ही कोंकणीवादी प्रकल्पांच्या अपयशाची कबुलीच

ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत दत्ता नायक ह्यांनी गोमंतक टीव्ही आयोजित एका चर्चासत्रात भाग घेताना मराठी आणि रोमी कोंकणीला अधिकृत राज्यभाषा बनविण्याचे समर्थन केले. हे समर्थन म्हणजे अप्रत्यक्षरित्या कोंकणीवादी प्रकल्पांच्या अपयशाची कबुलीच म्हणावी लागेल…

ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत दत्ता नायक ह्यांनी गोमंतक टीव्ही आयोजित एका चर्चासत्रात भाग घेताना मराठी आणि रोमी कोंकणीला अधिकृत राज्यभाषा बनविण्याचे समर्थन केले. तसेच, गोव्याच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी तामिळनाडूतील डीएमकेच्या धर्तीवर एक प्रादेशिक राजकीय व्यासपीठ तयार करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. नायक यांनी हेही मान्य केले की मगो, युनायटेड गोवन्स आणि गोवा फॉरवर्ड सारख्या प्रादेशिक राजकीय पक्षांना आपले ध्येय साध्य करण्यात अपयश आले आहे. दत्ता नायकांनी अशी मते व्यक्त करणे ही एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे, कारण दत्ता नायक ऐतिहासिकदृष्ट्या नागरी कोंकणीचे समर्थक राहिले आहेत. त्यामुळे मराठीला गोव्याची अधिकृत भाषा बनवण्याचा त्यांचा प्रस्ताव नक्कीच अनेकांच्या भुवया उंचावेल. पण, नायक यांनी हे विधान करून नेमके काय दर्शविले आहे?

मी असे सुचवू इच्छितो की दत्ता नायक यांनी येथे अप्रत्यक्षरित्या कोंकणीवादी प्रकल्पांच्या अपयशाची कबुली दिली आहे. गोव्याच्या परिस्थितीला अनुकूल असे सर्वसमावेशक प्रादेशिक व्यासपीठ निर्माण करण्यात या प्रकल्पांना अपयश आले हेच दत्ता नायकांच्या काळजीतून स्पष्ट होते. नागरी कोंकणीच्या अट्टाहासामुळे गोव्याच्या लोकसंख्येतील दोन महत्त्वाचे गट, म्हणजे कॅथोलिक आणि बहुजन समाज यांना गोमंतकीय मुख्य प्रवाहात सामावून घेण्याच्या शक्यता कमी केल्या. दत्ता नायक यांनी चिन्हित केलेल्या बौद्धिक अध:पतनाचे कारण हे नागरी कोंकणी प्रकल्पांतील अंतर्गत विसंगतीत सापडेल. ही कोंकणी चळवळ अनेक लोकांचा पाठिंब्यावर उभी राहिली, परंतु तिचा लाभ फारच कमी जणांना मिळाला. याचा एक मोठा परिणाम म्हणजे गोमंतकीय मुख्य प्रवाहातून कॅथोलिक समाज हळूहळू बाहेर पडत गेला आणि गोव्याच्या बहुजन समाजापुढे आज एक मोठे बौद्धिक संकट आ वासून उभे आहे. नागरी कोंकणीवरच्या दुराग्रही भूमिकेमुळे गोमंतकीय समाजाला अपेक्षित बौद्धिक चालना मिळू शकली नाही, जी गोव्याचे प्रादेशिक हीत साधण्यासाठी आवश्यक होती. गोव्यातील बौद्धिक आणि साहित्यिक क्षेत्रातील लेखक आणि विचारवंत यांच्या कमी होत चाललेल्या प्रभावाबद्दल चर्चासत्रात व्यक्त केलेली चिंता हे ह्याच अपयशाचे द्योतक आहे.

