सिंधुदुर्ग – रत्नागिरी भागातील सत्यकथा एका चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे. या चित्रपटातून आपण खूप काही आत्मसात करू शकतो आणि पर्यावरण व संस्कृतीच्या जतनासाठी ठोस पावले उचलण्याची प्रेरणा मिळते. सामाजिक संदेश देण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.
या चित्रपटाचे संदर्भ आपण थेट मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट (मोपा) किंवा पर्वरी येथील फ्लायओव्हरशी जोडू शकतो. मोपा प्रकल्पाच्या जागेत असलेल्या “देव बाराजण” या जागृत देवस्थानाची विटंबना झाली आहे, तर पर्वरीतील शेकडो वर्षे जुन्या श्री खाप्रेश्वर मंदिराजवळील पिंपळ वृक्षाची कत्तलही अनुभवली आहे. या सगळ्या चुकीच्या कृतींमुळे दैवी कोप होईल, अशी भावना गावकऱ्यांमध्ये आहे. अनेकदा चर्चांमध्ये मोपा एअरपोर्टच्या रनवेवर एखादी अदृश्य शक्ती कार्यरत असल्यासारखी अनुभूती व्यक्त केली जाते.
कोकणातील “दशावतार” ही पारंपरिक लोककला या भागातील सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहे. ही कला टिकवण्यासाठी शासनाने योग्य ती मदत करणे गरजेचे आहे. अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणे हे संस्कृतीच्या संवर्धनासाठी अत्यंत आवश्यक आहे.
विकासाच्या नावाखाली आपण पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी करत आहोत. जेव्हा मोठे प्रकल्प संमत केले जातात, तेव्हा पर्यावरणाचा विचार दुर्लक्षित केला जातो. उलट, त्या प्रकल्पांच्या आसपासची जमीन रिअल इस्टेट माफियांच्या ताब्यात जाताना दिसते, आणि काही राजकारणी त्यात हातभार लावताना दिसतात.
गोवा राज्याची जागतिक पर्यटन क्षेत्रात एक वेगळी ओळख आहे. पूर्वी २०–२५ वर्षांपूर्वी ९०% पर्यटक हे मुख्यतः इंग्लंड व युरोपमधून येणारे विदेशी पर्यटक असायचे. ते कळंगुट, बागा, कांदोळी या भागांमध्ये शांततेत सुट्टीचा आनंद लुटायचे. पण आज त्या भागांकडे हे पर्यटक ढुंकूनही पाहत नाहीत. यामागे वाढते पर्यटन आणि त्यातून होणारा निसर्गाचा ऱ्हास हे मुख्य कारण आहे.आज ९०% पर्यटक हे देशी आहेत. हे पर्यटक निसर्गाचा आनंद घेत असले तरी त्याचे जतन करण्याचे भान अनेकांना नसते. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, मद्यपान, गुटखा/तंबाखू सेवन, थुंकणे, मद्यधुंद अवस्थेत शौच करणे, प्लास्टिकचा वापर करून कचरा फेकणे हे प्रकार सर्रास दिसतात.
वाढत्या पर्यटनामुळे अनेक रिअल इस्टेट माफिया जमिनी विकत घेऊन अतिक्रमण करत आहेत. मोठमोठी हॉटेल्स उभारली जात आहेत, झाडांची तोड केली जात आहे, आणि पारंपरिक पायवाटा बंद केल्या जात आहेत. विशेषतः कळंगुट, बागा, हडफडे भागांमध्ये.
एक दिवस असा येईल की निसर्ग या सगळ्याचा बदला घेईल, हे निश्चित. पर्यावरण आणि वन्य जीवांचे रक्षण करणे अत्यावश्यक आहे. जंगलं नष्ट झाली की तिथले प्राणी लोकवस्तीमध्ये शिरतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे शेजारील दाेडामार्ग तालुक्यातून गोव्याच्या हद्दीत घुसलेल्या हत्तीची घटना.
त्यामुळे सरकारने ठोस पावले उचलून विकास करताना पर्यावरणावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्यावी. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे हेच शाश्वत भविष्याचे सूत्र आहे.
– तुषार तेली – ९५४५११५७७६






