फोंड्यावर कुणाचा झेंडा फडकणार?

आता खरी कसोटी जनतेची आहे. लोकशाहीत जनता हीच राजा असते. फोंड्यातील जनता आपले राजेपण टिकवून ठेवते की बंदिस्त झाल्याचे दर्शन घडवते, हे निकालातून स्पष्ट होईल.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फोंडा पोटनिवडणुकीचा निकाल फार महत्त्वाचा ठरणार आहे. भाजपला याची पूर्ण जाणीव असल्यामुळेच आजच्या घडीला फोंड्यात सरकार आणि पक्षाने पूर्णपणे ठाण मांडले आहे. फोंडा मतदारसंघाच्या संपूर्ण इतिहासात इतक्या प्रमाणात सरकारी मंत्री किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांचे पाय लागले नसतील. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तर फोंडा पिंजून काढण्याचा चंग बांधला आहे. आत्तापर्यंत माजी मंत्री स्व. रवी नाईक जीवंत असताना मुख्यमंत्री किंवा सरकारने लक्ष घातले असते, तर आज सरकार आणि पक्षाची अशी दमछाक झाली नसती.
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासाठीही ही लढत फार महत्त्वाची आहे. प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर ही पहिलीच पोटनिवडणूक असल्याने त्यांच्या संघटनात्मक कामाची पोचपावती या निकालातून दिसून येणार आहे. किमान पाच हजारांच्या फरकाने रितेश नाईक विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा फोंड्यात होणार आहे. त्यामुळे दामू नाईक यांच्या पाच हजारांच्या मताधिक्यात आणखी किती मते जोडली जातील, हे सांगता येत नाही. भाजप–मगो आघाडीची ताकद आणि सरकारच्या यंत्रणेचा पूर्ण वापर पाहिल्यानंतर विरोधी उमेदवारांची अनामत जप्त होणार की काय, असा दरारा भाजपने निर्माण केला आहे. एवढे सगळे करूनही जर लढत अटीतटीची झाली, तर २०२७ च्या निवडणुकीत भाजपचे काही खरे नाही, असेच म्हणावे लागेल.
भाजपचे संघटन कौशल्य याला तोड नाही, हे कुणीही मान्य करेल. संघटन आणि नियोजनात भाजप विरोधकांच्या कितीतरी पुढे आहे. परंतु सरकारची धोरणे चुकीची असतील, भ्रष्टाचाराने कळस गाठला असेल, कुशासनाचा अनुभव लोकांना रोजच्या व्यवहारांत दिसत असेल, तर केवळ संघटन कौशल्य आणि व्यवस्थापनाच्या बळावर निवडणुका जिंकता येतील काय, हा खरा प्रश्न आहे. फोंडा पोटनिवडणुकीचा निकाल या अर्थाने भाजपसाठी प्रयोग ठरेल. या प्रयोगात जर त्यांना यश मिळाले, तर गोव्याचे सुरू असलेले लचके तोडण्याचे प्रकार सुरूच राहतील, कारण मतदारांना त्या वेदना जाणवत नाहीत, असा अर्थ निघेल.
मतदारांची जातनिहाय, प्रदेशनिहाय, व्यावसायनिहाय विभागणी करून भाजपने वेगवेगळ्या बैठका व सभांचे आयोजन केले आहे. पैशांचा सर्रास वापर सुरू आहे. पक्षाचे काही प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची कर्जेही या निमित्ताने फिटली गेली, अशी चर्चा आहे. भाजपच्या तिकिटासाठी प्रमुख दावेदार असलेल्या अपूर्व दळवी यांच्याकडेच रितेश नाईक यांना निवडून आणण्याचे सेनापतीपद बहाल करून भाजपने आपल्या राजकीय धूर्तपणाचे दर्शन घडवले आहे. राज्यातील मंत्री व आमदार आपल्या मतदारसंघातील प्रश्न वाऱ्यावर सोडून फोंड्यात हिंडताना दिसतात, त्यामुळे त्यांच्या मतदारांकडून त्यांच्यावर लाखोली वाहिली जात आहे. हा सगळा अटापीटा पाहता गेली १४ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपला स्वतःवरच विश्वास नाही की काय, असा प्रश्न पडतो.
भाजपने फोंड्यात दहशतीचे वातावरण तयार केल्याचेही काहीजण सांगतात. विरोधी उमेदवारांचा फोटो किंवा समर्थनार्थ कमेंट सोशल मीडियावर केली तरी थेट धमक्या दिल्या जातात, अशी माहिती मिळते. पोलिस स्थानकात तक्रार नोंदवायची नाही, असे फर्मान जारी झाल्याची चर्चा आहे. खाजगी क्षेत्रातील नोकरी करणाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत. परप्रांतीय मतदारांना तर विविध माध्यमांतून निर्वाणीचा इशारा दिला आहे. एखादे मत भाजपच्या विरोधात गेले तरी खैर नाही, असे वातावरण निर्माण झाले आहे. हे सगळे घडत असताना निवडणूक आयोग मात्र निपक्ष, निर्भय आणि पारदर्शक निवडणुकीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात व्यस्त आहे.
आता खरी कसोटी जनतेची आहे. लोकशाहीत जनता हीच राजा असते. फोंड्यातील जनता आपले राजेपण टिकवून ठेवते की बंदिस्त झाल्याचे दर्शन घडवते, हे निकालातून स्पष्ट होईल.

