पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचे वनमंत्र्यांना आव्हान
————————————————————————————————–
गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी)
म्हादई अभयारण्यातील वाघाच्या चित्रफितीवरून वनमंत्री विश्वजित राणे यांनी केलेल्या दाव्याला पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी आव्हान दिले आहे. संबंधित चित्रफीत कर्नाटकातील असल्याचा दावा कोणत्या पुराव्यांच्या आधारे करण्यात आला, याचा खुलासा गोवा आणि कर्नाटकच्या वनखात्यांनी करावा, अशी मागणी केरकर यांनी केली. तसेच म्हादई अभयारण्यात कॅमेरा ट्रॅप लावण्यास अधिकृत परवानगी दिल्यास तीन महिन्यांत वाघाच्या अस्तित्वाचे ठोस पुरावे सादर करण्याचे आव्हान त्यांनी वनमंत्र्यांना दिले.
वाघाची चित्रफीत गोव्यातील नसून कर्नाटकातील असल्याचे राणे यांनी म्हटले होते. कर्नाटक वनखात्यानेही चित्रफितीच्या उगमाची खातरजमा करून प्रसिद्धीपत्रक जारी केल्याचा दावा त्यांनी केला होता. काही जण एआयच्या माध्यमातून तयार केलेल्या चित्रफितीही समाजमाध्यमांवर प्रसारित करून दिशाभूल करीत असल्याचा आरोपही राणे यांनी केला होता.
यावर प्रतिक्रिया देताना केरकर यांनी चित्रफीत कर्नाटकातील असल्याचा निष्कर्ष कोणत्या तथ्यांच्या आधारे काढण्यात आला, असा सवाल उपस्थित केला. गोवा आणि कर्नाटक या दोन्ही वनखात्यांनी यासंदर्भातील पुरावे आणि माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
म्हादई अभयारण्यात कॅमेरा ट्रॅप लावण्यासाठी अधिकृत परवानगी देण्याची मागणी करणारे पत्र वनखात्याला सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. परवानगी मिळाल्यास तीन महिन्यांत वाघाच्या अस्तित्वाचे ठोस पुरावे वनमंत्र्यांकडे सादर करू, असे केरकर यांनी स्पष्ट केले.






