गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) : आदिवासी कल्याणासाठी राखीव निधीचा कथित गैरवापर, प्रेरणा दिन सोहळ्यावरील कोट्यवधींचा खर्च, आदिवासींचे प्रलंबित वनहक्क आणि काणकोणच्या विकासाकडे झालेले दुर्लक्ष या मुद्द्यांवरून काँग्रेसने भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘गोंय राखण यात्रे’च्या २१व्या दिवशी काणकोणात आयोजित सभेत काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठवली. २०२७ मध्ये काँग्रेस सत्तेवर आल्यास काणकोणात डायलिसिस केंद्र उभारणे, पाणीटंचाई दूर करणे आणि आदिवासींचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्याची ग्वाही देण्यात आली.
कदंब परिवहन महामंडळाच्या बसस्थानकापासून सुरू झालेली यात्रा चार रस्ता आणि पाटणे मार्गे जुन्या काणकोण बसस्थानकावर पोहोचली. यात्रेत काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कार्याध्यक्ष आल्टोन डिकॉस्ता, सुनील कवठणकर, अमरनाथ पणजीकर, जनार्दन भंडारी, दया गावकर, चेतन देसाई यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रेरणा दिन सोहळ्यावरील खर्चाचा मुद्दा उपस्थित करत आदिवासी कल्याणाच्या नावाखाली सार्वजनिक निधीची उधळपट्टी झाल्याचा आरोप केला. आदिवासी समाजाच्या विकासासाठी खर्च होणे अपेक्षित असलेला निधी कार्यक्रमांवर खर्च केला जात असताना समाजाचे मूलभूत प्रश्न मात्र कायम असल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर या कथित गैरव्यवहाराची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
चोडणकर यांनी मंत्री दिगंबर कामत यांच्यावरही निशाणा साधला. कामत मुख्यमंत्री असताना बाळ्ळी आंदोलनात दोन आदिवासी तरुणांचा मृत्यू झाल्याची आठवण करून देत त्यांनी तत्कालीन सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. यापूर्वी खाण घोटाळ्याचे आरोप केलेल्या नेत्यांना भाजपने आता मंत्रिमंडळात स्थान कसे दिले, असा सवालही त्यांनी केला.
काणकोणातील पाणीटंचाई आणि अपुऱ्या मूलभूत सुविधांचा उल्लेख करत चोडणकर यांनी काँग्रेस सत्तेवर आल्यास या समस्यांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. ‘गोंय राखण यात्रे’ला मिळणारा प्रतिसाद हा २०२७ मधील सत्तापरिवर्तनाचा संकेत असल्याचा दावाही त्यांनी केला.
काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी भाजप सरकारवर भ्रष्टाचार आणि कुशासनाचे आरोप केले. गोव्यातील राजकीय परिस्थिती बदलत असून २०२७ मध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे सिद्ध होणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी काणकोणातील आरोग्यसेवेच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. काणकोणात डायलिसिस केंद्राची आवश्यकता असून काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर हे केंद्र सुरू करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. डायलिसिससाठी रुग्णांना अन्यत्र जावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रेरणा दिन सोहळ्याच्या खर्चावरून आलेमाव यांनी सरकारवर टीका केली. आदिवासी कल्याणाच्या नावाखाली निधी खर्च केला जात असताना अनेक आदिवासी कुटुंबांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार आल्टोन डिकॉस्ता यांनी काणकोणातील जमीन व्यवहारांचा मुद्दा उपस्थित केला. मतदारसंघातील सुमारे एक लाख चौरस मीटर जमीन बाहेरील व्यक्तींच्या ताब्यात देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. गोव्याची जमीन आणि अस्मिता सुरक्षित ठेवण्यासाठी जनतेने एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. काँग्रेसने एकजुटीने निवडणुका लढवल्यास विजय निश्चित असल्याचे सांगताना त्यांनी गावडोंगरी जिल्हा पंचायत निवडणुकीचा दाखला दिला.
ज्येष्ठ काँग्रेस नेते जनार्दन भंडारी यांनी स्थानिक आमदाराच्या कामकाजावर टीका केली. विविध कार्यक्रमांच्या आयोजनावर भर दिला जात असताना आरोग्य, वीज आणि अन्य मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. काणकोणात रुग्णालयाची इमारत असूनही आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. पाळोळे परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचाही त्यांनी उल्लेख केला.
काँग्रेसचे आदिवासी नेते दया गावकर यांनी वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न उपस्थित केला. पात्र आदिवासी कुटुंबांचे वनहक्क दावे प्रलंबित असून त्यांना न्याय मिळवून देण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. समुद्रकिनाऱ्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते आणि पारंपरिक मच्छीमार यांच्या समस्यांकडेही दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस नेते चेतन देसाई यांनी काणकोणातील शिक्षण, पायाभूत सुविधा आणि रोजगाराच्या संधी वाढविण्याची आवश्यकता व्यक्त केली. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सत्तापरिवर्तन गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरनाथ पणजीकर यांनी केले. गास्पर कुतिन्हो यांनी स्वागत केले, तर सिद्धार्थ गायक यांनी आभार मानले.
काणकोणच्या विकासाचा प्रश्न केंद्रस्थानी
गोंय राखण यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसने काणकोणातील आरोग्यसेवा, पाणीटंचाई, वीजपुरवठा, आदिवासींचे वनहक्क आणि जमीन संरक्षणाचे मुद्दे पुन्हा ऐरणीवर आणले आहेत. भाजप सरकारच्या विकासाच्या दाव्यांना आव्हान देत काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीत हेच मुद्दे जनतेसमोर मांडण्याचे संकेत दिले.