या चर्चासत्रात आणखी एक अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे राजू नायक यांनी एड. क्लिओफात कुतीन्हो यांनी मांडलेल्या मतांवर कॅथोलिक पक्षपातीपणाचे आरोप केले. पण राजू नायक स्वतः तटस्थ आहेत का? ही संपूर्ण चर्चा भविष्यातील शक्यतांवर केंद्रीत असली तरी, इतिहासात काय चुकले याचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली ह्या चुका घडल्या त्यांनी जाहीररीत्या तशी कबुली देणे आवश्यक आहे. कोंकणी प्रकल्पांमुळे प्रादेशिक एकात्मता निर्माण करण्यात अपयश आले आणि त्यामुळेच कॅथोलिक मुख्य प्रवाहापासून अधिकाधिक दूर गेले हे माझे स्पष्ट मत आहे. आता ऐन वेळेवर सर्व गोमंतकीयांनी एकत्र येण्याचे आवाहन करून कॅथोलिकांनी मुकाट्याने मुख्य प्रवाहात सामील व्हावे असे म्हणणे रास्त नाही. जर एका नवीन प्रादेशिक व्यासपीठाचा विचार होणार असेल तर त्या कल्पनेत कॅथोलिकांना काही प्रमाणात राजकीय स्वायत्तता देखील प्रदान केली पाहिजे. मी तर म्हणेन सचर समितीच्या अहवालासारखा एक अहवाल गोव्यातील कॅथॉलिक समाजाबाबतीत करण्यात यावा आणि गोव्यातील कॅथोलिकांच्या स्थितीचे मूल्यांकन करून त्यांचे विभाजन दूर करण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात. जर गोमंतकीय कॅथोलिक समाज मुख्य प्रवाहात भाग घेत नाही, तर हे अपयश तथाकथित मुख्य प्रवाहाचे आहे, कॅथोलिक समाजाचे नाही. डॉ. जेसन कीथ फर्नांडिस यांच्या सिटिझनशिप इन अ कास्ट पॉलिटी या पुस्तकात त्यांनी रोमी कोंकणीला मान्यता न मिळाल्यामुळे गोमंतकीय कॅथोलिक समुदायाची सतत होत असलेली अवहेलना कशी झाली हे सविस्तर स्पष्ट केले आहे.

या चर्चेत “विशाल गोमंतक” च्या शक्यतेचाही उल्लेख झाला, ज्यात शेजारच्या जिल्ह्यांना गोव्यामध्ये समाविष्ट करण्याबाबत चर्चा होती. या विषयावर वेगळे विश्लेषण आवश्यक आहे.


कौस्तुभ नाईक
(लेखक गोमंतकीय इतिहासाचे संशोधक आहेत )

  • Related Posts

    तुमच्या बाबांचा दोष दाखवता येईल का?

    वसुंधरा दिन विशेष माझ्या वडिलांना जाऊन एकोणीस वर्षे झालीत. पण त्यांनी वेळोवेळी सांगितलेल्या गोष्टी अगदी काल घडल्यासारख्या स्पष्टपणे आठवतात. अलीकडे त्यांच्या आठवणीचे अनेक छोटे लेख मी लिहिले आणि अनेक मित्रांशी…

    मी त्यासाठी नरकात जायला तयार आहे !

    या देशात कसकशी माणसे होऊन गेली, याचे अनेकदा मला आश्चर्य वाटते. तामिळनाडूचे श्रीरामानुजाचार्य हे असेच एक अफलातून व्यक्तीमत्व. अकराव्या शतकात होऊन गेलेला हा वैष्णव संत. दीर्घायुष्य लाभलेला. एका आख्यायिकेनुसार तब्बल…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    23/04/2025 e-paper

    23/04/2025 e-paper

    दहशतवादाचा बिमोड हवाच

    दहशतवादाचा बिमोड हवाच

    राजधानीला ‘मुंबई’ बनवण्याचा घाट का ?

    राजधानीला ‘मुंबई’ बनवण्याचा घाट का ?

    22/04/2025 e-paper

    22/04/2025 e-paper
    error: Content is protected !!