ही जागरूकतेची मशालच आपल्यातील माणूस शिल्लक ठेवणार आहे आणि त्यासाठी सर्वांनी सज्ज होणे हीच काळाची हाक आहे.
दिवाळी हा आनंद, उत्साह आणि स्फूर्तीचा सण. सगळी दु:खे, वेदना, आळस झटकून जीवनाकडे नव्या उमेदीने पाहण्याची प्रेरणा देणारा हा सण आहे. वास्तविक दिवाळी आणि त्या अनुषंगाने येणारे विविध सण हे शेतकऱ्यांच्या जगण्याशी संबंधित आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने पेरलेल्या बीयांचे पीक घेण्याचा हा क्षण म्हणजेच धनप्राप्तीचा सुवर्णकाळ. ही धनप्राप्ती केवळ मेहनत किंवा कष्टावर नव्हे, तर निसर्ग आणि नशिबावरही अवलंबून असते. प्रत्येक कष्टाचे फळ गोड असतेच असे नाही. अशावेळी नियती, परमेश्वर या संकल्पना महत्त्वाच्या ठरतात. यश मिळाले तर सगळ्यांची कृपा आणि अपयश आले तरीही पुन्हा नव्या संघर्षासाठीची तयारी, हा आपल्या जीवनाचा भागच बनला आहे. या परिस्थितीसमोर जो नमतो किंवा शरणागती पत्करतो तो संपतो, आणि संघर्ष करत पुढे जात राहणारा यशस्वी ठरतो.
आजच्या घडीला संघर्षाची इर्षा आणि इच्छा कमी होत चालली आहे. पूर्वी शारीरिक गुलामी होती, आज तिची जागा मानसिक गुलामीने घेतली आहे. ताठ कणा, आत्मसन्मान आदी संकल्पना कालबाह्य होऊ लागल्या आहेत. सहज, सोपे, विनासायास काही मिळत असेल तर त्यासाठी झुंबड उडते; आणि जिथे कष्ट, मेहनतीचा विषय येतो तिथे अपवादानेच कुणीतरी दिसतो. या मानसिक गुलामगिरीच्या स्वभावातूनच आजचे सत्ताधारी जनतेवर राज्य करत आहेत. राज्याचे हित जपण्यासाठी निवडले गेलेले हेच नेते आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी पदांचा वापर करतात आणि आपले हित साधतात. या प्रक्रियेत ते जनतेला मानसिक गुलाम बनवतात आणि वापरून झाल्यावर अडगळीत टाकतात.
जनता कुठल्याही परिस्थितीत एकत्र राहता कामा नये, यासाठी जनतेला वेगवेगळ्या गोष्टींत विभागले जाते. धर्म, जात, पात, आर्थिक-सामाजिक रचना आदींचा वापर करून. अशावेळी वंचित, पीडित, अन्यायग्रस्त घटक एकाकी पडतो आणि त्यांच्याकडे कुणीही लक्ष देत नाही. कालांतराने हा घटक आपोआप नाहीसा होतो आणि त्यात नियमित भर पडत राहते. सामान्य माणूस हळूहळू कालबाह्य होत जातो, असेही दिसून येते.
पत्रकारितेच्या बाबतीत सांगायचे झाले तर, समाजातील शंभर लोकांपैकी ९० लोक समाधानी असतात आणि उर्वरित १० लोक वंचित. पत्रकारांनी या वंचितांचा आवाज बनून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. एखादा जरी वंचित राहिला तरी त्याचा आवाज पोहोचवण्यासाठी पत्रकारांनी काम करावे, अशी शिकवण आम्हाला आहे. आजच्या घडीला अशा पत्रकारांना नकारात्मकतेच्या यादीत टाकले जाते. ‘‘सकारात्मक काहीच दिसत नाही’’ असे म्हणून त्यांना हिणवले जाते. ‘‘दोळे फुटके’’ पत्रकार अशी त्यांची गणना केली जाते.
या दूषणांमुळेच आजची पत्रकारिता समाधानी असलेल्या ९० टक्के लोकांच्या मागेच धावत सुटली आहे, आणि उर्वरित १० टक्के घटक अदखलपात्र ठरू लागला आहे. हा घटक राज्य किंवा देशासाठी काही उपयोगाचा नाही, असे म्हणून एक चित्र तयार केले जात आहे. अर्थात, याचा अर्थ असा की हा घटक देशावर ओझे आहे, अशी एक समाजधारणा तयार होत आहे. ही समाजधारणा केवळ घातकच नव्हे, तर धोकादायक आहे. या उर्वरित १० टक्के घटकांत कधी आपणही येऊ आणि नामशेष होऊ, हे कुणी सांगू शकत नाही.
आपल्यासारख्या कल्याणकारी राज्यपद्धतीत हे धोरण पाप आहे. ‘‘एकमेकां सहाय्य करू’’ या संतवचनांवर आपली जीवनपद्धती उभी आहे. अशावेळी स्वकेंद्रित आणि स्वहितकेंद्रित जीवनपद्धतीला प्रोत्साहन मिळाले, तर समाजाचे विघटन होण्यास वेळ लागणार नाही.
दिवाळीच्या या उत्सवात सगळीकडे दिव्यांची आरास केली जाते. काळोख दूर करून सगळीकडे प्रकाश तेजोमय करणारा हा सण. अशाच तऱ्हेने आपल्यालाही समाजातील अन्यायाचा अंधार दूर करायचा आहे आणि त्यासाठी मशाली हाती घेऊन पुढे सरायचे आहे. ही जागरूकतेची मशालच आपल्यातील माणूस शिल्लक ठेवणार आहे आणि त्यासाठी सर्वांनी सज्ज होणे हीच काळाची हाक आहे.




