“गांवकारी ” या स्वतंत्र पत्रकारितेच्या प्रयोगाला आपली भक्कम साथ मिळाली तर लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल हे निश्चित. आपण खरोखरच यासाठी आम्हाला साथ देणार आहात का ?
गेली १८ वर्षे मुख्य प्रवाहातील माध्यमांत नोकरी केल्यानंतर काही कारणांत्सव नोकरीचा राजीनामा देऊन स्वतंत्र मीडियात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. अर्थात राष्ट्रीय पातळीवरील अनेक नामंकित आणि प्रतिष्ठीत पत्रकारांनी सुरू केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची प्रेरणा त्यामागे होतीच. गोव्यात पब्लीक फंडिगच्या धर्तीवर स्वतंत्र मीडियाचा तसा प्रयत्न कुणी केलेला आठवत नाही. या गोष्टीला धाडस वगैरे अजिबात म्हणणार नाही. कदाचित अनेकांसाठी तो मुर्खपणाच ठरेल. मी कुणीतरी वेगळा आहे किंवा काहीतरी प्रचंड धाडस किंवा पराक्रम करत असल्याचीही भावना अजिबात नाही. पण तरिही हे किमान करून पाहावे किंवा प्रयोग करावा या विचारांतूनच हे पाऊल टाकले.
व्यवहारिकता आणि भावनातिकता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नोकरी ही महत्वाची असते जिथे महिन्याच्या पगाराची हमी असते. आपल्या रोजच्या कौटुंबिक तथा उपजिविकेच्या गरजांचा विचार करता हे अपरिहार्य आहे. शेवटी नोकरी म्हटल्यावर कुणीतरी आपला बॉस आणि मालक हा असतोच. पत्रकार हा जनतेसाठी स्वतंत्र असला तरीही तो एका कंपनीचा नोकरदार असतो हे वास्तव दुर्लक्षीता येणार नाही. पत्रकारितेतून भारावून जाऊन आणि सामाजिक परिवर्तन घडविण्याच्या इर्षेने पत्रकारितेत प्रवेश केला खरा परंतु कालांतराने स्वमर्यादा आणि कामाची चौकट याचे भान प्रत्येकाला येतच असते. तरिही त्यातून वाट काढून जास्तीत जास्त आपली नैतिकता सांभाळून आणि पत्रकारितेची नितीमुल्ये जपून काम करण्याचा प्रयत्न प्रत्येक पत्रकार करत असतो. काही पत्रकार याला अपवाद आहेत आणि ते आमिषांना बळी पडून त्यांनी पत्रकारितेची नितीमुल्ये खुंटीला टांगून ठेवली आहेत ही गोष्ट नाकारण्याचा मुर्खपणा मी अजिबात करणार नाही.
कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आर्थिक गरजेच्या चक्रव्युहात अडकलेलो असतानाही परिस्थितीने हा निर्णय घेण्यास भाग पाडले. दुसरी एखादी नोकरी पकडून निश्चितपणे पुढे जाणे शक्य होते तरिही हा एक प्रयत्न करण्यात काय गैर आहे,असा विचार करूनच हे पाऊल टाकले. विचार साधा होता की समाज अशा स्वतंत्र, निर्भिड, निपःक्ष पत्रकारितेला पाठींबा देणार का किंवा अशा पत्रकाराच्या मागे उभा राहणार का, याचा अंदाज घेण्याचाही हा एक छोटासा प्रयत्न आहे. सोशल मीडियावर आपले हजारो फॉलोअर्स आहेत. अनेकजणांकडून कामाचे कौतुक होते, शाबासकी मिळते आणि टीकाकार तर असणारच. पण खरेच एखाद्याने समाजाचे कौतुक आणि शाबासकीच्या बळावर धाडसी निर्णय किंवा रिस्क घेणे योग्य ठरणार काय, हे या प्रयोगातून पाहायचे आहे.
राज्यात ११.५० लाख मतदार आहेत, जे राज्याचे भवितव्य ठरवतात. त्यात ज्येष्ठ नागरिक, युवा मतदार, अशिक्षित, गरीब, भाषा मर्यादा आदी सर्व घटक बाजूला सारून केवळ १ लाख मतदार हे आपल्या कामाची दखल घेणारे असावेत, या उद्देशाने आखणी करण्याचे ठरवले. हे एक लाख मतदार वेगवेगळ्या माध्यमांचे फॉलोअर्स असतील आणि त्यामुळे त्यातील किमान २५ हजार लोकांपर्यंत तरी आपण पोहचू शकलो आणि त्यांना आपल्या कामाची कदर आहे,असा जरी विचार केला तरीही आपला प्रयोग हा यशस्वी होऊ शकतो हे देखील पाहीले. अगदीच काटकसर करून किमान ५ हजार मतदार, ज्यांना सामाजिक जाणीव, जबाबदारीचे भान आहे आणि गोव्याच्या भवितव्याची चिंता आहे ते तरी आपल्या मागे असायलाच हवे,असाही विचार केला. ११.५० लाख मतदारांतून ५ हजार मतदार देखील पत्रकार म्हणून आपल्या कामाला किंमत देत नसतील तर आपली लायकीच ती काय,असाही विचार मनात आला.
