फोंड्याहून निसटलेल्या सापाचे आत्मवृत्त

फोंड्याची सीमा ओलांडून मी खांडेपारच्या दिशेने कूच केली. इथून सरपटत सरळ गेलो कि तिथल्या जंगलातून बोंडला मार्गे म्हादई आणि मग दिशा मिळेल तिथे सुटायचं असा बेत होता. निवडणूका जवळ आल्या कि मला कासावीस होतं. लोक सापांना इच्छाधारी म्हणतात पण खरेतर निवडणूक लढविण्याच्या इच्छेने झपाटलेल्या लोकांइतके झपाटलेले साप मी कधी पाहिले नाही. आम्ही कात बदलतो त्याहीपेक्षा लवकर हे लोक पक्ष बदलतात. आणि वरून बदनाम कोण तर आम्ही! भर निवडणुकीच्या तोंडावर फोंड्यात राहणे म्हणजे जीवास धोका. त्याला कारणही तसेच झाले. दांडेलीच्या एका मांत्रिकाने साप बाळगणाऱ्यास राजयोग प्राप्त होतो असे सांगून एकाला नादी लावले. आता ते ऐकून फोंड्यातले सगळेच इच्छुक उमेदवार साप शोधत फिरत आहेत. त्यांच्या हातात पडायच्या आधी मी इथून निसटण्याचा निर्णय घेतला.

फोंडा पोटनिवडणुकीनंतर आमचे आयुष्य जिकिरीचे बनले होते. आम्ही दिसू तिथे लोक एक तर आम्हाला मारून टाकत किंवा आमच्यावर विनोद करत. मध्यंतरी मला एक महाराष्ट्रवादी साप भेटला. तो कर्नाटकच्या सीमेवर निघाला होता कारण तिथे काँग्रेस सरकार होते. मी म्हणालो असे का करतोयस? तो म्हणाला कि सद्या फोंड्यात बिळं कमी आणि साप जास्त झालेत. त्यामुळे आयुष्यात बाजीगर बनायचे असेल तर कुठल्यातरी बिळात असणे गरजेचे आहे. असे स्वतंत्र राहून चालत नाही. मी नुसता फणा हलवला. पुढे त्याचे काय झाले माहित नाही.

पण तेव्हापासून सर्पसहवासी राजयोगाची बातमी सगळीकडे पसरली. आणि नेमके मला एकाने पकडून फोंड्यातल्या इच्छुकांकडे पाठवण्यास सुरुवात केली. एक असेच अतृप्त इच्छुक होते. ते माजी खासदार होते पण भर मोदी लाटेत भाजपच्या तिकिटावर निवडणूक हरण्याचा पराक्रम त्यांच्या नावावर होता. २०२४ साली परत त्यांना तिकीट मिळेल म्हणून ‘पल्लवि’त झालेल्या त्यांच्या आशेचे रूपांतर निराशेत झाले. फोंड्याच्या पोटनिवडणुकीतही स्वतःला तिकीट मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले असे ऐकिवात होते. ‘जो न देखे रवी वो देखे कवी’ असे कोणीतरी म्हटलेच आहे. रवींच्या नंतर आपल्याला तिकीट मिळावी म्हणून सदर नेते कवी पण बनले पण तिकीट काही मिळाले नाही. आमदार होण्याच्या त्यांच्या ह्या स्वप्नाला त्यांच्याच पक्षाने वाळवी लावली. तरी हार न मानता सद्या त्यांची तिकिटासाठी लॉबिंग आणि काव्यनिर्मिती जोरात सुरु आहे. भाजपात कवी लोकांना मोठे भविष्य असते. अटल बिहारी वाजपेयी हेही कवी होते आणि पंतप्रधान झाल्यावर मोदींनीही आपल्या काव्यप्रतिभेचे कंगोरे जनतेला दाखवले आहेत त्यामुळे सदर इच्छुक करेक्ट मार्गावर आहेत. त्यांची काव्यप्रतिभा पाहता आमदार खासदार म्हणून नाही तर साहित्य अकादमीच्या समितीवर सदस्य म्हणून त्यांना दिल्लीत पाठवण्यात येईल ह्यात काही शंका नाही. ह्यांना काही माझी गरज लागणार नाही हे कळून चुकले आणि मी तिथून सटकलो.

