पणजी पोलिस स्थानकात गुन्हा नोंद
गांवकारी, दि. ७ (प्रतिनिधी)
सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांना पणजी पोलिस स्थानकातून चौकशीसाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता हजर राहण्याची नोटीस प्राप्त झाली आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ आणि ३५२ अंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती या नोटीशीत देण्यात आली आहे.
यापूर्वी भाजपचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष महानंद अस्नोडकर यांनी फोनवरून शेर्लेकर यांना धमकी दिल्याचे प्रकरण घडले होते. शेर्लेकर यांच्या एका व्हिडिओला आक्षेप घेऊन त्यांनी ही धमकी दिली होती. या प्रकरणी पर्वरी पोलिस ठाण्यात अस्नोडकर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता. आता पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल झाल्याचे सांगून स्वप्नेश शेर्लेकर यांच्याविरोधातच गुन्हा नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
दोन्ही लागू केलेली कलमे धार्मिक भावना दुखावणे आणि शांतता भंग करण्याच्या संदर्भातील असल्यामुळे या व्हिडिओचा संदर्भ असण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे. मुळात तक्रारदाराचे नाव पोलिसांनी नोटीशीत नमूद केलेले नाही.
“आपल्या व्हिडिओत आपण कुठल्याही धर्माचा किंवा देवदेवतांचा अपमान केलेला नाही, उलट त्यांच्या धार्मिक महात्म्याचे वर्णन केले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे धार्मिक महात्म्य जपावे, असे आवाहन करणारा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमुळे धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दाखल झाली असेल आणि त्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला असेल, तर अशा भावनांबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यांचाही पाठपुरावा करावा लागेल,” असे शेर्लेकर यांनी सांगितले.
“खोट्या तक्रारी दाखल करून समाजात मोकळेपणाने बोलणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचे हे कटकारस्थान आहे,” अशी प्रतिक्रिया शेर्लेकर यांनी दिली.






