्या विश्वासाचं दर्शन घडवते. पेडणेकरांच्या या स्वभावामुळेच कुणीही सहसा पेडणेकरांना गृहीत धरण्याची चुक करत नाही. परंतु सध्याचा काळ पेडणेकरांच्या अस्वस्थतेचा आहे. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हे मगोचे नेते आहेत, तर पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर हे भाजपचे. दोघांमध्ये साम्य आहे ते म्हणजे एखादा विषय उद्भवला, की थेट संबंधित लोकांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर भेट द्यायची, फोटो काढायचे आणि लगेचच “सर्व काही सुटले” अशी घोषणा करायची. मात्र प्रत्यक्षात ते विषय तसेच राहतात. हरमलचा सीआरझेड मुद्दा, बेकायदा बांधकामांवरील न्यायालयीन आदेश, एमडीआर रस्त्याचं रद्द करणे, किंवा ओला-उबेर संदर्भातील गोंधळ, या सगळ्या प्रकरणांत नेमकी अशीच कृती दिसून आली. परंतु कायद्यात किंवा अधिसूचनांमध्ये मात्र याचा मागमूसही नाही. आमदारांना कदाचित आपण लोकांची समजूत काढली,असे वाटायला लागेल परंतु, आत्ताच्या घडीला मवाळ वाटणारे पेडणेकर निवडणूकीच्या वेळेला आपला खरा अवतार दाखवतील तेव्हा मात्र आमदारांचे सगळे अंदाज चुकीचे ठरले नाहीत म्हणजे मिळवली. पेडणेचा विकास थांबलेला आहे. मोपा विमानतळावरील स्थानिकांसाठी असलेला ब्लू कॅब टॅक्सी काऊंटर अनेक महिने बंद आहे. काउंटर बंद झाल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. ही संवेदनशीलताही आपले सरकार विसरले आहे. अनेकजण टॅक्सी व्यवसायात आले आहेत खरे परंतु दरवेळी डोक्यावर अनिश्चिततेची तलवार टांगत असल्यामुळे ते वैफल्यग्रस्त बनले आहेत. ही परिस्थिती पेडणेच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी निश्चितच उपयोगाची नाही. निष्क्रिय लोकप्रतिनिधींची निवड केल्यानंतर हे सगळे काही सहन करावे लागते म्हणतात त्याचा अनुभव सध्या पेडणेकर घेत आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या फोटोंच्या घोषणा झाल्या, पण सोमवार उलटूनही काऊंटर सुरू झालेला नाही. धारगळ येथील सनबर्न पार्टीवरून तर आमदार आणि मुख्यमंत्री दोन भिन्न गटात वाटले गेले. पेडणेकरांना सहजपणे चुना लावता येतो असा समज काहीजणांचा बनलेला असेल पण हा समज चुकीचा आहे हे योग्यवेळी पेडणेकर जेव्हा आपल्या खऱ्या रूपात येतील तेव्हाच समजेल हे वेगळेपणाने सांगण्याची गरज नाही. या घटनांमधून पेडणेकरांचा तिखट स्वाभिमान बधीर होत असल्याचे संकेत मिळतात. पेडणेकर ही अशी जातकुळी नव्हे की जी राजकारण्यांच्या वल्गनांना बळी पडेल आणि लगेच शरणागती पत्करेल. मग आज ही नवी पिढी अधिकच मवाळ का वाटते? पेडणे टिकून आहे, तो फक्त स्वाभिमानी वृत्तीमुळे. आणि ती जर गळून गेली, तर पेडणेची खैर नाही, हे समजून घेणं काळाची गरज आहे.