संपूर्ण संघटनेच्या पुर्नरचनेचे दिले अधिकार
पणजी,दि.१७(प्रतिनिधी)
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे आणि सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांच्या अहवालानंतर पक्षाच्या पुर्नरचनेची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यावरच सोपविली आहे. यासंबंधीचा आदेश पक्षश्रेष्ठींकडून अमित पाटकर यांना पाठविण्यात आला आहे.
अंतर्गत कुरघोडीची दिल्लीत माहिती
पक्षांतर्गत सुरू असलेल्या कुरघोडी आणि एकमेकांचे पाय ओढण्याचे प्रकार काँग्रेस पक्षात सुरू आहेत. अमित पाटकर यांच्या विरोधात एक गट सक्रीयपणे काम करत असून अमित पाटकर हे भाजपचे हस्तक आहेत,असा संदेश त्यांनी दिल्लीत पोहचविल्याचे सांगण्यात येते. प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक असल्याने दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटून हे पद मिळवण्यासाठीही अनेकांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर पक्षश्रेष्ठांनी पक्ष संघटनेवर जादा लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे प्रभारी माणिकराव ठाकरे आणि सहप्रभारी डॉ.अंजली निंबाळकर यांनी प्रदेश काँग्रेसची बैठक घेतल्यानंतर आपला अहवाल राष्ट्रीय अध्यक्षांकडे सुपुर्द केल्यानंतर हा आदेश जारी करण्यात आला आहे.
संघटनेच्या पुर्नरचनेसाठी तयार
संपूर्ण काँग्रेस पक्षाच्या पुर्नरचनेसाठी तसेच मंडळ, जिल्हा तथा राज्यस्तरावरील विविध संघटनात्मक विभाग सक्रीय करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी कामाला सुरूवात केली आहे. पक्षांतर्गत काही घटक त्यांच्या कामात अडथळा निर्माण करत असल्याची गोष्ट पक्षश्रेष्ठींच्या नजरेला आल्याने त्यांनी यासंबंधी पुर्नरचनेचे सर्वाधिकार अमित पाटकर यांना दिले आहेत. हा आदेश अमित पाटकर यांना दिल्लीतून पाठविण्यात आला आहे.