नंतर कळले कि आम आदमी पक्षातही नवीन इच्छुक आले आहेत. मी सुरेल तिळवेंना ओळखायचो. ते आधी सर्पमित्र होते. पण इतके साप पकडूनही त्यांच्या आयुष्यात राजयोग आला नाही. त्यांनी साप सोडून आप जवळ केली पण ह्या आप’देत त्यांना अवसर मिळाला नाही. आता गीतेश नाईक हे आपतर्फे इच्छुक आहेत पण त्यांच्यामागे पोलिसांचा ससेमिरा असल्याने ते स्वतःच बिळात लपून बसतात. स्वतःला लपून बसण्यासाठी बिळ खोदायला सोपे पडावे म्हणून त्यांनी पोटनिवडणुकीनंतर एक जेसीबीसुद्धा खरेदी केला आहे असे ऐकले. इंस्टाग्रामवर हल्ली कौतुक भाटीकर ह्यांची रील्स दृष्टीस पडत होती. भावाच्या पुण्याईवर ते आता स्वतःचे राजकीय भविष्य आजमावू पाहत आहेत असे वाटले. कोणीतरी त्यांच्या एका रीलवर ‘आयत्या बिळात नागोबा’ अशी कमेंट केली होती. ती वाचली आणि इथे काही आपला सन्मान होणार नाही हे कळताच मी तिथूनही सटकलो. पण खरी चुरस तर दळवी आणि रितेश ह्यांच्यामध्ये होती. त्या दोघांना कोणीतरी सांगितले होते कि ज्याच्या मानेभोवती साप त्यालाच भंडारी समाजाची मते पडतील. पण फोंड्यात भाजपचे तिकीट कोणाला ह्या प्रश्नाचे हलाहल दामू आणि दोतोरांच्या गळ्यातच अडकले आहे. ते ज्यादिवशी भाजप पक्षश्रेष्ठी पचवतील तोच खरा सुदिन! असे म्हणताक्षणीच फोंड्यात मगोचे कार्यालय सुरु होईल अशी बातमी आली. मगोच्या तिकिटावर स्वतः सुदिन लढतील अशी बातमी आहे. तसेच हल्लीच एक उडती खबर ऐकली होती कि चरणजीत सापरे म्हणून कोणीतरी मगोच्या तिकिटासाठी इच्छुक आहे.हे ऐकून वाटले कि कोणीतरी आपला माणूस निवडणुकीत उभा राहतोय. पण नंतर कळले ते सापरे नसून सप्रे आहेत. म्हणून त्यांच्या चरणांसी सप्रेम नमस्कार करून मी तिथून काढता चरण घेतला आणि खडपबांधच्या चरण देसाईंना सांगितले कि मला दूर जंगलात नेऊन सोड.

  • अंत्रुजसिंग फोंडेकर
    (सदर लेखनाचा हेतू निखळ मनोरंजनाचा असून या लेखनाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कुणाचाही अपमान किंवा बदनामी करण्याचा नाही)

  • Related Posts

    “आज नाही तर कधीच नाही”

    धनगर समाजाच्या एसटी मागणीसाठी निर्धार सत्तरी, दि. ११ धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा मिळावा, या मागणीसाठी गोवा धनगर समाज सेवा संघ, सत्तरी यांच्या वतीने सुरू असलेल्या कोपरा बैठकांच्या मालिकेतील…

    झोनिंग आणि वापराच्या बदलाशी संबंधित सर्व भ्रष्ट कायदे रद्द करा.

    मागील लेखात आपण भू-वापराशी संबंधित आरपी २१ (RP 21) च्या विविध तरतुदींवर आणि गावांच्या विकासासंबंधीच्या काही धोरणांवर चर्चा केली आहे.नगर आणि ग्राम नियोजन कायदा १९७४ (Town and Country Planning Act…

    You Missed

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    14/08/2026 e-paper

    14/08/2026 e-paper

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure