भाजपविरोधी एकजुटीवर चर्चा प्रारंभ
गांवकारी,दि. १ (प्रतिनिधी)
आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या संभाव्य एकजुटीच्या दिशेने महत्त्वाची पाऊले पडू लागली आहेत. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांच्यात शनिवारी बैठक झाली.
बैठकीनंतर गिरीश चोडणकर यांनी सध्या भाजप सरकारच्या कारभारामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले. भाजपला सक्षम पर्याय उभा करण्यासाठी विरोधी पक्षांची युती अधिक मजबूत करण्याबाबतही सकारात्मक विचारविनिमय झाल्याचे त्यांनी सांगितले.
चोडणकर म्हणाले की, “शिस्त, परस्परांचा सन्मान आणि युतीचा धर्म पाळला, तरच विरोधी आघाडी यशस्वी होऊ शकते.” ही बैठक त्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, विजय सरदेसाई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये सांगितले की, काणकोण अधिवेशनात दिलेल्या आश्वासनानुसार त्यांनी गिरीश चोडणकर यांच्याशी चर्चा सुरू केली आहे. गोव्यात भाजप सरकारला पर्याय म्हणून लोककेंद्रित आणि एकसंघ आघाडी उभारण्याची प्रक्रिया या बैठकीत सुरू झाली असल्याचे त्यांनी म्हटले.
सरदेसाई यांनी ही बैठक सौहार्दपूर्ण, विधायक आणि भविष्यातील वाटचालीवर केंद्रित असल्याचे सांगत, हा विरोधी ऐक्याकडे जाणारा पहिला टप्पा असल्याचे नमूद केले. पुढील रोडमॅप पारदर्शकपणे जाहीर केला जाईल आणि प्रत्येक निर्णयाच्या केंद्रस्थानी गोव्याचे हित असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.





