सिद्धण्णा मेट्टीचा आरजीपीकडून खरपूस समाचार
गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी)
राज्यात कन्नड भाषिकांच्या वाढत्या मतांची भीती दाखवून राजकीय स्वार्थासाठी आम्ही शरण जाऊ, असे स्वप्न सिद्धण्णा मेट्टी यांनी पाहू नये. अशा मतांची आम्हाला गरजच नाही. पोगो अर्थात गोंयकारपणाच्या मूळ संकल्पनेबाबत आरजीपी अजिबात तडजोड करणार नाही आणि गोंयकारपणाची थट्टा करणाऱ्या परप्रांतीयांची मुजोरी सहन केली जाणार नाही, असा सज्जड इशारा आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी दिला.
गोवा कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष सिद्धण्णा मेट्टी यांनी आरजीपी पक्षावर अप्रत्यक्ष टीका केल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष मनोज परब आणि आमदार विरेश बोरकर यांनी त्यांच्या विधानांचा जोरदार समाचार घेतला. “घाटी” हा शब्द राज्यात पूर्वीपासून प्रचलित असून तो सहजपणे वापरला जात होता. आजच्या घडीला हेच लोक विविध गुन्हेगारी प्रकरणांत आणि बेकायदा कृत्यांत सापडत आहेत. स्थानिकांच्या व्यवसायांवर अतिक्रमण करत आहेत आणि त्यामुळेच “घाटी” हा शब्द नव्याने वापरला जात आहे, असे परब म्हणाले.
राज्यात बेकायदा व्यवसाय, गुन्हे तसेच दुहेरी मतदानपत्र तयार करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने मेट्टी यांना दिला आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
गोंयकारांच्या भावनांचा गैरफायदा
गोंयकारांच्या आदरातिथ्य आणि करूणतेचा अनेक बिगर गोमंतकीयांनी गैरफायदा घेतला आहे. इथे कामधंदा करण्यासाठी आलेल्या अनेकांनी गोंयकारांच्या पोटावर लाथ मारायला सुरुवात केली आहे. इथे पैसा कमवून आपल्या गावांत जमीन, घरे बांधली आहेत आणि आता गोव्यातील जमिनींवरही कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत. हळूहळू एकजूट करून गोंयकार व्यवसायिकांना स्पर्धा करून संपवण्याचा विडा उचलल्याची टीका परब यांनी केली.
गोव्यात राहून वेगळेपण जपण्याची वृत्ती
गोव्याची भाषा, संस्कृती, रीतिरिवाज, परंपरा यांच्याशी समरस न होता आपले वेगळेपण राखून गोंयकारांना मात देण्याची वृत्ती कदापि सहन केली जाणार नाही. दुहेरी मतदानाचा हक्क बजावून दोन्ही ठिकाणी आपले अस्तित्व राखण्यात हे लोक पटाईत आहेत. गोंयकारांच्या स्वभावाचा फायदा घेऊन कोमुनिदाद जमिनींवर बेकायदेशीर कब्जा केला आणि आता त्यांनाच भाजप सरकार कायदेशीर मान्यता देत आहे. आपली कुंडली घेऊन जे कुणी बसले आहेत त्यांनी ती लवकरात लवकर उघड करावी. अशा धमक्यांना घाबरणारा आपण नाही, असा इशाराही परब यांनी दिला.
मतांचे लालच आणि राजकीय स्वार्थ
बिगर गोमंतकीयांनी आपली वोटबँक तयार केली असून या मतांचे लालच राजकीय पक्षांना दाखवून आपली कामे करून घेतली जात आहेत. आज गोव्यातील आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री देखील त्यांच्या कार्यक्रमात जाऊन स्तुतीसुमने उधळतात. आरजीपीची आक्रमकता अनेकदा गोंयकारांनाच आवडत नाही. मग मेट्टी जे बोलले ते ऐकून गोंयकार शांत बसणार की जागा होणार, असा सवाल परब यांनी उपस्थित केला.
म्हादईसाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन
गोंयकारांना आपले बंधू संबोधणाऱ्या कर्नाटकातील लोकांनी म्हादईसाठी रस्त्यावर उतरून आपल्या राज्यातील सरकारला या नदीचे महत्त्व पटवून द्यावे, असे परब म्हणाले. उत्तर भारतीय असो किंवा अन्य कुणीही बिगर गोमंतकीय असो – जो कुणी गोंयकारपण आणि गोंयकारांना धोका पोहोचवेल, त्याला कुठेच सोडले जाणार नाही. गोव्याला बाधा पोहोचवणाऱ्यांविरोधात आरजीपी लढा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘पोगो’ संकल्पनेला पर्याय नाही
आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत ‘पोगो’ संकल्पनेला पाठिंबा देणाऱ्यांसोबतच आरजीपी आघाडी करेल. केवळ भाजपला पराभूत करण्याच्या हेतूने मूळ संकल्पनेला फाटा दिला जाणार नाही, असेही परब यांनी स्पष्ट केले.
गोंयकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
“ज्यावेळी गोव्याच्या जमिनी आणि गोंयकारांचा विषय आपण विधानसभेत उपस्थित करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपल्याला जबरदस्तीने सभागृहाबाहेर फेकले जाते. गोंयकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची संधी हे सरकार देत नाही, हे दुर्दैव आहे,” असे आमदार विरेश बोरकर यांनी सांगितले.





