कार्लूसबाब हे काय केलंत ?

आमदार कार्लूस फेरेरा यांचा भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलेला अपमान अनेकांना रूचलेला नाही. परंतु कार्लूस यांनी स्वतःच हा अपमान ओढवून घेतल्यामुळे त्याचा दोष त्यांनाच जातो, हे दुर्दैवाने खरे आहे.

‘माझे घर’ योजनेचा धडाका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लावला आहे. केवळ योजनेचे अर्ज वाटप करण्यासाठी लोकांची गर्दी खेचून आणून ज्या प्रकारे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, ते पाहता सनद वाटपावेळी काय झुंबड उडणार, याबाबत न बोललेलेच बरे.
हळदोणा मतदारसंघातील नास्नोळा पंचायत क्षेत्रात ‘माझे घर’ योजनेच्या कार्यक्रमात विरोधी काँग्रेसचे आमदार अ‍ॅड. कार्लूस फेरेरा उपस्थित होते. या कायद्यांमध्ये त्यांनी विधानसभेत दुरुस्ती आणि बदल सुचवले होते, मात्र सरकारने ते विचारात घेतले नाहीत. अलिकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार होता. त्यावेळी पत्रकार परिषदेतून कार्लूस फेरेरा यांनी या योजनेवर सडकून टीका केली होती. तरीही सरकारी कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी मोठा धोका पत्करला.
वास्तविक, त्यांच्या उपस्थितीची योग्य दखल सरकार, किंबहुना मुख्यमंत्री डॉ. सावंत घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी भर लोकांसमोर अ‍ॅड. कार्लूस फेरेरा यांची धिंड काढून त्यांना अपमानित केले.
एरवी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे फार संयमाने वागतात. ‘माझे घर’ योजनेची हवा त्यांच्या डोक्यात बरीच गेल्याचे त्यांच्या भाषणातून आणि आमदार कार्लूस यांना केलेल्या अपमानातून स्पष्ट झाले. या भाषणाची क्लिप बरीच व्हायरल झाली आहे. कदाचित ही क्लिप पाहून मुख्यमंत्र्यांनाही “हे करायला नको होते” असे वाटले असणे स्वाभाविक आहे.
आमदार कार्लूस यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपला अपमान करून घेतलाच, पण काँग्रेस पक्षाची लक्तरे वेशीवर टांगली. यापूर्वी कुडचडे येथे आमदार निलेश काब्राल यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात जाऊन त्यांच्या कामाचे कौतुक करण्याचा प्रकारही त्यांच्या कडून घडला होता. तो मतदारसंघ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा असल्याने त्यांनी यासंबंधी श्रेष्ठींकडे रीतसर तक्रारही दाखल केली होती.
आमदार कार्लूस फेरेरा यांचे हे वागणे पक्षासाठी अडचणीचे ठरत आहेच, पण त्यांच्या एकूणच राजकीय भूमिकेला मारक ठरत असल्याचे मत अनेकांचे बनले आहे. आपली गैरहजेरी भाजपच्या पथ्यावर पडेल आणि आपल्याविरोधात वातावरण तयार होईल, या भीतीने ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले. पण ते ज्येष्ठ वकील असल्याने आणि या कायद्यातील त्रुटी त्यांना माहिती असल्याने त्यांनी त्या जनतेसमोर मांडून, “हा कायदा खरोखरच अंमलात येईल का?” याबाबत आपली शंका सार्वजनिक करण्याचे धाडस दाखवायला हवे होते.
कायद्याच्या कसोटीवर हा कायदा खरा ठरला, तर निश्चितच सरकारचे कौतुकच करावे लागेल, असे म्हणून त्यांनी सरकारलाही चुचकारता आले असते. त्यांच्या एकूणच या कार्यक्रमातील वागणूक आणि हावभाव हे ‘बिनबुलाये मेहमान’ यासारखेच वाटत होते. त्यामुळे हळदोणा मतदारसंघातील त्यांचे कित्येक कार्यकर्ते आणि हितचिंतक नाराज झाल्याचे पाहायला मिळाले.
कायम विरोधी बाकांवर बसूनही सातत्याने निवडून येण्याचा मान अनेकांना मिळाला आहे. जनतेशी प्रामाणिक असणारा नेता सरकारच्या अशा कृत्यांना अजिबात घाबरत नाही. आमदार कार्लूस फेरेरा हे पहिल्यांदाच आमदार बनले आहेत. ते विरोधात आहेत आणि विरोधी आमदार या नात्यानेही चांगले काम करत आहेत. परंतु सरकारच्या अशा राजकीय डावपेचांना बळी पडून त्यांनी आपल्या प्रामाणिकपणालाच छेद दिला, तर मात्र हे त्यांच्यासाठी योग्य ठरणार नाही.
आमदार कार्लूस फेरेरा यांचा भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलेला अपमान अनेकांना रूचलेला नाही. परंतु कार्लूस यांनी स्वतःच हा अपमान ओढवून घेतल्यामुळे त्याचा दोष त्यांनाच जातो, हे दुर्दैवाने खरे आहे.

  • Related Posts

    अरे हे चाललंय काय?

    इतका गंभीर आरोप करूनही सरकार ढीम्मपणे गप्प कसे काय, असा सवाल गोंयकारांना पडला आहे आणि “अरे हे चाललंय तरी काय?” असे विचारण्याची वेळ आली आहे. राज्यातील बहुचर्चित कॅश फॉर जॉब…

    गोंयकारांनीच पुढाकार घ्यावा

    गोंयकारांनीच आपली यंत्रणा सज्ज ठेवून या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवावे लागेल. सरकारवर अवलंबून राहिल्यास गोंयकारांचा कार्यभाग बुडण्याचीच अधिक शक्यता आहे. गोव्यात कायदा सुव्यवस्था, सामाजिक, आरोग्य, पर्यावरण, व्यवसाय आदी सर्वच स्तरांवर…

    You Missed

    जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नको

    जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नको

    अरे हे चाललंय काय?

    अरे हे चाललंय काय?

    08/11/2025 e-paper

    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !

    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !

    गोंयकारांनीच पुढाकार घ्यावा

    गोंयकारांनीच पुढाकार घ्यावा

    07/11/2025 e-paper

    error: Content is protected !!