श्रवण बर्वे; काय बोध घेणार ?

आपली सामाजिक संवेदना पुन्हा जागी होण्याची गरज आहे आणि त्यासाठी आपण समाज म्हणून विचार करावा लागेल.

आंबेडे- नगरगांवचा तरूण श्रवण बर्वे याच्या खूनाचा अखेर छडा लागला. हा छडा धक्कादायक तर होताच परंतु गोव्याच्या बिघडत्या सामाजिक, कौटुंबिक परिस्थितीची दारूण अवस्था दर्शवणाराच ठरला आहे. आपला समाज आत्मकेंद्रीत बनत चालला आहे. राज्यकर्त्यांचीही तीच इच्छा आहे. सामुहीत किंवा सामाजिक एकोप्याची भावना जितकी नष्ट होईल तितके या राज्यकर्त्यांचे फावणार आहे. तुझे काय ते बघ, इतरांचा विचार तु करू नको,असे सल्ले हल्ली रोजचेच बनले आहेत. वास्तविक समाजाबरोबर, गावांबरोबर आणि समुहाबरोबर राहुनच आपला समाज यापूर्वी पुढे पुढे आला आहे. हल्ली आम्हाला पुढे जाण्यासाठी कुणाचीच गरज नाही,असा एक गैरसमज प्रत्येकाच्या डोक्यात शिरला आहे आणि त्यातूनच आत्मकेंद्रीतपणाची भावना बळावत चालली आहे.
वाळपईतील श्रवण बर्वे याचा मृतदेह घरासमोरच अंगणात सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. श्रवण बर्वेची शवचिकित्सा डॉ. मिलिंद घोडयेकर यांनी केली आणि तिथूनच त्याच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट झाले. श्रवणचा मृत्यू हा गळा दाबून झाला, या घटनेत एकापेक्षा अधिक लोकांचा समावेश होता तसेच मृत्यूनंतर त्याच्या गळ्यात नायलॉनची दोरी अडकवून या मृत्यूला एक वेगळेच वळण मिळवून देण्याचा कट हा देखील शवचिकीत्सा अहवालातूनच समोर आला. डॉ. मिलिंद घोडयेकर यांनी शवचिकित्सा अहवालातील निरीक्षणे पोलिसांना समजावून सांगितल्यानंतरच खऱ्या अर्थाने या तपासाला गती मिळाली आणि त्यातूनच अखेर वडिल, भाऊ आणि त्यांचा कामगार श्रवणच्या मृत्यूला कारणीभूत होते,असा प्रथमदर्शनी तपास लागू शकला. उत्तर गोवा पोलिस अधिक्षकांनी या प्रकरणाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पोलिसांच्या तपासाचे कौतुक करत असताना शवचिकीत्सा अहवाल आणि त्यातून स्पष्ट झालेल्या गोष्टींमुळे पोलिसांना मदत झाली, याचा अजिबात उल्लेख केला नाही. कदाचित या तपासाचे सगळे श्रेय पोलिसांनाच लाटायचे होते, म्हणून हे झाले असावे परंतु शवचिकीत्सा अहवालातील बारकाव्यांमुळेच या तपासाला योग्य दिशा मिळाली आणि त्यातून गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात मदत झाली, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
श्रवण बर्वे हा एकटाच या घरात राहत होता. त्याचे वडिल आणि भाऊ कुटुंबासह होंड्याला राहत होते. त्याचे वडिल केवळ त्याला जेवण देण्यासाठी येत असत. श्रवणचा स्वभाव आणि कुटुंबातील इतर सहकाऱ्यांसोबत त्याचे खटके उडत असल्यामुळेच तो एकाही घरात राहत होता आणि बाकीचे सगळे वेगळीकडे राहत होते. श्रवणच्या या स्वभावाचे नेमके कारण काय, हे पोलिस तपासात उघड होईलच. मालमत्तेवरून हे कौटुंबिक खटके उडत अशी चर्चा असली तरी जोपर्यंत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत या गोष्टींवर चर्चा करणे अयोग्य ठरेल. श्रवण बर्वे हे केवळ एक उदाहरण आहे. अशी अनेक कुटुंबे सध्या भाऊबंदकीमुळे उध्वस्त झाली आहेत. मालमत्ता, व्यसन, कौटुंबिक हेवेदावे तसेच इतर अनेक कारणांसाठी हे घडत असताना त्याला काहीच उपाय नाही,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वास्तविक गांवच्या प्रमुख व्यक्ती किंवा सामाजिक संघटना यांनी अशा गोष्टीत लक्ष घालून सर्व कौटुंबियांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न किंवा हस्तक्षेप करण्याची गरज आहे. हल्ली माणूस बराच हट्टी बनत चालला आहे तसेच माणसाचा इगो इतका मोठा बनत चालला आहे की त्यासाठी आपल्या कुटुंबाची फरफट जरी झाली किंवा आपल्या रक्ता नात्याच्या लोकांची जरी हानी झाली तरीही कुणाला काहीच वाटत नाही,एवढी असंवेदनशीलता समाजात पसरत चालली आहे. व्यसनाला प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण अनेक कुटुंबे उध्वस्त करत आहे. एका कुटुंबात एखादा सराईत व्यसनी व्यक्ती जर असेल तर त्या कुटुंबाची काय परिस्थिती बनते हे सांगायची गरज नाही. आपली सामाजिक संवेदना पुन्हा जागी होण्याची गरज आहे आणि त्यासाठी आपण समाज म्हणून विचार करावा लागेल.

  • Related Posts

    पोलीस निष्क्रियतेवर ‘रासुका’ची मात्रा!

    सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर पोलिसांकडे पुरेशी माहिती, मनुष्यबळ आणि स्वायत्तता असती, तर ‘एनएसए’चा आधार घ्यावा लागला नसता. गोव्यात नॅशनल सिक्युरिटी अ‍ॅक्ट (रासुका) लागू करण्याचा निर्णय म्हणजे कायद्याच्या राज्यात गंभीर…

    वोट चोरी : लोकशाहीलाच सुरूंग

    निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगावर दबाव आणणे आवश्यक आहे, जेणेकरून आयोग या आरोपांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करेल. लोकशाही ही केवळ निवडणुकांची प्रक्रिया नाही,…

    You Missed

    पोलीस निष्क्रियतेवर ‘रासुका’ची मात्रा!

    पोलीस निष्क्रियतेवर ‘रासुका’ची मात्रा!

    बांबोळी ”ब्लॅकस्पॉट” सरकारनिर्मित

    बांबोळी ”ब्लॅकस्पॉट” सरकारनिर्मित

    06/11/2025 e-paper

    05/11/2025 e-paper

    राजकीय दबावाने पोलिस खाते कोलमडले…

    राजकीय दबावाने पोलिस खाते कोलमडले…

    वोट चोरी : लोकशाहीलाच सुरूंग

    वोट चोरी : लोकशाहीलाच सुरूंग
    error: Content is protected !!