सत्तेचा दबाव कितीही मोठा असला तरी न्यायालयीन कसोटीसमोर तो टिकतो की नाही, हेच आता निर्णायक ठरणार आहे.
————————————————————-
कारापूर-सर्वण येथील हाऊस ऑफ अभिनंदन लोढा या वादग्रस्त प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती हा केवळ एका बांधकाम प्रकल्पाला बसलेला न्यायालयीन दणका नाही, तर गोव्यातील सत्ताधारी भाजप सरकारच्या कारभारावर उपस्थित झालेले गंभीर प्रश्नचिन्ह आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाचा संबंध थेट नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्याशी जोडला जात असल्याने या स्थगितीचे राजकीय आणि प्रशासकीय परिणाम अधिक गंभीर आहेत. ज्या मंत्र्यांच्या खात्याकडून प्रकल्पाला तांत्रिक परवाने देण्यात आले, त्यांच्याच कौटुंबिक जमिनीच्या व्यवहाराचाही या प्रकल्पाशी संबंध असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हितसंबंधांचा संघर्ष आणि सत्तेच्या अधिकारांचा वापर याबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
कारापूरवासीयांनी या प्रकल्पाविरोधात तब्बल १६१ दिवस आंदोलन केले. लोकशाही मार्गाने, कोणत्याही प्रकारे कायदा-सुव्यवस्थेला बाधा न आणता त्यांनी आपला विरोध कायम ठेवला. मात्र, एवढे प्रदीर्घ आंदोलन होऊनही सरकारला ग्रामस्थांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घ्यावीशी वाटली नाही. कारण या प्रकल्पाच्या निमित्ताने नगर नियोजनमंत्र्यांची नाराजी ओढवून घेण्याची सरकारची तयारी नव्हती का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जनतेच्या प्रश्नांपेक्षा मंत्र्यांचे राजकीय हितसंबंध महत्त्वाचे ठरत असतील, तर लोकशाहीचा अर्थच काय उरतो?
या आंदोलनाला कमकुवत करण्यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पंचायत मंडळावर दबाव, गावातील काही घटकांना प्रकल्पाच्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न, आंदोलकांची कोंडी आणि आंदोलनाला बदनाम करण्याचे डाव अशा अनेक घडामोडी घडल्या. काही ग्रामस्थांना खंडणीच्या आरोपांखाली अटकही झाली. परिणामी, प्रकल्पधारकांना प्रामाणिक आणि आंदोलनकर्त्यांना स्वार्थी ठरवण्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम स्थगितीने या साऱ्या कथनांना मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाचा आदेश म्हणजे प्रकल्पातील सर्व आरोप सिद्ध झाले, असा त्याचा अर्थ नाही; परंतु प्रकरणातील कायदेशीर आणि प्रशासकीय बाबींची गंभीर तपासणी होण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
या प्रकल्पासाठी नगर नियोजन खात्याने दिलेला तांत्रिक परवाना आणि पंचायतीने दिलेला बांधकाम परवाना हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. या परवान्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने जैसे थे स्थिती कायम ठेवण्याचे निर्देश दिल्याने संबंधित निर्णयप्रक्रियेची वैधता तपासली जाणार आहे. याचिकादार प्रविणसिंग शेटगांवकर आणि गोवा फाउंडेशनने या प्रकरणातील कागदपत्रे न्यायालयासमोर मांडली आहेत. त्यामुळे आता केवळ राजकीय स्पष्टीकरणे देऊन किंवा प्रशासनाच्या निर्णयांचे समर्थन करून सरकारला या प्रश्नातून सहज बाहेर पडता येणार नाही. कायदे, नियम आणि पर्यावरणविषयक तरतुदींचे पालन झाले की नाही, याचे उत्तर द्यावेच लागेल.
गोव्याच्या जमिनींचे संरक्षण हा आज सर्वांत महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. विकासाच्या नावाखाली डोंगर, शेतजमिनी आणि गावांचे नैसर्गिक स्वरूप बदलले जात असेल, तर त्याला विकास म्हणता येणार नाही. शेकडो कोटींच्या व्यवहाराचे कारण पुढे करून स्थानिकांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती लोकशाहीला घातक आहे. गुंतवणूकदारांचे हित महत्त्वाचे असले तरी गावकऱ्यांच्या अस्तित्वापेक्षा ते मोठे असू शकत नाही.
कारापूरवासीयांनी पाच महिन्यांहून अधिक काळ संघर्ष केला, तो केवळ एका प्रकल्पाविरोधात नव्हे, तर आपल्या गावाचे अस्तित्व टिकवण्यासाठी. आता त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे या प्रकरणातील प्रत्येक निर्णय, प्रत्येक परवाना आणि प्रत्येक प्रशासकीय भूमिकेची कसोटी लागणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण भाजप सरकारसाठी राजकीयदृष्ट्याही डोकेदुखी ठरू शकते. कारण गोव्याच्या जमिनींचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांच्याच भूमिकेबाबत प्रश्न निर्माण होत असतील तर जनतेने जाब विचारणे स्वाभाविक आहे. कारापूरचा संघर्ष आता एका गावापुरता मर्यादित राहिलेला नाही. तो गोव्याच्या जमीन, पर्यावरण आणि लोकशाही अधिकारांच्या संरक्षणाचा लढा बनला आहे. सत्तेचा दबाव कितीही मोठा असला तरी न्यायालयीन कसोटीसमोर तो टिकतो की नाही, हेच आता निर्णायक ठरणार आहे. कारापूरच्या मातीचा आवाज सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. आता त्या आवाजाला न्याय मिळतो की सत्तेच्या हितसंबंधांचा विजय होतो, याकडे संपूर्ण गोव्याचे लक्ष लागले आहे.







