सावध व्हा युवकांनो!

समाजच गुलामी आणि अंधभक्तीने ग्रासलेला असेल तर उर्जावान, नवनवोन्मेषी, कौशल्यवान तरुण तयार होईलच कसा ?

जगातील सर्वांत तरुण देश म्हणून भारताची ओळख आहे. ही गोष्ट अभिमानास्पद आहेच, परंतु त्याचबरोबर तितकीच जिकीरीची आणि आगीशी खेळ करणारी आहे. सक्षम, तेजोमय आणि उर्जावान तरुणाई असेल तर ती देशाची ताकद ठरते; परंतु निराश, हताश तरुणाई असेल तर ती चिंतेची बाब ठरते. आपण कुठल्या गटात आहोत याचा विचार करण्याची वेळ आली आहे. पहिल्या गटात निश्चितच नाही, पण दुसऱ्या गटातही पूर्णपणे पोहोचलेलो नाही. त्यामुळे तरुणाईला योग्य दिशा देऊनच आपण जगातील महासत्ता बनू शकतो, हे तेवढेच महत्त्वाचे आहे.
आज राष्ट्रीय युवा दिन आहे. दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. १९८४ मध्ये भारत सरकारने हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित केला आणि तेव्हापासून युवकांना विवेकानंदांच्या विचारांची आठवण करून देत नवे संकल्प करण्याची संधी मिळते. यंदाच्या राष्ट्रीय युवा दिनाचे घोषवाक्य आहे – “स्वतःला प्रज्वलित करा, जगावर प्रभाव टाका”. या घोषवाक्यातून युवकांना स्पष्ट संदेश दिला जातो की आत्मविकास, आत्मविश्वास आणि कौशल्यवृद्धी ही पहिली पायरी आहे आणि त्यानंतर त्या ऊर्जेचा उपयोग समाज व राष्ट्राच्या प्रगतीसाठी करावा.
भारताची जवळपास ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील आहे. ही आकडेवारी दाखवते की युवक हे देशाच्या भविष्यातील सर्वात मोठे भांडवल आहेत. शिक्षण, तंत्रज्ञान, उद्योजकता, सामाजिक कार्य या सर्व क्षेत्रांत युवकांचा सहभाग निर्णायक ठरतो. स्वामी विवेकानंदांनी दिलेला संदेश – “उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका” – आजही तितकाच प्रेरणादायी आहे. युवकांनी स्वतःला प्रज्वलित करून समाजात सकारात्मक बदल घडवावा, हीच या घोषवाक्याची खरी भावना आहे.
आजच्या काळात युवकांसमोर बेरोजगारी, तंत्रज्ञानातील वेगवान बदल, सामाजिक विषमता अशी अनेक आव्हाने आहेत. परंतु योग्य मार्गदर्शन, कौशल्यविकास आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर ही आव्हाने संधींमध्ये रूपांतरित करता येतात. युवकांनी केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी नव्हे, तर समाजाच्या उन्नतीसाठीही कार्य करणे आवश्यक आहे. युवकांनी नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर वाहण्याची गरज आहे. अंधभक्त बनून, विवेक गहाण ठेवून, अंधानुकरण करून युवक आपल्या पायावर उभा राहू शकत नाही. आज धर्मांच्या नावाची अफुची गोळी देऊन युवा पिढीला आपल्या वळचणीला बांधून त्यांच्याकरवी आपले राजकीय आणि स्वार्थी इप्सित साध्य करण्यासाठी अनेकजण वावरत आहेत. या लोकांच्या तावडीत सापडणाऱ्या युवा पिढीला सुरक्षित बाहेर काढण्याची गरज आहे. युवकांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन, त्यांना परावलंबी बनवून आपली पोळी भाजण्याचा जो प्रकार देशात सर्रास सुरू आहे, तो कुठेतरी बंद होण्याची गरज आहे.
विद्यार्थी चळवळीतूनच युवकांचा भक्कम पाया उभा राहतो; परंतु या चळवळी राजकीय पक्षांनी हायजॅक केलेल्या आहेत. आपले राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी युवकांचा वाहक म्हणून वापर केला जातो आणि युवक नकळतपणे त्यात गुरफटला जातो. तो गुरफटत इतका आत घुसतो की नंतर चक्रव्युहात सापडलेल्या अभिमन्यूसारखी त्यांची परिस्थिती होते. आपल्याला चक्रव्युह भेदणारी युवा पिढी तयार करायची आहे.
जेव्हा समाज सजग आणि जागृत असतो तेव्हाच सक्षम युवा निर्माण होऊ शकतो. समाजच गुलामी आणि अंधभक्तीने ग्रासलेला असेल तर उर्जावान, नवनवोन्मेषी, कौशल्यवान तरुण तयार होईलच कसा? विवेकानंदासारखे प्रामाणिक दिशादर्शक होते म्हणून युवकांना योग्य दिशा मिळणे शक्य झाले. ढोंगी नेते जर खोट्या जाहीरातबाजी आणि प्रसारबाजीच्या सहाय्याने युवकांना प्रभावित करू लागले तर त्यातून बनावट मालच तयार होणार आहे. युवकांनी स्वतःला प्रज्वलित करून अशा शक्तींपासून सावध राहणे गरजेचे आहे आणि आपले आदर्श कोण असावेत हे निश्चित करूनच पुढे जाणे आवश्यक आहे.

  • Related Posts

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    अपक्ष उमेदवारांचा कितीही भरणा असला तरी पक्षाच्या अधिकृत चिन्हावर विरोधकांचा फक्त एक उमेदवार भाजपच्या विरोधात उभा राहिला, तर भाजपचा आत्मविश्वास कोलमडून पडेल आणि जनतेचा विश्वास ओसंडून वाहील. निवृत्त न्यायमुर्ती फेर्दिन…

    भाजप हो सावधान !

    सर्वोच्च पदाचा कुणीतरी आपल्या राजकीय स्वार्थासाठी किंवा छुप्या डावपेचांसाठी वापर करत असेल, तर हे महत्त्वाचे पद भूषविणाऱ्या व्यक्तीच्या पात्रतेवरच संशय घेण्यासारखी परिस्थिती म्हणावी लागेल. आपल्या लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला राजकीय स्वातंत्र्य…

    You Missed

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    05/02/2026 e-paper

    05/02/2026 e-paper

    १९१९ ; भिवपाची गरज ना !

    १९१९ ; भिवपाची गरज ना !

    भाजप हो सावधान !

    भाजप हो सावधान !

    04/02/2026 e-paper

    04/02/2026 e-paper