राजन कोरगांवकर यांचा उपक्रम
पेडणे, दि. ६
शेजारील दोडामार्ग तालुक्यातून गोव्याच्या हद्दीत घुसलेल्या ओंकार नावाच्या हत्तीने पेडणे तालुक्यातील तांबोसे आणि उगवे गावांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. या शेतकऱ्यांना सरकारतर्फे मदत मिळणार असल्याचे सांगण्यात आले असले, तरी मिशन फॉर लोकल पेडणेचे राजन कोरगांवकर यांनी आपल्यापरीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांना धीर दिला आहे.
तांबोसे गावातील सुमारे ७ ते ८ शेतकऱ्यांना आर्थिक मदत केल्यानंतर, रविवारी उगवे गावांतील अशाच पीडित शेतकऱ्यांना राजन कोरगांवकर यांच्याकडून आर्थिक मदत देण्यात आली. सरकारतर्फे मदत मिळण्यात उशीर होणार असल्याने, या शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळावा आणि त्यांचा धीर खचू नये, यासाठी आपण केलेली ही छोटीशी मदत असल्याचे कोरगांवकर यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे नुकसान हे पैशांनी मोजता येणार नाही. या शेती उत्पादनामागे मेहनत आणि कष्ट लागतात. भरपाई ही जुजबी असली, तरी पुन्हा हे उत्पादन करण्यासाठी वर्षांचा कालावधी लागतो, असेही राजन कोरगांवकर यांनी सांगितले.
याप्रसंगी राजन कोरगांवकर यांनी शेतकऱ्यांसोबत शेतात फिरून पाहणी केली आणि नुकसानीचा आढावा घेतला. शेतकरी हा अन्नदाता आहे. त्याचा धीर आणि आत्मविश्वास अजिबात कमी होऊ नये, याची दखल समाजाने आणि सरकारने घेण्याची गरज आहे, असेही राजन कोरगांवकर म्हणाले.






