मायकलबाब, जरा सबुरीने घ्या !

आपण कुणालाच जुमानत नाही ही वृत्ती सोडून त्यांनी सबुरीने घेतले तर त्यांच्यासाठी भल्याचे ठरेल.

आपल्याच मतदारसंघातील एका प्रकल्पाच्या ठिकाणी धडक देऊन, त्या प्रकल्पाचे काम बेकायदा पद्धतीने सुरू असल्याचा आरोप कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी अलिकडेच केला. सरकारातील आमदार असूनही, आपल्याच सरकारचा बेकायदा कृत्यांना पाठींबा असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगण्याचा त्यांचा हेतू होता. लोकांचा आवाज म्हणून मायकल लोबो यांच्याकडे पाहिले जाते. टॅक्सीच्या विषयावर तर ते उघडपणे आपल्याच सरकारला जुमानत नाहीत. मनोहर पर्रीकरांच्या काळातही मायकल लोबो असेच बोलत होते आणि आता डॉ. प्रमोद सावंत यांच्यासाठीही ते अडचणीचे ठरू लागले आहेत.
मायकल आणि डिलायला लोबो हे दांपत्य भाजपसाठी अडचणीचे ठरू लागले आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांची भेट घडवून आणून त्यांना शांत करण्याचे प्रयत्न झाले खरे परंतु मंत्रीपद न मिळाल्यामुळे लोबो दांपत्य बरेच नाराज आहे. आपल्याच सरकारविरोधात जी विधाने ते करू लागले आहेत, ती खरोखरच नाराजीचा सूर आहे की नव्या राजकीय रणनितीचा भाग, हे काही समजायला वाव नाही.
हणजूण येथे किनाऱ्यालगत मायकल लोबो यांचे पुत्र डेनियल लोबो यांच्या खाजगी जमिनीत संरक्षण भिंतीच्या कामावरून बराच गदारोळ सुरू आहे. सीआरझेड कायद्याची पायमल्ली करून हे बांधकाम सुरू आहे, हे खरे; परंतु या बांधकामाचे कंत्राट जलस्त्रोत खात्याने दिले आहे. मायकल लोबो यांचे म्हणणे आहे की त्यांनी स्वतः हा खर्च खात्याकडे जमा केला आहे. सीआरझेड कायद्याच्या अटींचे पालन करून सरकारी खातेच योग्य पद्धतीने ही संरक्षण भिंत उभारू शकते, म्हणूनच हे काम जलस्त्रोत खात्याकडून केले जात असल्याचा युक्तिवाद लोबो दांपत्याने केला आहे. आपली खाजगी जमीन सुरक्षित राहावी म्हणून ही संरक्षण भिंत उभारली तर त्यात काय चूक, असे त्यांचे म्हणणे आहे.
आरजीपीच्या नेत्यांवर, विशेषतः मनोज परब यांच्यावर ते भडकलेच. परब हे वैयक्तिकरित्या लक्ष्य बनवत असल्याचा आरोप त्यांनी केला. दिल्लीवाल्यांची बेकायदा बांधकामे पाडायला यांना जमत नाही, हे फक्त गोंयकारांनाच त्रास देतात, असेही ते म्हणाले. आता सरकारातील एक आमदार आणि माजी मंत्री असलेले मायकल लोबो हे स्वतःच दिल्लीवाल्यांच्या बेकायदा बांधकामांची हमी देतात, यावरून भाजप सरकारकडून दिल्लीवाल्यांना मिळणारे उघड अभय ते स्वतःच उघड करतात.
मुळात भाजपचा त्याग करून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर मायकल लोबो यांनी काही प्रमाणात आपली ताकद दाखवली खरी, परंतु सरकार भाजपचेच राहिले. निवडणुकीत भाजपला बराच त्रास दिलेल्या मायकल लोबो यांची सुपारीच नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांना देण्यात आली आणि त्यांनी मायकल लोबो यांची पाठच धरली. हा सगळा कट निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचा होता, अशी चर्चा सुरू होती. विश्वजीत राणे यांनी मायकल लोबो यांच्या सर्व जमीन व्यवहारांचा पोलखोल करून त्यांना सळो की पळो करून सोडले आणि शेवटी मायकल लोबो यांना विरोधी पक्षनेतेपदासह भाजपात आश्रय घ्यावा लागला.
आता आश्रयदाते बनून राहणे हे मायकल लोबो यांच्या स्वभावात बसत नाही. ‘लोकनेता’ आणि ‘लोकांचा आवाज’ हे बिरुद टिकवून ठेवण्यासाठी त्यांना अधूनमधून आपल्याच सरकारला दुषणे देण्याची सवय लागली आहे. आता तर ते स्वतंत्र पक्ष स्थापन करून वेगळ्याच राजकारणाची चाल खेळत असल्याची चर्चा विरोधकांत सुरू आहे.
हणजूणच्या या प्रकाराबाबत आरजीपी वगळता अन्य कुणीही विरोधकांनी ब्र देखील काढलेला नाही. शेवटी स्थानिक पंचायतीकडून हे काम बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आल्याने, ही लोबो दांपत्यासाठी मोठी अडचण ठरली आहे. मायकल लोबो यांना भाजपमध्ये पुन्हा प्रतिष्ठेचे पद प्राप्त होईल याची शक्यता कमीच आहे अशावेळी ते आपले स्वतंत्र अस्तीत्व कसे राखून राहतील हे महत्वाचे आहे. आपण कुणालाच जुमानत नाही ही वृत्ती सोडून त्यांनी सबुरीने घेतले तर त्यांच्यासाठी भल्याचे ठरेल.

  • Related Posts

    अरे हे चाललंय काय?

    इतका गंभीर आरोप करूनही सरकार ढीम्मपणे गप्प कसे काय, असा सवाल गोंयकारांना पडला आहे आणि “अरे हे चाललंय तरी काय?” असे विचारण्याची वेळ आली आहे. राज्यातील बहुचर्चित कॅश फॉर जॉब…

    गोंयकारांनीच पुढाकार घ्यावा

    गोंयकारांनीच आपली यंत्रणा सज्ज ठेवून या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवावे लागेल. सरकारवर अवलंबून राहिल्यास गोंयकारांचा कार्यभाग बुडण्याचीच अधिक शक्यता आहे. गोव्यात कायदा सुव्यवस्था, सामाजिक, आरोग्य, पर्यावरण, व्यवसाय आदी सर्वच स्तरांवर…

    You Missed

    जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नको

    जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नको

    अरे हे चाललंय काय?

    अरे हे चाललंय काय?

    08/11/2025 e-paper

    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !

    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !

    गोंयकारांनीच पुढाकार घ्यावा

    गोंयकारांनीच पुढाकार घ्यावा

    07/11/2025 e-paper

    error: Content is protected !!