  • Related Posts

    शांत गोव्याला बंदुकीची सलामी ?

    विशेषतः मोठ्या आर्थिक उलाढालीच्या व्यवसायात पैशांच्या वादातून हिंसक मार्गाचा अवलंब होऊ लागला, तर त्याचा परिणाम गोव्याच्या गुंतवणूक आणि पर्यटन प्रतिमेवरही होऊ शकतो. गोवा म्हणजे शांतता, पर्यटन आणि सुरक्षिततेची ओळख. मात्र,…

    धर्मांतरविरोधी विधेयक; राजकीय डाव ओळखा !

    चर्चसंस्थेने विरोधकांना हाताशी धरून या विधेयकाला तीव्र विरोध केला, तर भाजपकडून चर्चसंस्थेवर केले जाणारे धर्मांतराचे आरोप अधिक आक्रमकपणे पुढे केले जातील. राज्य विधानसभेच्या निवडणुकीला अवघे पाच-सहा महिने शिल्लक असताना धर्मांतर…

    You Missed

    तोरसेत राजन कोरगावकरांना जोरदार पाठिंबा; ‘भूमिपुत्राला विधानसभेत पाठवू’ असा निर्धार

    तोरसेत राजन कोरगावकरांना जोरदार पाठिंबा; ‘भूमिपुत्राला विधानसभेत पाठवू’ असा निर्धार

    Cancel Porvorim Flyover Inaugural Event, Prabhav Naik Urges Gadkari in Letter

    Cancel Porvorim Flyover Inaugural Event, Prabhav Naik Urges Gadkari in Letter

    At 26, Shavina Shirodkar Takes RGP Helm: Can Gen Z Leadership Reshape Goa’s 2027 Electoral Math?

    At 26, Shavina Shirodkar Takes RGP Helm: Can Gen Z Leadership Reshape Goa’s 2027 Electoral Math?

    Enough Is Enough to Intensify Legal Offensive; Karapur, Casinos on Radar

    Enough Is Enough to Intensify Legal Offensive; Karapur, Casinos on Radar

    AAP Questions Mumbai Police Action Against Karapur Protesters; Valmiki Naik Accuses Goa Govt of Failing to Protect Due Process

    AAP Questions Mumbai Police Action Against Karapur Protesters; Valmiki Naik Accuses Goa Govt of Failing to Protect Due Process

    आरजीपीची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर; शविना नाईक शिरोडकर अध्यक्षपदी

    आरजीपीची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर; शविना नाईक शिरोडकर अध्यक्षपदी