वर्तमानपत्रे खरेदी करणारा माणूस किमान महिन्याला २५० ते ३०० रूपये खर्च करत असतो. ती व्यक्ती आपल्यासाठी किमान महिना शंभर रूपये खर्च करू शकणार नाही काय,असा विचार आला. गांवकारीच्या पत्रकारितेला या ५ हजार लोकांनी जरी महिन्याला किमान फक्त शंभर रूपये मदत करण्याचे ठरवले तरीही महिना ५ लाख रूपये तयार होतात. मग या ५ लाख रूपयांतून अत्यावश्यक मनुष्यबळ, साधनसुविधा, प्रवास खर्च आणि आपल्या कामाची मिळकत या सगळ्या गोष्टींची सांगड घालणे शक्य आहे. खरे म्हटले तर असा हा प्रयोग यशस्वी होत असेल तर अनेक चांगले पत्रकार स्वतंत्र पत्रकारितेचा हा मार्ग चोखाळण्यास निश्चितच तयार असतील. किमान मिळकतीची हमी मिळाल्यास आणि अन्यत्र काम करताना मिळणारा पगार अशा माध्यमांतून प्राप्त होत असल्यास दबाव, व्यवसायिक बंधने आणि त्यातून पत्रकारितेवरील बंधने झुगारून सडेतोड, निःपक्ष, हीतवादी आणि शोध पत्रकारिता करणे शक्य आहे हा विश्वास निश्चितपणे तयार होऊ शकतो. आपल्याकडून खरोखरच तसा प्रामाणिक प्रयत्न झाला आणि लोकांच्या विश्वासाला जर आपण पात्र ठरलो तर हा ५ हजारांचा आकडा आणखीनही वाढू शकतो.
गांवकारी हा डिजीटल पेपर आणि युट्यूब, फेसबुक प्लॅटफॉर्म तयार करून आता ५ महिने झाले. अनेक हीतचिंतक, मित्र, वाचक, प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आणि देत आहेत आणि त्यातून इथपर्यंत मजल मारली आहे. आता लोकांच्या अपेक्षा वाढत आहेत, पण त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ, साधने, प्रवास, डाटा संकलन, तज्ज्ञांची मदत आदी अनेक गोष्टींची गरज लागणार आहे. अगदी पेडणे ते काणकोणपर्यंत गोवा व्यापून इथल्या प्रत्येक तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी, घटना आणि राज्यासमोरील विविध महत्वाच्या विषयांचे अभ्यासात्मक विश्लेषण करण्यासाठी या गोष्टींची गरज लागणार आहे. फुकट हे काहीही मिळत नसते आणि त्याची अपेक्षाही करणे चुकीचे आहे. प्रत्येकाला त्याच्या कामाचा आणि त्याच्या कष्टांचा मोबदला योग्य पद्धतीने मिळाला तर निश्चितच आपण चांगला परिणाम साधू शकतो.
गांवकारीने त्यासाठी दोन पर्याय उपलब्ध केले आहेत. आपण आपली मदत Patreon at patreon.com/GAONKAARI यावर पाठवू शकता किंवा अगदी सोप्या पद्धतीने आपण Google Pay at 8806799588 या नंबरवर पाठवू शकता. एक गोष्ट खरी आहे ती म्हणजे जोपर्यंत आपण मागत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट आपोआप मिळत नाही. मागणे किंवा हात पुढे करणे ही खूप कठीण आणि आपल्या स्वाभीमानाला डीवचणारी गोष्ट आहे पण ती अपरिहार्य असल्यामुळे त्यापासून अलिप्त राहता येत नाही म्हणूनच हे करावे लागत आहे.
आपण या आवाहनाला कसा प्रतिसाद देता आणि त्यातून आम्ही कुठपर्यंत ही मजल मारू शकतो हे काळच ठरवणार आहे. या काळाच्या प्रवासात बरेच काही शिकायला मिळणार आहे. आम्हाला आमचे भवितव्य तर यातून कळणार आहेच, पण पत्रकारिता आणि गोव्याचे भवितव्याचा निकालही यातूनच लागणार आहे.
किशोर नाईक गांवकर
संपादक