आमदार प्रविण आर्लेकर, राजन कोरगांवकरांनी थोपटले दंड
पेडणे,दि.१३(प्रतिनिधी)
सासष्टी, बार्देश तालुक्यातून हद्दपार केल्यानंतर आता छुप्या पद्धतीने धारगळ- पेडणे येथे घुसखोरी करू पाहणाऱ्या वादग्रस्त सनबर्न महोत्सवाच्या वार्तेने पेडणेकरांचा तिळपापड झाला आहे. आधीच वेगवेगळ्या विषयांवरून घायाळ झालेल्या पेडणेकरांच्या जखमांवर सरकारने विनाकारण मीठ चोळण्याचा प्रयत्न करू नये. पेडणेकरांच्या स्वाभिमानाची नाचक्की करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा विस्फोट होईल आणि सरकारला ते महागात पडेल,असा इशाराच पेडणेतील विविध स्तरांतून सरकारला देण्यात आला आहे.
आमदार आणि कोरगांवकरही आक्रमक
पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर आणि सरकारातील घटक मगो पक्षाचे नेते राजन कोरगांवकर यांनीही सनबर्नबाबत आक्रमक भूमीका घेतली आहे. आमदार प्रविण आर्लेकर यांनी आपला सनबर्न महोत्सवाला विरोध असल्याचे सांगून तरिही जबरदस्तीने हा महोत्सव पेडणेवर लादण्याचा प्रयत्न केल्यास लोकांसोबत रस्त्यावर उतरून बंद पाडणार असल्याचा इशाराच त्यांनी दिला. त्यांच्यासोबत पेडणे मतदारसंघातील विविध पंचायतींची मंडळी उपस्थित होती. राज्यातील अंतर्गत भागांना पर्यटनाचा लाभ मिळायला हवा परंतु सनबर्नसारखे महोत्सव लाभापेक्षा नुकसानी जास्त करणारे ठरणार असल्याचेही आमदार आर्लेकर म्हणाले. मगोचे नेते तथा मिशन फॉर लोकलचे संस्थापक राजन कोरगांवकर यांनीही सनबर्नला अजिबात थारा देणार नसल्याची भूमीका घेतली. पेडणेच्या आमदारांनी याविरोधात आंदोलन केल्यास सर्वांनी राजकीय मतभेद विसरून या लढ्यात सहभागी व्हावे,असेही ते म्हणाले. पेडणेच्या आमदारांना अंधारात ठेवून असे निर्णय सरकारी पातळीवर होत असतील तर त्यातून नेमके काय दर्शवते,असा टोलाही त्यांनी हाणला.
कॅसिनो टाऊनशीपच्या जागेचा विचार
सनबर्न महोत्सव आयोजकांनी ऑनलाईन तिकीट बुकिंगच्या संकेतस्थळावर नियोजित महोत्सवाच्या ठिकाणाची माहिती दिली आहे. हे ठिकाण धारगळ येथे महामार्गाला लागूनच आहे. नियोजित कॅसिनो टाऊनशीपच्या जागेत हा महोत्सव आयोजित करण्याचा डाव आखण्यात आल्याचीही खबर मिळाली आहे. या जागेत गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने डेल्टीन कॅसिनो कंपनीला टाऊनशीपची परवानगी दिली आहे. तिथे मोठ्या प्रमाणात डोंगरकापणी आणि रस्त्यांची कामे सुरू आहेत. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. सरकारला हाताशी धरून सनबर्न महोत्सव आयोजकांनी आता हा डाव आखल्याने आणि त्यासाठी पेडणे तालुक्याची निवड केल्याने सरकार पेडणेकरांना सहज खरेदी करता येते,असे दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही अनेकांनी केला आहे.
काँग्रेस,आम आदमी पार्टीचा विरोध
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सनबर्नचा जोरदार विरोध करत एकीकडे नोकरी विक्री प्रकरणांतून बेरोजगारांची थट्टा चालवलेल्या सरकारने युवकांपुढे सनबर्नच्या संस्कृतीचे भवितव्य ठेवल्याची ही चिन्हे आहेत,अशी टीका केली आहे. आपचे निमंत्रक एड.अमित पालेकर यांनी जनतेच्या विरोधाला डावलून सरकार जबरदस्तीने सनबर्न महोत्सव लोकांवर लादत असल्याचे सांगून याला कठोर विरोध केला जाईल,असा इशाराही त्यांनी दिला.