खऱ्या अर्थाने मराठी पत्रकारितेला चंद्रकांत केणी यांच्यानंतर गोंयकारपणाचा स्पर्श करणारे सुरेश वाळवे हेच ठरले.
गोमंतकीय मराठी पत्रकारितेत महाराष्ट्रीय किंवा मूळ गोमंतकीय परंतु महाराष्ट्रात मान्यता मिळवून आलेल्या पत्रकारांनाच संपादक बनवण्याची एक परंपरा रूढ झाली होती. याला अपवाद ठरले सुरेश वाळवे. या मातीत जन्मलेला, मूळ गोमंतकीय पत्रकारही मराठीतून संपादकपदाची जबाबदारी लिलया पेलू शकतो, हे त्यांनी आपल्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले.
संपादकपदावरून आपल्या कणखर, सडेतोड आणि मिश्किल शैलीच्या अग्रलेखांद्वारे त्यांनी गोमंतकीय वाचकांच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण केले. म्हणूनच कित्येक गोमंतकीय वाचकांच्या हृदयाजवळील काखेत नवप्रभाचा अंक हमखास दिसत असे.
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि दै. नवप्रभाचे माजी संपादक सुरेश वाळवे यांच्या निधनाची वार्ता ऐकताच मन हेलावून गेले. अगदी अलीकडेच फोनवरून आणि व्हॉट्सॲपवरून गांवकारीच्या अग्रलेखांचे किंवा व्हिडिओंचे कौतुक करणारे ते एकमेव ज्येष्ठ पत्रकार होते.
मुळात मला पत्रकारितेत घडवणारेच सुरेश वाळवे सर. त्यांच्या संपादकपदाखाली मी काम केले नसले तरी माझे पहिले वाचकांचे पत्र आणि पहिला लेख त्यांनीच प्रसिद्ध केला आणि माझ्यातील पत्रकारितेच्या पात्रतेची ओळख मला करून दिली. वृत्तपत्रातील लेखनाची आवड ओळखून माझ्या वडिलांनी मला नवप्रभाचा अग्रलेख आणि रविवारच्या पुरवणीतील चक्रव्यूह सदर वाचण्याची सक्तीच केली होती. त्यावेळी सुरेश वाळवे यांचा एक वेगळाच दरारा होता.
त्यांचे सरळ वागणे आणि मुक्तपणे आपली भूमिका मांडण्याची सवय अनेकांना रूचत नसे, परंतु इतरांसाठी त्यांनी आपल्या स्वभावात कधीच बदल केला नाही.
निवृत्तीनंतर ते विविध बातम्या, लेख किंवा प्रसंगांवरून संपर्कात राहत. मी पत्रकार संघटनेचा अध्यक्ष असताना त्यांनी आपल्या नावाने ग्रामीण पत्रकारांसाठी पुरस्कार देण्याची योजना पुढे केली आणि तेव्हापासून संघटनेच्या पत्रकारिता पुरस्कारांत ग्रामीण पत्रकारांचीही दखल घेतली जाऊ लागली.
गांवकारीसाठी मदतीचा हात पुढे करणारे वाळवे सर हे कायमच स्मृतीत राहणारे व्यक्तिमत्त्व आहे. रूबाबदार व्यक्तिमत्त्व, टापटीप पोशाख आणि संवादाची एक विशिष्ट शैली यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व नेहमीच खुलून दिसे.
खऱ्या अर्थाने मराठी पत्रकारितेला चंद्रकांत केणी यांच्यानंतर गोंयकारपणाचा स्पर्श करणारे सुरेश वाळवे हेच ठरले. चंद्रकांत केणी स्मृती पुरस्कार मिळाल्यानंतर “गुरूच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा आपल्यासाठी सर्वोच्च मान” असल्याचे उद्गार त्यांनी काढले होते.
तब्बल तीन तप पूर्णवेळ सक्रिय पत्रकारितेत घालवलेले सुरेश वाळवे यांच्यासाठी पत्रकारिता हा श्वासच नव्हे तर प्राण होता. तरीही २००८ साली निवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक कार्यात स्वतःला गुंतवले. कर्करोगाच्या आजारामुळे ते अजिबात ढळले नाहीत. त्यांनी या दुर्धर आजारावरही धैर्याने मात केली. “आपल्यावर किती कॅमो झाले” हे ते अभिमानाने सांगत.
वाचकांची चळवळ आणि नवोदित लेखक, पत्रकार घडविण्यात त्यांचे मोलाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. नवप्रभाला त्यांनी एक वैचारिक व्यासपीठ बनवले आणि त्यातून खऱ्या अर्थाने गोमंतकीय समाज, संस्कृती, निसर्ग, परंपरा यांची ओळख करून देण्याचे कार्य केले.
भतग्राम भूषण म्हणूनही त्यांना मान प्राप्त झाला होता. राज्य सरकारच्या पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांचा सन्मान झाला होता. गोव्याचे राजकारण, समाजकारण, आर्थिक विकास अगदी जवळून पाहिलेले वाळवे सर हे जाणे म्हणजे अनुभवाचे आणि वडिलकीच्या नात्याने एक मार्गदर्शकच हरवले आहे.
त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, हीच प्रार्थना.




