
सरकारातील आमदार, मंत्र्यांची कसोटी
गांवकारी, दि. ३ (प्रतिनिधी)
वाहतूक खात्याने जारी केलेल्या एप अग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात राज्यभरातील टॅक्सी व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. या आक्रमकतेची गंभीर झळ किनारी भागांतील आमदार आणि मंत्र्यांना बसणार आहे.
ही मार्गदर्शक तत्त्वे रद्द करण्यासाठी एकीकडे दबाव वाढत असताना काही सरकारी घटकांनी टॅक्सी व्यावसायिकांच्या दबावाला बळी न पडता ही तत्त्वे लागू करण्याचा निर्धार केला आहे.
एकाच दिवसात १६०० हून अधिक हरकती
सोमवारी राज्यभरातून तब्बल १६०० हून अधिक हरकती नोंद झाल्या. कडक पोलिस बंदोबस्तात वाहतूक खात्याकडून या हरकती स्वीकारण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
वाहतूकमंत्री मॉविन गुदीन्हो यांनी हा केवळ मसुदा असल्याचे सांगून टॅक्सी व्यावसायिकांना विश्वासात घेऊनच अंतिम मसुदा ठरवण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. मात्र, सरकारमधील अनेक आमदार आणि मंत्र्यांनी एप एग्रीगेटर सेवेचे समर्थन केल्यामुळे सरकारमध्येच मतभेद उफाळले आहेत.
केंद्राचा वाढता दबाव
राज्यात एप अग्रीगेटर लागू करण्यासाठी केंद्र सरकारचा दबाव वाढत आहे. पर्यटन व्यवसायातील बड्या लोकांनी टॅक्सी व्यावसायिकांच्या संदर्भात अनेक तक्रारी केल्या आहेत. अनेक बड्या कंपन्या टॅक्सी व्यवसायात येण्यास इच्छुक असल्यामुळे त्यांनी केंद्रातील नेत्यांना संपर्क साधून गोव्यात व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले आहे. राज्यातील सर्व टॅक्सी व्यावसायिकांना एप एग्रीगेटरच्या कक्षेत आणून हा व्यवसाय ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालू असल्याची माहिती व्यावसायिकांकडून मिळाली आहे.
मायकल लोबो आक्रमक
उत्तर गोव्यातील टॅक्सी व्यावसायिकांचे नेतृत्व करणारे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनाही आज व्यावसायिकांनी फैलावर घेतले.
योगेश गोवेकर यांनी थेट लोबो यांना आव्हान देत टॅक्सी व्यावसायिकांच्या उपजीविकेवर आघात झाला, तर लोबो यांचे राजकीय अस्तित्वच धोक्यात येईल, असा इशारा दिला. लोबो यांनी व्यावसायिकांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला.