प्रभू व्हायोलेटा रहिवासी सोमवारी भेट देणार
गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी)
दाबोळी येथील प्रभू व्हायोलेटा रहिवासी संकुलातील लोकांना राज्य सरकारने जणू वाऱ्यावर सोडल्याची भावना निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे येथील शेकडो लोक अतिसाराने ग्रस्त झाले असून, शुद्ध पाण्याचा पुरवठा कुणीही हमीपूर्वक करत नसल्याने आता या लोकांना मानवाधिकार आयोगाचे दरवाजे ठोठावण्याची वेळ आली आहे.
दाबोळीतील चिखली ग्रामपंचायत क्षेत्रात प्रभू व्हायोलेटा रहिवासी संकुल आहे. अमित प्रभू या बिल्डरचा या भागात बराच दबदबा असून, त्याचे इतरही अनेक प्रकल्प येथे सुरू आहेत. बिल्डरकडून अजूनही सोसायटीची नोंदणी केली गेलेली नाही. सर्व व्यवस्थापन बिल्डरकडूनच केले जाते आणि त्यासाठी रहिवाशांकडून शुल्क आकारले जाते. संकुलाच्या बांधकामासाठी खोदलेल्या बोअरवेलमधून पिण्याचे पाणी पुरवले जात असल्याचे उघड झाल्याने लोकांच्या जीवाशी खेळ केल्याबद्दल बिल्डरवर तातडीने गुन्हा दाखल होणे आवश्यक होते. मात्र सरकारी यंत्रणा बिल्डरला काहीही विचारत नाही, फक्त नोटिसा पाठवून गप्प बसल्याची टीका रहिवाशांनी केली आहे.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काय?
या प्रकल्पाचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नादुरुस्त होता. हेच सांडपाणी बोअरवेलमध्ये मिसळले आणि त्याचा परिणाम म्हणून संकुलात अतिसाराची साथ पसरली. दोघांना टायफॉइडचीही लागण झाली आहे. इतकी भीषण परिस्थिती उद्भवली असताना कुणीही वरिष्ठ अधिकारी किंवा जिल्हाधिकारी येथे फिरकले नाहीत. यावरून सरकार बिल्डरच्या दबावाखाली असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
आता जनताच सरकारच्या दारी
‘सरकार तुमच्या दारी’ असे उपक्रम राबवून लोकसेवेचा बढाई मारणारे सरकार, गरजेच्या वेळी मात्र जनतेच्या दारी पोहोचत नाही. उलट आता लोकांनाच सरकारच्या दारी जावे लागत असल्याची टीका रहिवाशांनी केली आहे. सोमवारी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या विषयावर सखोल चर्चा केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बिल्डरकडून फक्त रात्री ८ वाजेपर्यंतच पाणीपुरवठा होईल असे सांगण्यात आले आहे. उर्वरित वेळेत पाणीपुरवठ्याची जबाबदारी कुणाची, असा सवालही रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्र्यांचे मौन
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना प्रभू व्हायोलेटा संकुलातील पीडित लोकांच्या समस्येबाबत विचारले असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले आणि ते निघून गेले. या लोकांच्या समस्येबाबत प्रतिक्रिया न देता मुख्यमंत्री गेले त्याअर्थी त्यांना याचे काहीच वाटत नाही, यासारखे दुसरे दुर्दैव नाही,अशी खंत या लोकांनी व्यक्त केली.






