कामे सुरू करण्यापूर्वीच लाखोंची बीले बँक खात्यात
गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी):
राज्यात एकीकडे सरकारी कामे पूर्ण करूनही कंत्राटदारांची बीले थकीत ठेवली जात असल्याची चर्चा सुरू असताना, दक्षिण गोव्यातील एका सुपर कंत्राटदारावर सरकार इतकी मेहरबान झाली आहे की, या कंत्राटदाराच्या बीलांची रक्कम कामे सुरू करण्यापूर्वीच बँक खात्यात जमा केली जातात. हल्लीच हा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
केपे तालुक्यातील गोदगळ-आंबावलीचे रहिवासी मारीयानो ओलीव्हेरा यांनी यासंबंधीची तक्रार दक्षता खात्याकडे दाखल केली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे कंत्राटदार धीरज दिनेश देसाई यांनी पंचायत क्षेत्रातील विविध विकासकामांमध्ये घोटाळा केला असून निकृष्ट दर्जाची कामे केली असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. यात कुंकळ्ळी मतदारसंघातील गिरदोळी, चांदोर-कावोरी आणि केपेतील आंबावली पंचायतीच्या कामांचा उल्लेख आहे.
कंत्राटदारच फाईली मंजूर करून आणतात
जीआय निधीतून पंचायत क्षेत्रातील विविध विकासकामांच्या फाईली हा कंत्राटदारच तयार करतो आणि त्या पंचायत खात्यात जाऊन लगेच मंजूर करून घेतो. विशेष म्हणजे, कामे सुरू करण्यापूर्वीच किंवा अर्धवट स्थितीत ती पूर्ण केल्याचा दावा करून, पंचायत मंडळाच्या सहकार्याने बीले पंचायत खात्याकडे पाठवली जातात. तिथे या कंत्राटदाराच्या मर्जीतील अधिकारी बसले असून, ते लगेच ही बीले मंजूर करून पंचायतीला रक्कम बँक खात्यात जमा करण्यास सांगतात. असे प्रकार आता समोर आले आहेत.
गिरदोळी पंचायतीत गोंधळ
गिरदोळी पंचायतीकडून जीआय निधीद्वारे दहा कामे मंजूर करण्यात आली. सुमारे ७० लाखांची ही सर्व कामे धीरज देसाई यांना मिळाली. त्यांनी वर्क ऑर्डर मिळताच सात दिवसांत कामे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र पंचायतीला दिले. पंचायतीने ते गट विकास अधिकारी कार्यालयाला पाठवले. तिथे तांत्रिक विभागाने ते मंजूर करून लगेच रक्कम अदा करण्याचे आदेश दिले. ही गोष्ट मार्च २०२५ मध्ये घडली, पण ऑक्टोबरमध्ये ही कामे प्रत्यक्षात झालीच नसल्याचे उघड झाले. पंच फ्रँकी फर्नांडिस आणि फ्लाविया फिजार्दो यांनी याला तीव्र आक्षेप घेतला आहे. सरपंच सोनिया फर्नांडिस यांनी आपले हात वर केले असून, आपण फक्त बीले गट विकास कार्यालयाला पाठवली असल्याचे सांगितले. कामे झाली की नाहीत किंवा त्यांचा दर्जा काय आहे, याविषयी तांत्रिक विभागच मान्यता देतो, असे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामसभेत सरपंच सोनिया फर्नांडिस यांना ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरले.
आंबावलीतही तोच चमत्कार
केपे तालुक्यातील आंबावली पंचायत क्षेत्रातही अशीच कामे न करताच बीले फेडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येथील रहिवासी मारीयानो ओलीव्हेरा यांनी यासंबंधी दक्षता खात्याकडे तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे, या कंत्राटदारावर एका पंचसदस्याचा आशीर्वाद असल्याची चर्चा सुरू आहे.
विलास तांबोस्कर म्हणतात माझी सही नव्हेच !
सार्वजनिक बांधकाम खात्यातून कार्यकारी अभियंते म्हणून निवृत्त झाल्यानंतर पंचायतमंत्री मॉविन गुदीन्हो यांच्या खास मर्जीने पंचायत खात्यात सेवावाढीवर कार्यकारी अभियंते म्हणून रूजू झालेले विलास तांबोस्कर हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. अवघ्या सात दिवसात कामे पूर्ण केल्याचे पत्र कंत्राटदाराने देताच या कामांची तपासणी न करताच आणि खातरजमा न करताच त्याची बीले फेडण्याचे पत्र त्यांनी पंचायतीला केले आहे. आता हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांनी या पत्रावरील सही आपलीच नव्हेच अशी भूमीका घेतल्याने हे प्रकरण अधिकच स्फोटक बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे.





