वास्कोतील अग्नितांडवात व्यापार बेचिराख

१५० हून अधिक दुकाने जळून खाक
———————————————–
गांवकारी, दि. २९ (प्रतिनिधी)
वास्को शहरात बुधवारी रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या भीषण आगीने व्यापारी वर्गाला जबरदस्त आर्थिक फटका बसला. टिळक मैदानाजवळील वाहनांच्या सुट्या भागांच्या दुकानाला लागलेल्या आगीनंतर अवघ्या तासाभरात संडे मार्केटमध्ये अग्नितांडव घडले. या आगीत १५० हून अधिक दुकाने आणि स्टॉल जळून खाक झाल्याने व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक लहान व्यावसायिकांचा वर्षानुवर्षे उभा केलेला व्यवसाय काही तासांत उद्ध्वस्त झाला. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या दुर्घटनेने वास्कोतील अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थेच्या सज्जतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत.

तासाभराच्या अंतराने दोन ठिकाणी आगीचा भडका

बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास टिळक मैदानाजवळील वाहनांच्या सुट्या भागांची विक्री करणाऱ्या दुकानाला अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने दुकानासह समोर उभी असलेली वाहनेही जळून खाक झाली. अग्निशामक दलाचे जवान ही आग आटोक्यात आणून परतत असतानाच रात्री साडेअकराच्या सुमारास संडे मार्केटला भीषण आग लागल्याची माहिती मिळाली.

संडे मार्केटमधील आगीने काही वेळातच उग्र स्वरूप धारण केले. एकामागोमाग एक दुकाने आणि स्टॉल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. कपडे, पादत्राणे, भांडी आणि इतर वस्तूंची विक्री करणाऱ्या लहान व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सणासुदीच्या काळासाठी भरून ठेवलेला मालही जळून खाक झाल्याने अनेक व्यापाऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

अग्निशामक दलाची रात्रभर झुंज

आगीची तीव्रता लक्षात घेऊन वास्कोसह मडगाव, पणजी, वेर्णा, फोंडा आणि जुने गोवा येथून अग्निशामक दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या. भारतीय नौदल, तटरक्षक दल, गोवा शिपयार्ड लिमिटेड आणि मुरगाव पोर्ट ऑथॉरिटीच्या अग्निशामक पथकांनीही मदतकार्य केले.

मात्र, बाजारपेठेतील अरुंद रस्ते आणि गर्दीमुळे अग्निशामक दलाला घटनास्थळी पोहोचताना तसेच आग विझवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पहाटेच्या सुमारास आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले.

मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदतीचे आश्वासन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. स्थानिक आमदार कृष्णा ऊर्फ दाजी साळकर, आमदार संकल्प आमोणकर, पालकमंत्री मॉवीन गुदिन्हो, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस, मामलेदार आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. आगीमुळे झालेल्या नुकसानीचे सविस्तर मूल्यांकन करून प्रभावित व्यापाऱ्यांना आवश्यक आर्थिक मदत देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. काही व्यापाऱ्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देशही पोलिसांना देण्यात आले आहेत.

पालकमंत्री मॉवीन गुदिन्हो यांनी आपत्कालीन व्यवस्थेतील त्रुटींची दखल घेत अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली.

बाजारपेठेत प्रवेशबंदी; अज्ञाताविरोधात गुन्हा

दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत बाधित बाजारपेठ आणि त्याच्या ५० मीटर परिसरात नागरिकांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी घातली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि तपासकामात अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किटसह इतर संभाव्य कारणांचा पोलीस आणि अग्निशामक दल तपास करीत आहेत. वास्को पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला असून घातपाताच्या शक्यतेचाही तपास सुरू आहे.

आपत्कालीन यंत्रणा अपयशी; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी या दुर्घटनेवरून राज्य सरकारच्या आपत्कालीन व्यवस्थेवर जोरदार टीका केली. वास्को हे अग्निसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील शहर असून विधानसभेत वारंवार हा विषय उपस्थित करूनही सरकारने आवश्यक उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला.

दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी या दुर्घटनेला राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी केली. नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना विलंब न करता आर्थिक मदत द्यावी, असेही त्यांनी सरकारला आवाहन केले.

अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ अग्निदुर्घटनेनंतर राज्यातील अग्निसुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. आता वास्कोतील या भीषण आगीने व्यापारी आस्थापने, बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आणला आहे.

वास्कोसारख्या व्यापारी शहरातील बाजारपेठांची नियमित अग्निसुरक्षा तपासणी होते का, आपत्कालीन परिस्थितीत अग्निशामक वाहनांना पोहोचण्यासाठी पुरेसे रस्ते उपलब्ध आहेत का, तसेच आग प्रतिबंधक उपकरणांची व्यवस्था कितपत सक्षम आहे, याची उत्तरे प्रशासनाला द्यावी लागणार आहेत.

नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देणे आवश्यक असले, तरी भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वास्कोतील या अग्नितांडवानंतर तरी प्रशासन अग्निसुरक्षेबाबत गंभीर होणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे

  • Related Posts

    एसटी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने समाजाचा विश्वासघात केला : विजय सरदेसाई

    उच्च न्यायालयाने गोव्यातील अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचा अंदाज निश्चित करणाऱ्या अधिसूचनेला अंतरिम स्थगिती दिल्याने गोव्यातील अनुसूचित जमातींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीला धक्का बसला आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सरकारवर समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप केला.

    ₹16-Crore Janjati Gaurav Celebrations Under Scanner; Congress Alleges Massive Irregularities

    The Goa Pradesh Congress Committee (GPCC) has alleged massive financial irregularities in the BJP government’s Janjati Gaurav Week celebrations, questioning expenditure exceeding ₹16 crore, including ₹7.67 crore spent on a single day, November 15, 2025.

    You Missed

    29/10/2026 e-paper

    29/10/2026 e-paper

    वास्कोतील अग्नितांडवात व्यापार बेचिराख

    वास्कोतील अग्नितांडवात व्यापार बेचिराख

    आगलावे सरकार!

    आगलावे सरकार!

    पंतप्रधानांकडून ठोस कार्यवाही नाही?

    पंतप्रधानांकडून ठोस कार्यवाही नाही?

    एसटी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने समाजाचा विश्वासघात केला : विजय सरदेसाई

    एसटी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने समाजाचा विश्वासघात केला : विजय सरदेसाई

    ₹16-Crore Janjati Gaurav Celebrations Under Scanner; Congress Alleges Massive Irregularities

    ₹16-Crore Janjati Gaurav Celebrations Under Scanner; Congress Alleges Massive Irregularities