मडगाव, दि. १८: मडगावातील प्रस्तावित बहुमजली पार्किंग प्रकल्पाच्या पायाभरणीला ११ वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधत ‘मडगांवचो आवाज’चे युवा नेते प्रभव नायक यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. कोसळलेल्या शिलान्यास फलकाला पुष्पहार अर्पण करून त्यांनी या प्रकल्पाला ‘अपयशाचे स्मारक’ असे संबोधले. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या अपयशाचे हे प्रतीक असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पायाभरणी होऊन तब्बल अकरा वर्षे उलटली, तरी बहुमजली पार्किंग प्रकल्प प्रत्यक्षात आलेला नाही. त्यामुळे हा प्रकल्प मडगावकरांना दिलेल्या अपूर्ण आश्वासनांचे आणि नियोजनातील अपयशाचे प्रतीक बनल्याची टीका नायक यांनी केली.
हायड्रॉलिक पार्किंग प्रकल्पावर प्रश्नचिन्ह
जुन्या मासळी मार्केटच्या जागेवर प्रस्तावित हायड्रॉलिक पार्किंग प्रकल्पावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार प्रकल्पाची व्यवहार्यता आणि आर्थिक शाश्वतता यांचा पुरेसा अभ्यास न करताच तो पुढे रेटला जात असल्याचा दावा नायक यांनी केला. योग्य अभ्यास आणि संबंधित घटकांशी चर्चा न करता मडगाववर आणखी एखादा प्रकल्प लादल्यास भविष्यात तो सार्वजनिक पैशांवर चालणारा ‘पांढरा हत्ती’ ठरू शकतो, असे त्यांनी म्हटले.
मास्टर प्लॅनची मागणी
मडगावच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन शहरासाठी सर्वसमावेशक मास्टर प्लॅन तयार करण्याची आवश्यकता असल्याचे नायक यांनी सांगितले. वाहतूक, पार्किंग, ड्रेनेज, दळणवळण आणि इतर नागरी सुविधांचा दीर्घकालीन विचार होणे गरजेचे आहे. यापूर्वी मास्टर प्लॅनचा प्रस्ताव पुढे आला होता; मात्र सध्या तो कोणत्या टप्प्यावर आहे आणि त्याची अंमलबजावणी कधी होणार, याबाबत स्पष्टता नसल्याचे त्यांनी सांगितले.
इतर प्रस्तावित प्रकल्पांवर टीका
मडगाव म्युनिसिपल गार्डनमधील प्रस्तावित दोन मजली इमारत आणि जुन्या बसस्थानकावरील प्रस्तावित फूड कोर्ट यांचाही त्यांनी उल्लेख केला. अशा प्रकल्पांपूर्वी कोणते अभ्यास करण्यात आले, कोणाशी सल्लामसलत झाली आणि त्यांची शहराला नेमकी गरज काय आहे, याची माहिती जनतेसमोर ठेवली पाहिजे, अशी मागणी नायक यांनी केली.
ड्रेनेज व्यवस्थेवर आक्षेप
कोकण रेल्वे स्थानकाच्या उत्तरेकडील बाजूच्या ड्रेनेज व्यवस्थेवरही त्यांनी टीका केली. ‘झिगझॅग’ आणि ‘रोलर-कोस्टर’सारख्या स्वरूपाचे ड्रेनेज काम झाल्याचा आरोप करत त्यांनी कामाच्या दर्जासह त्यावरील खर्च आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली.
गैरव्यवहाराचे आरोप
याशिवाय सार्वजनिक गणेश मंडप उभारणीतील कथित गैरव्यवहार तसेच कौटुंबिक उपक्रमांच्या प्रचारासाठी सरकारी यंत्रणेचा वापर होत असल्याच्या आरोपांकडेही नायक यांनी लक्ष वेधले. सरकारी संस्था, यंत्रणा आणि सार्वजनिक साधनसंपत्तीचा वापर केवळ जनहितासाठी झाला पाहिजे, असे सांगत सार्वजनिक निधीच्या वापराबाबत पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची मागणी त्यांनी केली.





