१ डिसेंबरपासून अर्ज, दरमहा सुमारे २० हजार
———————————————————————————–
गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी)
राज्य विधानसभा निवडणूकीला आता फक्त दोन ते अडीच महिने बाकी असताना सरकारने बेरोजगारांसाठी अप्रेंटिसशीप योजनेचे गाजर पुढे केले आहेत. हल्लीच या योजनेच्या मानधनातही भरीव वाढ करण्यात आल्याने भाजपसाठी ही योजना मतांची बेगमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे.
गोवा मुख्यमंत्री अप्रेंटिसशीप योजनेअंतर्गत कंत्राट वितरण कार्यक्रम आज फोंडा येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अभियंते, वकील, शिक्षक आणि पॅरामेडिकल क्षेत्रातील पात्र उमेदवारांना सरकारी अप्रेंटिसशिपसाठी १ डिसेंबरपासून अर्ज करण्याचे आवाहन केले. निवड झालेल्यांना दरमहा सुमारे २० हजार रुपये मानधन मिळेल. या प्रशिक्षणातून कायमस्वरूपी सरकारी नोकरीची हमी मिळणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
अप्रेंटिसशिप धोरणाचा आतापर्यंत सुमारे ३३ हजार युवकांना लाभ झाला आहे. त्यापैकी जवळपास १५ हजारांना सरकारी खात्यांत, तर १८ हजारांना खासगी क्षेत्रात प्रशिक्षणाची संधी मिळाली. ४५० ते ५०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची प्रस्तावपत्रे मिळाली असून, जवळपास एक हजार विद्यार्थ्यांची करारावर स्वाक्षरी बाकी आहे. आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून करारावर स्वाक्षरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
पाच हजार अभियंते घडवण्याचे उद्दिष्ट- सुभाष शिरोडकर
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ५२८ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण केल्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले. विशेषतः ग्रामीण गोव्यात दहावी किंवा बारावीनंतर जवळपास निम्मे विद्यार्थी पुढील शिक्षण घेत नसल्याचे त्यांनी नमूद केले. युवकांनी तांत्रिक आणि उच्च शिक्षण घ्यावे, तसेच गोव्यात दरवर्षी पाच हजार अभियंते घडवण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे शिरोडकर म्हणाले.





