निरर्थक वादाचा धुरळा नको !

राजकीय संदर्भ घेऊन एखाद्या वैज्ञानिक संशोधनाचा चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा तो शैक्षणिक प्रक्रियेसाठी घातक ठरू शकतो. जर संशोधनातील निष्कर्ष अचूक नसतील, तर संशोधनाद्वारेच त्याचा प्रतिवाद करणे हे योग्य शास्त्रीय दृष्टीकोन असेल.

म्हादई नदीचे पाणी वाटप हा गोव्यासाठी अत्यंत संवेदनशील विषय राहिला आहे. यासंबंधी अनेक चर्चा, आंदोलने, न्यायालयीन लढाया आणि राजकीय समीकरणे पाहायला मिळाली आहेत. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (एनआयओ) च्या काही शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या संशोधन पेपरमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. एनआयओच्या शास्त्रज्ञांनी म्हादईच्या पाणी वाटपासंबंधी एक संशोधन पेपर तयार केला, ज्यावर काही गृहितके आणि आकलन मांडण्यात आले. या पेपरमध्ये कर्नाटकच्या बाजूने मदत होईल, अशी भूमिका असल्याचा आरोप करण्यात आला, ज्यामुळे संशयाच्या भोवऱ्यात केंद्र आणि गोवा सरकारला खेचले गेले. या पेपराविषयी एका राष्ट्रीय वृत्तपत्राने बातमी प्रकाशित केल्यानंतर, आरजीपी पक्षाने सरकारची भूमिका उघड करण्याची मागणी केली. पक्षाने दोना पावला येथील एनआयओ कार्यालयाबाहेर निदर्शनेही केली आणि केंद्र तसेच गोवा सरकारवर आरोप केले. आरजीपीचे आमदार विरेश बोरकर आणि अध्यक्ष मनोज परब यांनी हा संशोधन पेपर भाजपच्या योजनांचा भाग असू शकतो, अशी शंका व्यक्त केली. म्हादईच्या पाणी वाटपाचा निर्णय जलतंटा लवादाने दिला आहे. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. राजकीय पटलावर म्हादई पाणी वाटपाचा सर्रासपणे वापर भाजप आणि काँग्रेसकडूनही झाला आहे. या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना अडचणीत आणण्याची योजना म्हणून आरजीपीने या अहवालाचा राजकीय दृष्ट्या योग्य वापर करून घेतला. राजकारण म्हणून हे ठिक असले तरी थेट संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना टीकेचे लक्ष्य करणे कितपत योग्य. म्हादई जलतंटा लवादासमोर सुनावणीवेळी पर्यावरणवाद्यांकडून मांडण्यात आलेल्या भूमीकांना शास्त्रोक्त आधार नाही,असे लवादाने यापूर्वी म्हटले आहे. गोवा सरकारने शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी जो पुढाकार घेणे अपेक्षीत होते तो घेतलेला नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अधिकृत स्पष्टीकरण देताना सांगितले की, हा संशोधन पेपर सरकारने तयार करवून घेतलेला नाही, तसेच म्हादई जल वाटप लवादानेही तो तयार करण्यास सांगितलेले नाही. त्यामुळे या विषयावर गैरसमज पसरवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. मुळात हा अहवाल नाही तर संशोधन पेपर आहे. हा पेपर के. अनीलकुमार, डी. शंकर आणि के. सुप्रीत या तिघा शास्त्रज्ञांनी तयार केला. ह्यांपैकी केवळ डी. शंकर हे एनआयओमध्ये कार्यरत आहेत, तर अनीलकुमार चंद्रपूरच्या सरकारी नवीन कॉलेजमध्ये आणि सुप्रीत भारतीय राष्ट्रीय समुद्री माहिती सेवा केंद्रात कार्यरत आहेत. डी. शंकर हे एनआयओचे माजी संचालक तसेच गोवा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सतीश शेटये यांचे विद्यार्थी आहेत. हा संशोधन पेपर २०२३ मध्ये तयार करून २०२४ मध्ये प्रकाशित झाला. शैक्षणिक संशोधनाचा हेतू राजकीय नसतो, त्यामुळे या विषयावर अनावश्यक वाद निर्माण करणे योग्य ठरणार नाही. राजकीय संदर्भ घेऊन एखाद्या वैज्ञानिक संशोधनाचा चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा तो शैक्षणिक प्रक्रियेसाठी घातक ठरू शकतो. जर संशोधनातील निष्कर्ष अचूक नसतील, तर संशोधनाद्वारेच त्याचा प्रतिवाद करणे हे योग्य शास्त्रीय दृष्टीकोन असेल. म्हादई जलवाटप हा भविष्यातही चर्चेत राहणाराच विषय आहे. संशोधन आणि शास्त्रज्ञांची भूमिका कायम स्वतंत्र राहायला हवी, तसेच सरकारने या विषयावर पारदर्शी चर्चा करून लोकांना स्पष्टता द्यायला हवी. राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये अडकण्यापेक्षा, गोव्यासाठी योग्य काय आहे, यावर आधारित निर्णय घेणे आवश्यक आहे.

  • Related Posts

    बेरोजगारांची थट्टा थांबवा

    निवडणुकीच्या आधी भरती करून मतांची बेगमी करायची आणि नंतर त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नशिबावर सोडून द्यायचे, हा प्रकार गेली अनेक दशके सुरू आहे. गोव्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्या की सरकारी भरतीच्या…

    गोंयकार जागा होईल ?

    त्यामुळे आर्थिक विकासाबरोबर शाश्वततेचाही विचार करणे आवश्यक आहे. अन्यथा काही दशकांनंतर गोवा नकाशावर राहील, पण त्याची ओळख आणि वैशिष्ट्ये कायमची नष्ट होतील कारापूरमधील आंदोलनाने ७७ दिवसांचा टप्पा पार केला आहे.…

    You Missed

    PwD Reservation Rights Complaint: Gadekar Seeks Urgent Intervention from State Commissioner

    PwD Reservation Rights Complaint: Gadekar Seeks Urgent Intervention from State Commissioner

    22/06/2026 e-paper

    22/06/2026 e-paper

    बेरोजगारांची थट्टा थांबवा

    बेरोजगारांची थट्टा थांबवा

    २७ जूनपर्यंत सरकारला ‘अल्टीमेटम’

    २७ जूनपर्यंत सरकारला ‘अल्टीमेटम’

    मडगांवच्या विकास प्रकल्पांत पारदर्शकता राखा मडगांवचो आवाजचे नेते प्रभव नायक यांची मागणी

    मडगांवच्या विकास प्रकल्पांत पारदर्शकता राखा मडगांवचो आवाजचे नेते प्रभव नायक यांची मागणी

    प्रवेश प्रक्रियेत गैरव्यवहाराचा ठपका; प्राचार्य साबा डीसिल्वा यांना सक्तीची निवृत्ती

    प्रवेश प्रक्रियेत गैरव्यवहाराचा ठपका; प्राचार्य साबा डीसिल्वा यांना सक्तीची निवृत्ती