माते ! हा अंगार प्रज्वलित ठेव !

केवळ देवदर्शनाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून किंवा हातात गंडे बांधून या भूमीप्रतीची प्रामाणिकता सिद्ध होणार नाही. गोंयकारांनी आपल्या अस्तित्वाचा अंगार कायम प्रज्वलित ठेवावा लागेल. तो शमला तर आपण संपलो, हे लक्षात ठेवा!

आज शिरगांवच्या श्री देवी लईराईच्या जत्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक तसेच इतर ठिकाणचे देवीचे भक्तगण या जत्रोत्सवाला भेट देऊन देवीचा कौल घेतात.
जत्रोत्सवपूर्व व्रतस्थ धोंड अग्निदिव्यातून संचार करत जणू आपल्या भक्तीची आणि पवित्रतेची कसोटी लावतात. हा जत्रोत्सव इतर अनेक जत्रोत्सवांपेक्षा वेगळा आहे. या मातीशी आणि परंपरेशी घट्ट नाते अधोरेखित करणारा हा उत्सव विशेषतः शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी—गरीब, सामान्य बहुजन समाजाचा आहे.
श्री लईराई देवीच्या आस्थेने, भक्तीने आणि ओढीने हा भक्त स्वतःला इतका वाहून घेतो की हे काही दिवस तो स्वतःलाच विसरून जातो. एक अनोखी ताकद या भक्तांमध्ये संचारते, ज्यामुळे कित्येक अशक्य गोष्टीही सहज शक्य होतात.
सकाळ ते संध्याकाळ दारूत बुडालेल्या कित्येकजण, या व्रतस्थ काळात दारूच्या थेंबालाही हात लावत नाहीत. ताटात माशांची कढी नसेल तर घास गळ्याखाली न उतरवणारे व्रतस्थही या काळात शाकाहार स्वीकारतात.
आईच्या ओढीने अग्निदिव्य पार करण्याची जी आत्मशक्ती भक्तांमध्ये संचारते, ती अवर्णनीय आहे. श्री देवी लईराईचे लाखो भक्त तिच्यासमोर लीन होतात.
चारही बाजूंनी खनन व्यवसायाने वेढलेला शिरगांव गाव. पोर्तुगीज काळापासूनच खनिज संपत्तीचा शोध लागल्यामुळे निसर्गसौंदर्याचे विद्रूपीकरण झाले आहे.
श्री देवी लईराईच्या या भूमीत खनिज संपत्तीचा साठा आहे, हेच तिचे वैभव! देशाच्या विकासासाठी खनिज महत्वाचे असले तरी त्याच्या उत्खननाला मर्यादा हवी आहे.
श्री लईराई मंदिरासोबतच गावातील काही घरे आणि धार्मिक स्थळे ही खाण लीज क्षेत्रात आहेत.
राजकारणी ती बाहेर काढण्याचे आश्वासन देतात, मात्र प्रत्यक्षात ते शक्य नसल्याचेही सांगतात. राजकारण हे पाच वर्षांचे असते, पुढे कोण कुठे असेल हे सांगता येणार नाही.
पण शिरगांवच्या मंदिरासह घरे आणि धार्मिक स्थळे लीज क्षेत्रातून बाहेर काढली नाहीत, तर भविष्यात हा विषय अधांतरीच राहणार आणि स्थानिकांच्या डोक्यावर कायम संकट राहणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे नेहमी अंत्योदय तत्त्वाचा उल्लेख करतात. तोच अंत्योदय घटक श्री देवी लईराईचा परमभक्त आहे.
आज या भक्तांना कुळ, मुंडकार, आल्वारा, बेरोजगारी, महागाई, आरोग्य, सामाजिक प्रश्न, व्यसनाधीनता अशा असंख्य संकटांना सामोरे जावे लागत आहे.
समाजाचा स्वाभिमान हा राजकीय व्यवस्थेची अडचण ठरू लागला आहे. त्यामुळे लाचारीच्या जाळ्यात अडकवून समाजाला कायम गुलामगिरीत ठेवण्याचा डाव सत्ताधारी घटक आखत आहेत.
गोव्याच्या जमिनींवर परप्रांतीयांचा डोळा आहे. विकासाच्या नावाने पंचतारांकित जुगार अड्ड्यांचा विस्तार सुरू आहे.
हे भयाण चित्र पाहून भविष्यात संस्कृती, परंपरा, वारसा कसा जपणार, याचा कुणी विचार केला आहे का?
केवळ देवदर्शनाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून किंवा हातात गंडे बांधून या भूमीप्रतीची प्रामाणिकता सिद्ध होणार नाही.
गोंयकारांनी आपल्या अस्तित्वाचा अंगार कायम प्रज्वलित ठेवावा लागेल. तो शमला, तर आपण संपलो, हे लक्षात ठेवा!

  • Related Posts

    अरे हे चाललंय काय?

    इतका गंभीर आरोप करूनही सरकार ढीम्मपणे गप्प कसे काय, असा सवाल गोंयकारांना पडला आहे आणि “अरे हे चाललंय तरी काय?” असे विचारण्याची वेळ आली आहे. राज्यातील बहुचर्चित कॅश फॉर जॉब…

    गोंयकारांनीच पुढाकार घ्यावा

    गोंयकारांनीच आपली यंत्रणा सज्ज ठेवून या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवावे लागेल. सरकारवर अवलंबून राहिल्यास गोंयकारांचा कार्यभाग बुडण्याचीच अधिक शक्यता आहे. गोव्यात कायदा सुव्यवस्था, सामाजिक, आरोग्य, पर्यावरण, व्यवसाय आदी सर्वच स्तरांवर…

    You Missed

    जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नको

    जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नको

    अरे हे चाललंय काय?

    अरे हे चाललंय काय?

    08/11/2025 e-paper

    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !

    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !

    गोंयकारांनीच पुढाकार घ्यावा

    गोंयकारांनीच पुढाकार घ्यावा

    07/11/2025 e-paper

    error: Content is protected !!