राजकीय नेते जेव्हा हलक्या कानाचे बनतात, तेव्हा हलक्या गोष्टीही किती धोकादायक ठरू शकतात, त्याचे हे एक उत्तम उदाहरणच म्हणावे लागेल.
राजकारणात एखाद्या नेत्याला काम करून निवडून आणल्यानंतर तो नेता मंत्री बनला, की त्याची परतफेड करून घेण्याची स्पर्धाच कार्यकर्त्यांत सुरू होते. ही परतफेड सरकारी नोकरीत मिळवण्यासाठी रस्सीखेच चालते. एवढे करून सरकारी नोकरी मिळतेच पण त्याचबरोबर संबंधित मंत्र्यांकडे आपला शब्द चालतो. मग या वजनाचे राजकीय मार्केंटिग सुरू होते. याच कार्यकर्त्यांमुळे अनेक नेते हलक्या कानाचे बनतात मग स्वतःहून संकटे ओढवून घेतात.
चहाडी किंवा खोट्या तक्रारी करून एखाद्याला संकटात टाकण्याची अनेकांना हौस असते. राजकारण्यांना तर अशा लोकांची नितांत गरज असते. डिचोली पोलिस स्थानकाचे निरीक्षक विजय राणे सरदेसाई यांची अलिकडेच तडकाफडकी राखीव दलात बदली करण्यात आली. बदलीचे कारण काय, तर दोन महिला कर्मचाऱ्यांची सतावणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई झाल्याचे सांगितले जाते. मुळात ही तक्रार कुठे दाखल झाली, तक्रारीत सतावणुकीची नेमकी कारणे काय सांगण्यात आली आणि खरोखरच महिला कर्मचाऱ्यांची सतावणूक झाल्याचे संबंधितांना पटले असेल, तर मग बदली का? निलंबन का नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
गेल्या पाच महिन्यांपूर्वीच विजय राणे सरदेसाई हे डिचोली पोलिस स्थानकावर निरीक्षकपदी रुजू झाले होते. शिरगाव चेंगराचेगरी प्रकरणी डिचोलीच्या माजी पोलिस निरीक्षकांची बदली झाल्यानंतर हा ताबा विजय राणे सरदेसाई यांच्याकडे आला होता. गेल्या पाच महिन्यात सर्वसामान्य लोकांच्या नजरेतून त्यांच्या कामांप्रती अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. विजय राणे सरदेसाई यांच्या तडकाफडकी बदलीची फेसबुकवर पोस्ट पडल्यावर खाली आलेल्या प्रतिक्रियांवरून तरी हे स्पष्टपणे जाणवते.
एकीकडे पोलिस खात्याची विश्वासार्हता पूर्णपणे ढासळत आहे. वाढता राजकीय हस्तक्षेप पाहता या खात्याची घसरण रोखणे खूप कठीण वाटू लागले आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर त्याबाबत गुन्हा नोंद करावा की करू नये, यासाठी वरून परवानगी घ्यावी लागते, हे आता पोलिस अधिकारीच उघडपणे सांगू लागले आहेत. राजकीय विरोधक एखाद्या प्रकरणात अडकलेले सापडले की त्यांना सोपेपणाने सोडायचे नाही, असेही अनेक ठिकाणी चालते.
डिचोली निरीक्षकांच्या तडकाफडकी बदलीमागच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यात दोन महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच त्यांच्याबद्दल तक्रारी केल्याची माहिती मिळते. विशेष म्हणजे या तक्रारी पोलिस सेवेशी आणि ड्युटीशी संबंधित आहेत. या व्यतिरिक्त या महिला सतावणुकीत अन्य वेगळे कारण नाही.
महिलांच्या तक्रारी या ब्रह्मास्त्रासारख्या परिणामकारक ठरतात. सहजिकच अस्त्राचा वापर अनेकवेळा वेगळ्या कारणांसाठीही होतो. जरा देखील अतिरिक्त काम पडले किंवा वेगळे काम सांगितले, की थेट अस्त्राचा वापर करायचा. मग संबंधित खातेप्रमुखांनाच लक्ष्य करायचे. अशावेळी सरकारी यंत्रणांना कारवाई करावीच लागते अन्यथा महिलांवरील अन्यायाचा डोंगारा पिटला जातो.
या दोन्ही महिला पोलिस अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या खास परिचयाच्या असाव्यात अन्यथा त्यांनी राणे सरदेसाई यांची तडकाफडकी बदली केली नसती. ही बातमी सर्वच माध्यमांवर झळकली. त्यात अनेकांनी “तडकाफडकी बदली” अशी ब्रेकिंग केली, तर एकीकडे “महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून डिचोली पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली” अशी बातमी करण्यात आली.
“महिलांची सतावणूक” म्हणताच लैंगिक सतावणुकीच्या शक्यतेची पाल चुकचुकते, ह्यात काहीच चूक नाही. पण मुळात या तक्रारीत तसे काहीच नसून ही केवळ तोंडी, सेवेशी निगडीत तक्रार होती, असे कळते.
विजय राणे सरदेसाई यांच्यासाठी मात्र त्यांची बदली ही मोठी नामुष्कीची ठरली आहे. जगाला सोडूनच द्या, पण स्वतःच्या कुटुंबाला तरी काय सांगणार, अशा पेचात ते सापडले आहेत. आपले राजकीय नेते जेव्हा हलक्या कानाचे बनतात, तेव्हा हलक्या गोष्टीही किती धोकादायक ठरू शकतात, त्याचे हे एक उत्तम उदाहरणच म्हणावे लागेल.




