जाईचा सुगंध, आमचा अभिमान…

“चला, एकजूट होऊ” ही हाक केवळ शब्दांत मर्यादित नाही, ती एक साक्ष आहे, एक प्रतिज्ञा आहे आपल्या मातीतून उगम पावलेल्या संस्कृतीच्या संरक्षणाची. म्हार्दोळमधील जाई फुलांच्या सुगंधातून केवळ आमच्या बागांनाच नव्हे, तर आमच्या अस्तित्वालाच एक ओळख मिळाली आहे आणि आता हीच ओळख काही स्वार्थी, जमिनी हडपणाऱ्या दलालांच्या गालबोटामुळे संकटात सापडली आहे.
म्हार्दोळ गावातील पारंपरिक जाई बागायतीचा वारसा आज मोठ्या संकटात आहे. आमच्याच भूमीत अनेक पिढ्यांपासून फुलवलेल्या या जाई फुलांच्या बागा केवळ शेती नाहीत त्या आमचा सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक आधार आहेत. आज काही भू-माफिया आणि दलाल गैरमार्गाने, फसवणूक करून किंवा दबाव टाकून या जमिनी हडपण्याचा प्रयत्न करत आहेत. या बेकायदेशीर हालचालीमुळे आमचे पर्यावरण, स्थानिक जैवविविधता आणि लोकजीवन धोक्यात आले आहे. अशा प्रकारे जमिनी बळकावून आमच्या पूर्वजांच्या कष्टांचा, वारशाचा आणि गावाच्या ओळखीचा विनाश केला जात आहे.
हे जाईचे मळे फक्त फुलबागा नाहीत हा आमचा वारसा आहे. पिढ्यानपिढ्या आमच्या नाईक फुलकार समाजाने या बागा जपल्या, वाढवल्या आणि त्यांच्याशी नातं जोडलं. प्रत्येक फुलाच्या सुगंधात त्या समाजाचा घाम मिसळलेला आहे, कष्टांची चव आहे आणि संस्कृतीचा श्वास आहे. ही बाग आमच्यासाठी फक्त शेती नाही ती एक परंपरा आहे, जी आम्ही पुढच्या पिढ्यांसाठी जतन करत आहोत.
आज मात्र ही संस्कृतीच धोक्यात आली आहे. भूमी माफियांनी आणि दलालांनी आमच्या जमिनीवर नजर ठेवली आहे. त्यांच्या डोळ्यांत सुगंध नाही, फक्त चकचकीत नोटा आहेत. त्यांच्यासाठी ही जाईची बाग म्हणजे ‘विकासासाठी उपलब्ध भूखंड’… पण आमच्यासाठी ती आईच्या कुशीतल्या परिमळासारखी आहे.
हे फक्त एक जमीन हडप प्रकरण नाही हे सांस्कृतिक नरसंहार आहे.
जाईच्या फुलांचा वास केवळ हवेत नाही, तो आपल्या ओळखीत आहे. जर ही बाग गेली, तर फक्त उत्पन्नाचं नुकसान होणार नाही, तर शतकानुशतक जपलेला वारसा, गावांची ओळख, लोककला, धार्मिक परंपरा आणि जैवविविधता यांचंही नुकसान होईल. ही बाग म्हणजे भूमिपुत्रांची ओळख आहे. ही ओळख हिरावून घेणं म्हणजे त्यांच्या इतिहासावर आणि भविष्यावर एक क्रूर आघात आहे.
हे आम्ही कदापि सहन करणार नाही. एकजूटच आपलं अस्त्र आहे, आणि आपली शक्तीही. आम्ही एकवटू, आवाज उठवू — आमच्या जमिनीसाठी, आमच्या जाईसाठी, आमच्या अस्तित्वासाठी. कायद्यानं, हक्कानं आणि जिद्दीनं झुंज देऊ. कारण हे केवळ शेतकऱ्यांचं आंदोलन नाही, तर एका संस्कृतीच्या अस्मितेचा लढा आहे.
हे लक्षात ठेवा “जाई हरवली, तर गाव हरवेल; गाव हरवलं, तर संस्कृतीच नष्ट होईल.” ज्यांच्यासाठी ही माती फक्त नफ्याचं साधन आहे, त्यांना आपल्याला भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि कायदेशीर अशा सर्व अंगांनी प्रत्युत्तर द्यावं लागेल.
आमची जाई, आमची ओळख, आमचं स्वाभिमान. आता वेळ आली आहे की आपण सगळे एकत्र येऊ गांवकरी, विद्यार्थी, महिला बचतगट, स्थानिक संस्था सगळ्यांनी पुढे यायला हवं. “स्वाभिमान जपायचा असेल, तर जमिनीला मातीसारखं नका समजू, तिला आईसारखं जपा.” आपण आपल्या जाईचा सुगंध बाजारात पोहोचवू शकतो, पण त्याचं मूळ ती माती इथेच आहे. ती गेली, तर सुगंधही हरवेल.
चला, एकजूट होऊ… जमिनी वाचवू, जाई जपू, दलालांना विरोध करू, आपला वारसा टिकवू, कारण ती फक्त फुलं नाहीत, हे आमचं अस्तित्व आहे!
– गौरेश तुळशीदास गावडे
आकार, म्हार्दोळ – फोंडा

  • Related Posts

    पैंगिणकरांच्या संघर्षाचा २ ऑक्टोबर

    २ ऑक्टोबर म्हटले की आपल्याला महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री आठवतात. पण मला या दिवशी आणखी एक नाव आठवते — राजाराम रंगाजी पैंगिणकर. आज त्यांची जयंती नाही किंवा पुण्यतिथीही नाही.…

    काश्मिरा खोतची स्वतंत्र संगीतविश्वात झेप

    पणशीकर घराण्याचा सांस्कृतिक वारसा नव्या सुरांत गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी) मराठी रंगभूमीवरील दिग्गज नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या घराण्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आता नव्या पिढीकडून वेगळ्या सुरांत पुढे जात आहे. प्रभाकर…

    You Missed

    03/10/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 3, 2026
    • 15 views
    03/10/2026 e-paper

    दारी कशाला, कार्यालयातच सेवा द्या !

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 3, 2026
    • 21 views
    दारी कशाला, कार्यालयातच सेवा द्या !

    सुर्लाची जखम पुन्हा भळभळणार…

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 3, 2026
    • 19 views
    सुर्लाची जखम पुन्हा भळभळणार…

    From Mining Scar to Forest — Surla Fears 4,000-Crore Dump Rush Could Reopen Old Wounds

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 3, 2026
    • 14 views
    From Mining Scar to Forest — Surla Fears 4,000-Crore Dump Rush Could Reopen Old Wounds

    Mangrove Trees Allegedly Felled at Undir-Bandora; Environment Forum Seeks FIR, Restoration

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 2, 2026
    • 17 views
    Mangrove Trees Allegedly Felled at Undir-Bandora; Environment Forum Seeks FIR, Restoration

    गोव्यात सत्ता परिवर्तनासाठी काँग्रेस हाच पर्याय : सचिन पायलट

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 2, 2026
    • 34 views
    गोव्यात सत्ता परिवर्तनासाठी काँग्रेस हाच पर्याय : सचिन पायलट