नोकऱ्यांची विक्री करणाऱ्यांनो सोडणार नाही- मुख्यमंत्री
पणजी,दि.३०(प्रतिनिधी)
सरकारी नोकऱ्यांची विक्री करणाऱ्यांना अजिबात सोडणार नाही,असा संकल्प करून यापुढे कर्मचारी भरती आयोगामार्फत गुणवत्तेवर आधारित उमेदवारांचीच नियुक्ती केली जाणार असून लवकरच रिक्त पदांची घोषणा केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
आमिषांना बळी पडू नका
सरकारी नोकऱ्यांची विक्री केली जात असल्याचे पुजा नाईक प्रकरण उघडकीस आल्यानंतर सर्वंत्र एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली असून इतरही अनेकांना अटक झाली आहे. या प्रकरणी सरकारी अधिकाऱ्यांचीही नावे पुढे येत असल्याने सरकारसाठी ही मोठी डोकेदुखी बनू लागली आहे. लोकांनी अशा आमिषांना बळी पडू नये तसेच पैशांनी सरकारी नोकरी मिळवता येत नाही,असे सांगून मुख्यमंत्र्यांनी जनतेला सावध केले आहे. जाहीरात न झालेली किंवा पदांची घोषणा न करताच लोकांकडून पैसे उकळल्याचे प्रकार समोर आले आहेत. जनता अशा भूलथापांना कशी काय बळी पडते असा सवाल करून अशा प्रकारांना आयोगामुळे कायमचा लगाम लागणार आहे,असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
आयोगामार्फत लवकरच पदांची जाहीरात
विविध सरकारी खात्यांतील रिक्त पदांसाठी लवकरच जाहीरात प्रसिद्ध केली जाणार आहे. ही भरती कर्मचारी भरती आयोगामार्फत केली जाणार आहे आणि तिथे वशीला किंवा पैशांची जादू चालणार नाही तर निव्वळ पात्रता आणि गुणवत्तेवर आधारित नोकर भरती केली जाईल,असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.