गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी)
तब्बल १६ वर्षांच्या कालावधीनंतर होणाऱ्या जनगणना २०२७ च्या प्रक्रियेला गोव्यात १६ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. पहिल्या टप्प्यात १६ ते ३० नोव्हेंबरदरम्यान नागरिकांना ऑनलाइन स्व-नोंदणी करता येणार असून, १ डिसेंबर २०२६ ते ४ जानेवारी २०२७ या कालावधीत घरोघरी सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानंतर ५ ते ९ जानेवारीदरम्यान माहितीची पडताळणी होईल, अशी माहिती जनगणना संचालनालयाच्या संचालक चेष्टा यादव (आयएएस) यांनी दिली.
या प्रक्रियेसाठी राज्यात ३,२७२ प्रगणक आणि ५४५ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जनगणनेच्या पुढील टप्प्यात एप्रिल २०२७ मध्ये लोकसंख्येची प्रत्यक्ष गणना होणार असून, त्यानंतर अद्ययावत आकडेवारी उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
देशात अखेरची जनगणना २०११ मध्ये झाली होती. त्यानंतर गोव्यात नागरीकरण, स्थलांतर, बांधकाम व्यवसाय आणि लोकवस्तीच्या स्वरूपात मोठे बदल झाले आहेत. मात्र, अद्ययावत आकडेवारीअभावी विकास नियोजनासाठी जुन्याच माहितीवर अवलंबून राहावे लागत आहे.
या जनगणनेमुळे राज्यातील लोकसंख्या, घरांची संख्या आणि कुटुंबांची अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे. पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, वाहतूक आणि अन्य पायाभूत सुविधांच्या नियोजनासाठी ही आकडेवारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेषतः गोव्यातील वाढते स्थलांतर आणि बदलत्या लोकसंख्येचे वास्तव समोर येण्याच्या दृष्टीने या जनगणनेकडे विशेष लक्ष लागले आहे.







