द्वेष नव्हे, माणुसकीचा वारसा जपू या

आमचें गोंय या फेसबुक पेजवरील श्री स्वामी समर्थांविषयीच्या कथित आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी हणजूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कायद्याचे काम कायदा करेल. दोषी कोण आहे, हेतू काय होता, याचा तपास होईल. परंतु या घटनेपलीकडे जाऊन समाज म्हणून आपण स्वतःला एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. आपण खरोखरच आपल्या संतांचे अनुयायी आहोत की त्यांच्या नावाने एकमेकांवर द्वेषाचा वर्षाव करणारे अनुयायी ?

इतिहास साक्ष देतो की कोणत्याही धर्मातील संत, महात्मे, योगी किंवा देवत्व प्राप्त विभूतींनी आपल्या आयुष्यात अपमान, बहिष्कार, छळ आणि संकटे सहन केली. तरीही त्यांनी सूडाचा मार्ग स्वीकारला नाही. त्यांनी प्रेम दिले, क्षमा दिली, करुणा दिली. श्री स्वामी समर्थ असोत, संत तुकाराम असोत, ज्ञानेश्वर माऊली असोत, बुद्ध असोत किंवा येशू ख्रिस्त सर्वांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याची शिकवण दिली. द्वेषाला प्रेमाने उत्तर देण्याची ताकद दिली.

आज मात्र चित्र अगदी उलटे दिसते. सोशल मीडियाने प्रत्येकाला अभिव्यक्तीचे व्यासपीठ दिले, पण त्याचबरोबर संयम हरवला. श्रद्धा ही मनाची गोष्ट असते. ती जितकी वैयक्तिक, तितकीच पवित्र असते. परंतु अलिकडच्या काळात श्रद्धेचे सार्वजनिक प्रदर्शन, धार्मिक स्पर्धा आणि भक्तीचा आक्रस्ताळा उत्सव हे जणू नवीन सामाजिक फॅड बनले आहे. आपल्या श्रद्धेचे मोठेपण सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याच्या श्रद्धेचा अपमान करण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. ही केवळ दुर्दैवीच नाही, तर समाजासाठी धोकादायक आहे.

गोव्यात यापूर्वी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयीही अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह वक्तव्ये झाली होती. लाखो भाविकांच्या भावना त्यातून दुखावल्या गेल्या. आज श्री स्वामी समर्थांविषयी अशाच प्रकारच्या कथित टिप्पणी समोर येत आहेत. उद्या कदाचित दुसऱ्या धर्मातील एखाद्या महनीय व्यक्तीबाबत असेच होईल. हे दुष्टचक्र थांबणार कधी?

विडंबन असे की, ज्या संतांनी आपल्या षड्रिपूंवर विजय मिळवण्याची शिकवण दिली, त्यांच्या भक्तांच्या वर्तनातच आज क्रोध, मत्सर, अहंकार आणि द्वेष अधिक दिसून येतो. आपण संतांच्या शिकवणीचे अनुकरण करतो की केवळ त्यांच्या नावाचा वापर करून स्वतःच्या भावना भडकवतो, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.

समाजाला आज नव्या देवळांची नव्हे, नव्या माणुसकीची गरज आहे. श्रद्धेच्या नावाने बाजार मांडण्याऐवजी संतांच्या विचारांचा वारसा जगण्यात उतरवण्याची गरज आहे. कायदा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करेलच; पण समाजानेही आपल्या शब्दांवर, प्रतिक्रियांवर आणि सोशल मीडियावरील वर्तनावर संयम ठेवला पाहिजे. कारण धार्मिक भावना जपण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दुसऱ्याच्या श्रद्धेचाही तितक्याच आदराने स्वीकार करणे.

संतांनी कधीही माणसांना धर्माच्या कुंपणात विभागले नाही; त्यांनी माणसांना माणसाशी जोडले. म्हणूनच आज पुन्हा एकदा त्या अमर प्रार्थनेची आठवण करून द्यावीशी वाटते.

“हीच आमुची प्रार्थना, अन् हेच आमुचे मागणे…
माणसाने माणसाशी, माणसासम वागणे.”

  • Related Posts

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    मात्र खरी कसोटी आता समाजाचीच आहे. राजकीय आरक्षण हे समाजाला सत्तेच्या वाटचालीत सहभागी करून घेणारे वरदान ठरावे की वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षा, गटबाजी आणि मतभेदांमुळे शाप ठरावे, हे समाजधुरिणांनी ठरवायचे आहे.…

    रोजगार: आभास आणि वास्तव

    विधानसभेत सरकारने दिलेल्या माहितीनुसार मागील पाच वर्षांत मंडळाअंतर्गत प्रत्यक्ष उभारलेल्या उद्योगांमध्ये केवळ १,५११ गोमंतकीयांना रोजगार मिळाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरणाने वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका औषधनिर्मिती…

    You Missed

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    14/08/2026 e-paper

    14/08/2026 e-paper

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure