या सरकारमधील अनेक मंत्र्यांनी सुरू ठेवलेल्या कारनाम्यांकडे पाहता, पुढील काही वर्षांत आपला गोवा शिल्लक राहणार की विकला जाणार, असा प्रश्न मनात येतो.
सरकार स्वतःला प्रामाणिक म्हणवते आणि सरकारविरोधात बोलणाऱ्यांना खंडणीखोर ठरवण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. सर्वसामान्य लोकांना विविध उपक्रमांत, योजनांत आणि कार्यक्रमांत गुंतवून ठेवले जाते. अशा परिस्थितीत मंत्र्यांच्या कारवायांकडे पाहता, गोव्याचे भवितव्य धोक्यात आहे.
नगर नियोजन खात्याकडून ३९(ए) अंतर्गत भूरूपांतराचा सपाटा सुरूच आहे. याविरोधात न्यायालयीन खटला सुरू असला तरी न्यायालयाची स्थगिती नसल्यामुळे भूरूपांतर प्रकरणे निकाली काढली जात आहेत. सरकारने मोठ्या वकिलांची फौज या खटल्यासाठी कामाला लावली असून, त्यासाठी जनतेच्या खिशातील कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत.
एकीकडे सरकार कृषी जमिनी विकासासाठी मोकळ्या करत आहे, तर दुसरीकडे सामाजिक संस्था जनतेच्या हितासाठी न्यायालयात लढा देत आहेत. हे चित्र पाहून वाटते की काही राजकारण्यांनी गोव्यावर करणी केली आहे की काय! जनतेला जणू संमोहीत करून त्यांच्या इच्छेनुसार वागवले जात आहे आणि संसाधनांची लूट सुरू आहे.
काही राजकारण्यांच्या हातातील गंडे, दोरे आणि कपाळावरील विविध टिकल्या पाहून वाटते की हे सगळे देवदेवस्कीत गुंतले आहेत. गरीब जनता रोजच्या रहाटगाडग्यात गुरफटली आहे आणि हे नेते जादूटोण्याच्या माध्यमातून जनतेला लुटत आहेत.
काही नेत्यांच्या खाजगी देवदेवस्कीच्या कथा ऐकल्यानंतर त्यांच्या वाटेला जाण्याचे धाडस कुणी करत नाही. आम्हा पत्रकारांनाही अनेकांचे फोन येतात “अमुक-तमुकच्या वाटेला जाऊ नका, त्याचे देवस्पण खर आहे.” पण जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा अशा कर्मकांडांना काही अर्थ राहत नाही. मग प्रत्येकाला श्रीकृष्णाच्या मंत्राप्रमाणे कर्मासाठी सज्ज व्हावे लागते.
आज अनेक समाजकार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी आणि सजग नागरिक ह्याच प्रेरणेने काम करत आहेत. जमिनींच्या व्यवहारांच्या कथा ऐकल्यानंतर हे स्पष्ट होते की काही राजकारणी किती खालच्या थराला जाऊन गोमंतभूमीचे लचके तोडत आहेत. गरीब लोकांना अक्षरशः फसवले जाते.
या पापांच्या बदल्यात मोठमोठी धार्मिक कार्ये आणि दानधर्म करून आपली सुटका करण्याचा प्रयत्न केला जातो. देवालाही या लोकांनी आपल्या बाजूने ओढून घेतले आहे, आणि सामान्य लोकांना देवही भीक घालणार नाही, असे वाटायला लागले आहे.
किती आणि कसली प्रकरणे सांगायची? ही प्रकरणे उघड केल्यानंतर जनता खडबडून जागी होईल, असा भ्रम वाटतो. पण प्रत्यक्षात कितीही पोलखोल केला तरी जनतेच्या चेहऱ्यावरची माशीही हलत नाही. समाजाची अवस्था गलीतगात्र झाली आहे की काय, असा विचार मनात येतो. समाजाकडे प्रतिकार करण्याची ताकदच उरलेली नाही. आपण परावलंबी बनूनच जगू शकतो, अन्यथा आपली जगण्याची पात्रताच नाही, असा भ्रम समाजाच्या मनात खोलवर रुजलेला आहे.
अशा अवस्थेत महाभारतातील तो मंत्र आठवतो:
“यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्यूत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥”




